गेल्या तीन वर्षात भेंडवळची भविष्यवाणी इतक्या वेळा खरी ठरलेय

आपल्या लहानपणीचा काळच जरा वेगळा होता. घरात एकच टीव्ही. प्रत्येकाकडे स्वतःचा मोबाइल पण नव्हता. मग सगळ्यांनी एकाच स्क्रीनच्यापुढं जमा व्हायचं. त्यात घरातल्या टीव्हीवर पण घरातल्या मोठ्यांच्याच पहिला अधिकार असायचा. संध्याकाळी आईचं मालिका बघणं फिक्स असायचं मग संध्याकाळचा ७-१० स्लॉट तिचा तर फिक्स असायचा. तर सकाळी ७ वाजता पप्पांच्या हातात रिमोट. त्यांचं पण फिक्स टाइमटेबल सुरवातीला तासभर बातम्या आणि मग राशिभविष्याचा कार्यक्रम.

या राशिभविष्या वरणंच पप्पांचा मूड ठरायचा आणि त्यावरून घराचा. टिव्हीवर येणारे ते गुरुजी पप्पांची राशीच्यावेळी आज छप्पर फाड के लाभ है मंडळी असं  म्हटले की पप्पा खुश आणि मग आम्ही पण.   धोक्याची घंटा आहे असं गुरुजी म्हटले की इकडं पप्पा लोडमध्ये. आणि हद्द तर तेव्हा व्हायची जेव्हा गुरुजी म्हणायचे कळतंय पण वळत नाहीये, समजतंय पण उमजत नाहीये…पण तरीही आमच्या घरात हा कार्यक्रम रोजच रीतिरिवाज असल्यासारखा लावला जायचा.

थोडक्यात सांगायचं तर सायन्स काही जरी म्हटलं आजही पार मोबाइलवर ऍप घेऊन भविष्य बघतात.

आपल्या महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी भविष्य सांगण्याची परंपरा आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यातलं एक गाव असं आहे जिथं तर पार पाऊस, पीक, सत्ता ते अगदी संरक्षण आणि आर्थिक विषयांवर भविष्यवाणी होते.

सुमारे 350 वर्षांपासून ही भविष्यवाणी करण्याची परंपरा जपणारं बुलडाणा जिल्ह्यातील या गावाचं नाव आहे भेंडवळ.

तर पाहिलं बघूया ही भविष्यवाणी करण्याची परंपरा नेमकी काय आहे?

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावात अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भविष्यवाणी वर्तवण्याची परंपरा आहे. त्यामुळंच याला भेंडवळची भविष्यवाणी म्हणतात. इथं भाकीत घट मांडणी करुन वर्तवली जातात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घटाची मांडणी होते. घट मांडणीचा मान वाघ घराण्याकडे असल्याचं सांगण्यात येतं. अक्षय्य तृतीयेला सुर्यास्तापूर्वी वाघ घराण्याचे वंशज गावाबाहेर शेतात घटची मांडणी करतात.  

या घटामध्ये 18 प्रकारची धान्य असतात. 

यात गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा हे धान्य गोलाकार पद्धतीने मांडले जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करुन पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक असलेली चार मातीची ढेकळं ठेवण्यात येतात. त्यावर मग पाण्याने भरलेली घागर ठेवतात. घागरीवर पापड, भजी, वडा, सांडोळी, कुरडई, विड्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतिकात्मक मांडणी केली जाते. 

दुसऱ्या दिवशी या घटात झालेल्या बदलावरुन भाकीत वर्तवलं जातं. उदाहरणार्थ घटमांडणीतील करंजी हलली की  देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं  असा अंदाज वर्तवण्यात येतो.

यावर्षीच्या भविष्यवाणीत काय सांगण्यात आलंय ?

जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात यंदा चांगला पाऊस पडेल तर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस राहील असं पावसाच्या बाबतीत भविष्य वर्तवण्यात आलंय. पिकाच्या बाबतीत सांगायचं तर देशात पीक चांगलं येईल, ज्वारी, कापूस, उडीद, हरभरा पिकं चांगली येतील या पिकांना भाव मिळेल असं भाकीत करण्यात आलंय.

राजकीय भाकीताबद्दल बोलायचं झाल्यास सत्तापालट होणार नाही, राजा कायम राहणार, देश अर्थिक अडचणीत असेल असं सांगण्यात आलंय.

रोगराईचा नायनाट होईल अशी भविष्यवाणीही भेंडवळमध्ये वर्तवण्यात आलेय.

पण हे सगळ्या भविष्यवाणी होत असल्या तरी यातल्या किती खऱ्या ठरल्या आहेत हा एक महत्वाचा प्रश्न उपस्तिथ केला जातो. त्यामुळं म्हटलं मग बघावं की मागच्या भविष्यवाणीचं काय झालं. त्यामुळं मागच्या तीन वर्षात नक्की काय झालं हे एकदा बघू.

