तर सोहराबुद्दीन सांगलीत असता..!

तब्बल तेरा वर्षांनंतर भारतातल्या एका सर्वात हॉट केसचा निकाल लागला. सोहराबुद्दीन केसमध्ये आरोपी असणाऱ्या २२ जणांना आज CBI च्या स्पेशल कोर्टाने “बाइज्जत बरी” केलं.

२०१४ साली या केसस संबधीत असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांना, नेत्यांना ( गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा व राजस्थानचे गृहमंत्री कटारी यांच्यासह प्रमुख पोलिस अधिकारी) यांना कोर्टाने यापुर्वीच निर्दोष सोडलं होतं. केससी संबधीत असणाऱ्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आज निर्दोष घोषीत करण्यात आलं. या दरम्यान शहाबुद्दीनचा भाऊ रुहाबुद्दिन याने अस सांगितलं की, आम्ही सुप्रीम कोर्टात जावू. 

या झाल्या आजच्या ठळक बातम्या ! 

आत्ता आम्ही सांगतो, सुरवातीपासून नेमकं काय, कधी आणि कसं झालं… 

साल २००५. ठिकाण राजस्थान. 

सोहराबुद्दीन राजस्थानमधल्या उज्जैन भागात रहायचा. तिथेच त्याची गॅंग होती. या गॅंगच महत्वाच काम असायच ते म्हणजे खंडणी. उज्जैनसह राजस्थानच्या भागात चालणाऱ्या मार्बलच्या व्यापाऱ्यांकडून सोहराबुद्दीन खंडणी गोळा करायचा. अस सांगितलं जात की यापुर्वी त्याच्या घरावर धाड टाकून चाळीस AK47 जप्त करण्यात आल्या होत्या. पण हि केस देखील त्याच्या एन्काऊंटरसारखी संशयास्पदच ठरली होती. 

मार्बलच्या व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करण्याच काम सोहराबुद्दीन करायच. २००५ च्या दरम्यान मार्बल किंग म्हणून प्रसिद्ध असणारे व्यापारी विमल पटणी यांच्याकडे त्यांने खंडणी मागितली होती. त्यांनी देखील खंडणी दिल्याचं सांगितलं जात. पण याच घटनेतून सर्व व्यापारी एकत्र आले. सोहराबुद्दीनचा वाढता त्रास कायमचा मिटावा म्हणून त्यांनी राजस्थानचे तत्कालीन गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्याकडे धाव घेतली. गुलाबचंद कटारिया यांच्यानंतर गुजरात आणि राजस्थानचे मार्बल व्यापारी तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्याकडे गेले. 

सोहराबुद्दीन बद्दलची माहिती गुजरातचे ATS प्रमुख डीजी वंजारा यांच्याकडे देण्यात येते. वंजारा सोहराबुद्दीनची माहिती घेतात तेव्हा त्यांना समजत की सोहराबुद्दीनवर गुजरातमध्ये एकही केस रजिस्टर नाही. ATS प्रमुख वंजारा यांच्या सांगण्यावरुन एक प्लॅन तयार करण्यात येतो. 

राजस्थानचे पोलिस अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून सोहराबुद्दीनला गुजरातमध्ये खंडणी गोळा करायला लावण्याचा प्लॅन आखला जातो. सोहराबुद्दीन गुजरातला खंडणी घ्यायला आला की त्याला अटक करायची अशी प्लॅनिंग ठरते. 

सोहराबुद्दीनला टिप पोहचवली जाते की मार्बल किंग रमण पटनी यांच्याकडून खंडणी घ्यायची असेल तर गुजरातला जायला हवं. ठरल्या ठिकाणी गुजरात पोलिस सापळा लावतात पण सोहराबुद्दीन प्रजापती नावाच्या त्याच्याच गॅंगमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला तिथे पाठवतो. 

पोलीस प्रजापतीला अटक करुन आपल्या बाजूने करुन घेतात. पण याचदरम्यान राजस्थाममध्ये असणाऱ्या सोहराबुद्दीनला पोलिसांच्या प्लॅनबद्दल माहिती समजते, पण त्याला हे माहित नसतं की त्याचा माणूस प्रजापती पोलिसांच्या बाजूने फुटला आहे. सोहराबुद्दीन राजस्थाममधून गायब होतो. आपली बायको कोसर बी हिला घेवून तो हैद्राबादला जातो. प्रजापतीला तो हैद्राबादमध्ये असल्याची माहिती देतो. प्रजापती ती माहिती गुजरात पोलिसांना देतो. गुजरात पोलिस सोहराबुद्दीनला उचलण्याचा दुसरा प्लॅन रचतात. 

हैद्राबादवरून सांगलीला जाणाऱ्या बसमध्ये सोहराबुद्दीन आणि त्याची बायको बसतात. ती तारिख असते २३ नोव्हेंबर २००५. सोहराबुद्दीनचा सांगलीला पळून जाण्याता प्लॅन यशस्वी झाला असता तर तो आज सांगलीत देखील असता पण गुजरात पोलीस प्रजापतीच्या टिपवर त्यांना अचूकपणे हेरतात. पोलिस सोहराबुद्दीन व त्याच्या बायकोला ताब्यात घेतात व गुजरातमध्ये आणतात. अहमदाबाद शेजारी असणाऱ्या दिशा रेसॉर्टमध्ये पोलीस सोहराबुद्दीनला डांबून ठेवतात. 

