एफसी रोडवरच्या वैशालीची गर्दी कायम राहील पण आता जगन्नाथ शेट्टी दिसणार नाहीत

पुण्यातील फर्ग्युसन रोडवर फिरण्यासाठी तुमच्याकडं असंख्य कारण असतील. पण याच रोडवर आहात आणि भूक लागली की मग वैशाली आणि रुपाली हे एकमेव कारण आपल्याकडे असतं.

साउथ इंडियन प्रकारातलं हे रेस्टॉरंट पुणेकरांसाठी हे एक प्रकारचे स्टेटस सिम्बॉलचं.

म्हणजे हे कसं म्हणाल तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आणि वैशाली ते गेले नाहीत असं कधी होत नाही. त्यामुळे हॉटेल वैशाली किती प्रसिद्ध आहे हे सांगायची गरज नाही. सकाळी ६ ते रात्री ११ या दरम्यान गेलात आणि तुम्हाला लगेच जागा मिळाली अस ही कधी होत नाही. यावेळेस तुम्हाला हमखास हॉटेलच्या दारात गर्दी बघायला मिळणार.

वैशाली मध्ये येणारा ८० टक्के ग्राहक हा वारंवार येणाऱ्यातील आहे. काही जणांचे आजोबा, वडील येत होते. आज त्यांची मुल सुद्धा नित्यनियमाने हॉटेल वैशालीत येतात.

अशा या सुप्रसिद्ध वैशाली हॉटेलची गोष्ट काही छोटी नाही बरं का…

तर हे हॉटेल सुरू केलं ते जगन्नाथ शेट्टी यांनी. ८ ऑक्टोबर १९३२ सालात कर्नाटकातल्या ओणिमजालू नावाच्या खेड्यात जगन्नाथ शेट्टींचा जन्म झाला. नोकरी करायची म्हणून शेट्टी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कर्नाटक डून काकांसोबत कल्याणला आले होते. दरमहा अवघ्या तीन रुपयांच्या पगारावर त्यांनी नोकरीला सुरूवात केली.

वय तेराच चौदा झालं, १५ झालं, १६ झालं पण आयुष्यात नवं असं काही घडेना. कल्याण मध्ये मन काही रमेना आणि स्वतःच काहीतरी उभं करायचंय ही ओढ काही स्वस्त बसू देईना

म्हणून वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे तेव्हा साल होत १९४९, शेट्टी पुण्यात आले. हॉटेल वैशाली मध्ये काम करायला सुरूवात केली. शेट्टींच विशेष असं काय विचाराल तर हॉटेल आपलं स्वत:चं असल्यासारखं ते मेहनत घेऊन काम करायचे. त्यांचा दिवस पहाटे सुरू व्हायचा ते रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये सर्व कामं बघून शटर खाली करुनच जायचं हा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. याची फलश्रुती, त्यांनी १९५१ मध्ये कॅफे मद्रास हे रेस्टॉरंट सुरू केल. त्यानंतर मद्रास हेल्थ होम आणि एफसी रोडवरच वर्ल्ड फेमस वैशाली हॉटेल सुरू केल.

वैशाली हॉटेल म्हणजे पुणेकरांची आन बान शान.

प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटावा असं हे खाद्यपीठं. कॉफी आणि सांबार ही दोन इथली बेस्ट आकर्षण. अस्सल पुणेकर इथं खाण्यासाठी तर जातातच पण गप्पांची मैफिल इथंच रंगते. दर रविवारी किंवा दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी

वैशाली वर भेटू

म्हणणारे पुणेकरांचे अनेक गट इथं आहेत. मग यात कॉलेजात जाणारी पोर पोरी असू द्या नाहीतर मध्यमवयीन नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे गट असू द्या, मिनी किट्टी पार्टी इथं रंगली तरंच इथंच रंगावी. पुण्यातल्या एखाद्या व्यक्तीला वैशाली माहीत नाही असा एखादा व्यक्ती ही तुम्हाला सापडणार नाही. आणि जर यदाकदाचित तो सापडलाच तर त्याच्यावर मीम हमखास बनणार.

अशा या हॉटेल वैशालीला पुणे महापालिकेकडून ‘क्लिनेस्ट किचन’ पुरस्कार देखील मिळालाय. २००० साली पुण्यातील त्रिदल संस्थेने त्यांना प्रतिष्ठित ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन गौरवले होते.

आणि बरं का मंडळी फक्त पुणेच माही तर मुंबई, दिल्ली आणि परदेशवाऱ्या केलेली मंडळी वैशालीमध्ये डोकावायला विसरत नाहीत. पुण्याला भेट देणाऱ्या मंडळींना दगडूशेठचा गणपती पहिला नाही, चितळ्यांची बाकरवडी आणि वैशालीचा सांबार टेस्ट केला नाही तर पुणे आये और किया क्या असं होऊन जाईल बघा.

पुण्यात असं वर्ल्ड फेमस वैशाली बनवण्याचं श्रेय हे जगन्नाथ शेट्टी यांचंच. अशा या एफसी रोडवरच्या वैशालीची गर्दी कायम राहील पण जगन्नाथ शेट्टी मात्र आता दिसणार नाहीत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.