२०१९ ची भविष्यवाणी 

१) देशात राजाची गादी कायम असेल आणि देशात स्थिर सरकार येईल. 

त्यावर्षी लोकसभेच्या  निवडणूका होणार होत्या. मग यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येइल असा अंदाज बांधण्यात आला.

भेंडवळची ही भविष्यवाणी खरी ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुमताचं स्थिर सरकार स्थापन केलं. 

२) देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं 

नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांमधील अस्थिरता आणि GST आणि नोटाबंदीसारख्या उपायांमुळे 2019 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत रिसेशन नसलं तरी मंदी होती असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटलं होतं. त्यामुळं भेंडवळची ही भविष्यवाणी देखील खरी झाली.

३)परकीय घुसखोरी होत राहणार, पण संरक्षण खाते त्यास चोख प्रत्युत्तर देईल

त्यावर्षी पुलवामा अटॅक आणि बालाकोट एअर स्ट्राइक या घटण्या झाल्या होत्या पण त्या भविष्यवाणीच्या आधी झाल्या होत्या. त्यानंतर भारत-चीन आणि भारत पाकिस्तान या बॉर्डर शांतच होत्या. त्यामुळं हे काही खरं ठरली असं म्हणता येणार नाही.

४) कापूस आणि गहू या पिकांचे उत्पादन मोघम स्वरुपात राहणार आणि ज्वारीचे पीक सर्वसाधारण येईल. पण भावात तेजी मात्र राहणार नाही.

महाराष्ट्रातील कापसाचे उत्पादन एकूण 88 लाख गाठी कापसाचे होते आणि 2019-20 मध्ये मागील हंगामाच्या तुलनेत 16.6% वाढ नोंदवली गेली होती. २०१९ मध्ये कापसाचे भाव 4,500-5,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुधारले होते असे उद्योग क्षेत्रातील लोकांचे म्हणणे होते. गतवर्षी त्याचवेळी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. त्यामुळं ही भविष्यवाणी काही प्रमाणात खरी ठरली होती.

२०२० ची भविष्यवाणी 

करोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ चौघांच्या उपस्तिथीत ही भविष्यवाणी करण्यात आली होती.

१) जून महिन्यात पाऊस साधारण असेल, जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, सप्टेंबर महिन्यात सार्वत्रिक आणि जास्त पाऊस होईल. 

पाऊस चांगला असल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. 

२०२० मध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला होता. त्यामुळं ही भविष्यवाणी खरी ठरली होती. 

२) ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पीकं चांगली येतील, पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे.

२०२०चं वर्ष पूर्ण लोकडाऊनमध्येच गेलं. त्यामुळं देशभर बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळं शेतीमाल मोठ्या प्रमाणात रानात पडून खराब झाला होता. 

३) पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रीम आपत्तीसुद्धा येऊ शकते, रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल.

२०२० मध्ये आधीच करोना संकट आलं होतं.त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या काळात देशाची आर्थिक परिस्तिथी पण रसातळाला गेली होती. त्यामुळं ही भविष्यवाणी खरी ठरली.

४) राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल. परकीयांची घुसखोरी वाढेल. 

५ मे २०२० पासून, लडाख आणि तिबेट आणि सिक्कीममधील सीमेजवळील विवादित पॅंगॉन्ग तलावाजवळ चीननं आक्रमण केलं होतं तर भारताने ते यशस्वीपणे परतून लावलं होतं. त्यामुळे ही भविष्यवाणी खरी ठरली होती.

२०२१ ची भविष्यवाणी 

१)जून महिन्यात पाऊस कमी असेल, जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होईल.

यावर्षी चारही महिन्यात पावसाळा साधारण असेल असं सांगण्यात आलं होतं.

महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर 2021 या कालावधीत सरासरी पेक्षा 19% जास्त पावसाची नोंद झाली होती. म्हणजे साधारणच पाऊस झाला असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे भविष्यवाणी खरी झाली.

२)देशातील रोगराईबद्दल  भेंडवळची भविष्यवाणी होती की यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. 

अगदी तसंच झालं एप्रिल-मे मध्ये दुसरी लाट येऊन गेली होती. तर त्यानंतर त्याचं सावट वर्षभर राहिलं.

३) देशाच्या राजाची गादी कायम राहणार. राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल. असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं. 

झालंही तसंच करोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेले मृत्यू, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. 

त्यामुळं भेंडवळची भविष्यवाणी जरी तंतोतंत खरी होत नसली तरी अनेकदा तिचा अंदाज खरा ठरला आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.