२६ नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या पोलिस टिमला बोलावून घेतलं जातं. ATS प्रमुख वंजारा आणि त्यांची टिम हायवेवरील एक जागा ठरवतात. वंजारा कॉन्स्टेबलला एक मोटारसायकल घेवून यायला सांगतात. त्याला सांगितलं जातं की, गाडी चालवत पुढे जावून गाडीवरुन उडी टाक. तो कॉन्सेटबल चालू मोटारसायकलवरून उडी मारतो. हिकडे सोहराबुद्दीनला चालत्या गाडीतून धक्का दिला जातो. ज्याप्रकारे कॉंन्सेबलला चालू गाडीवरुन धक्का मारल्यामुळे जखमा होतात तशाच जखमा सोहराबुद्दीनला होतात. सोहराबुद्दीन खाली पडल्यानंतर त्याच्यावर फायरिंग करण्यात येत. आठ गोळ्या लागतात व यातच सोहराबुद्दीनचा मृत्यू होतो. 

दूसऱ्या दिवशी सोहराबुद्दीनच्या एन्काऊंटरच्या बातम्या प्रसिद्ध होतात. सोबत असणारा प्रजापती या एन्काऊंटरचा साक्षीदार असतो तर सोहराबुद्दीनची बायको कौसर बी गायब असते. पुढे या घटनेनंतरच्या तीन दिवसात वंजारा यांच्या मुळगावाच्या शेजारीच कौसर बी हिची हत्या करुन जाळून टाकण्यात आल्याची बातमी समोर येते. 

एका महिन्याभरात या केसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होवू लागतात. हि केस लोकल क्राईम ब्रॅन्चकडे सुपुर्त केली जाते.  एका मोठ्या राजकिय नेत्याला मारण्यासाठी सोहराबुद्दीन आला होता अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते. 

या घटनेनंतर जानेवारी २००६ मध्ये सोहराबुद्दीनचा भाऊ रुहाबुद्दीन CJI ला पत्र लिहून फेक एन्काउंटर झालं असल्याचं व सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी गायब असल्याचं कळवतो. जानेवारीत या पत्राच्या आधारावर डीसीपी पांडे यांच्या आदेशाखाली चौकशी चालू केली जाते. त्याच वर्षांच्या अखेरीस घटनेचा एकमेव साक्षीदार तुलसीराम प्रजापतीचा पोलिस गुजरात आणि राजस्थानच्या सिमेवर असणाऱ्या चापरी येथे एन्काउंटर करतात. पोलिसांकडून सांगितलं जात की तो पोलिसांची हत्यार घेवून जात असताना आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावर फायरिंग करण्यात आलं आहे . तुलसीराम प्रजापती मारला जातो तेव्हा त्याच वय असत अवघं २८ वर्ष. पुढच्याच वर्षी त्याची आई नर्मदाबाई देखील हे फेक एन्काउंटर असल्याची तक्रार दाखल करते.

२००८ ला हि केस CID कडे सोपवण्यात येते CID चार्जशिट दाखल करून तीन बडे आयपीएस अधिकारी डीजी वंजारा, राजकुमार आणि दिनेशएनएन यांना अटक करते. CID तिन्ही आयपीएस अधिकाऱ्यांना अटक करते मात्र कोर्ट CID च्या चार्जशीटमधल्या विसंगती दाखवून हि केस CBI कडे सुपूर्त करते. 

२०१० साली या केसचा ताबा CBI कडे जातो.

जुलै २०१० ला CBI आपल्या केसमध्ये ३८ आरोपींना दोषी मानत व त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करत. यामध्येच तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा आणि राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांची नावे समोर येतात. CBI ला दिलेल्या जबाबात पोलिस इन्स्पेक्टर सोलंकी सांगतात की, अमित शहा यांची इच्छा होती की हि केस लवकरात लवकर बंद करण्यात यावी. अमित शहा यांना अटक करण्यात येते. दोन वर्ष अमित शहा यांना गुजरात राज्यात बंदि घालण्यात येते. 

२०११ साली सुप्रीम कोर्ट सांगत की या केसची सुनवाई गुजरात पासून बाहेर करण्यात यावी. तसेच केसचा निकाल लागत नाही तोपर्यन्त न्यायाधिशांची बदली करण्यात येवू नये. केस मुंबई येथे चालवण्यात येते मात्र न्यायाधिशांची बदली केली जाते. २०१४ साली CBI वर ताशेरे ओढत केस जाणिवपुर्वक लांबवली जात असून लवकरात लवकर अमित शहांना हजर करावे असे आदेश जस्टिस लोया देतात. काही दिवसातच जस्टिस लोया यांच नागपुरमध्ये निधन होतं. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करुन कारवान मासिकाने त्यावर विस्तृत रिपोर्ट केला आहे. 

२०१४ ला एकूण ३८ आरोपींपैकी १६ आरोपींना पुराव्याअभावी सोडलं जातं. यामध्ये अमित शहा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील असतात. कोर्टांच्या मते या आरोपींचा या केसशी थेट संबध नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोडण्यात येवून फक्त कनिष्ठ अधिकारी जसे कि पोलिस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर यांच्यावरच केस चालू ठेवली जाते. 

आणि काल दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजी उर्वरीत २२ आरोपींची देखील पुराव्याअभावी सुटका करण्यात येते. यावेळी कोर्ट सांगत की, सोहराबुद्दीन यांची हत्या बंदुकीच्या गोळीने झाली हे जरी खर असलं तर तो व्यापक कटाचा भाग होता याबद्दल कोणताही ठोस पुरावा कोर्टात सादर करण्यात आला नाही. या केसमध्ये २१० साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या त्यापैकी ९२ साक्षीदारांनी आपली साक्ष पलटवली. 

*वरील सर्व घडामोडी CBI ने दाखल केलेल्या चार्जशीट व त्या आधारे माध्यमात आलेल्या बातम्यांवर आधारित आहेत.  

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.