बायडन तात्या आता उपराष्ट्रपती कमला ताईंना अमेरिकेच्या खिंडीत गाठायला लागलेत.

आज एक मोठी बातमी आहे. भारतातल्या ज्या ज्या लोकांनी अमेरिकेत जो बायडन निवडून आले म्हणून आपल्या दारात फटकड्या फोडल्या त्या त्या लोकांसाठी हा धक्का असू शकतो.

कारण काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यामधील संबंध कमालीचे ताणले गेलेत. आणि त्याचा परिपाक अमेरिकेमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचं म्हंटल जातंय. 

आता ज्यांनी ज्यांनी कमला हॅरिस निवडून आल्या म्हणून फटकड्या फोडल्या त्यांनी ही वाचा की जो बायडन तुमच्या कमला ताईंशी नक्की कसे वागतायत ते..

अमेरिकेच्या राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सुरुय. त्या चर्चेनुसार बायडन हे कमला ताईंच्या ठिकाणी नवा उपराष्ट्रपती निवडण्याच्या तयारीत आहेत. आणि कमला यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी सोपवण्याची तयारी करत आहेत. 

पण असं काय घडलं कमला ताईंसोबत? 

तर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना आपल्या कार्यकाळामध्ये पहिल्या सात महिन्यांत प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अर्थात ओबामांइतकी लोकप्रियता त्यांना मिळाली नाही. पण त्यांना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (तात्या) यांच्यापेक्षा जरा जास्त पटींनीच या लोकप्रियता मिळाली. पहिल्यांदा करोनासंदर्भातील मुद्द्यांवरुन लोकांनी बायडन यांना पाठिंबा दिला. मात्र अचानक करोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्यान, अफगाणिस्तानातून माघार घेतल्यान आणि अर्थव्यवस्थेसंदर्भातील गोंधळ होऊ लागल्यान बायडेन यांची लोकप्रियता कमी झाली.

२०२१ च्या एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान सीएनएनने एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणानुसार डेमोक्रॅट्स आणि त्यांच्या नेतृत्वाखालील अपक्षांकडून बायडन यांना सर्वाधिक विरोध होतोय. प्रेसिडंट अॅप्रव्हलच्या रेटींगमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालीय.

त्यात आणि कमला हॅरिस या उप-राष्ट्राध्यक्षा झाल्यापासून त्यांची लोकप्रियता मात्र वाढलेली दिसते. या लोकप्रियतेचा फटका त्यांना पक्षीय राजकारणात बसलेला दिसतो. त्यांच्याकडून घेण्यात येणारे निर्णय, त्यांच्या समर्थकांपर्यंत त्याचं काम पोहचणं या गोष्टींमध्ये अडथळा येत असल्याच्या बातम्या गेले कित्येक दिवस अमेरिकेच्या मीडिया मध्ये येतायत. बऱ्याचदा कमला हॅरिस जे करु पाहत आहेत किंवा जे करण्याची त्यांची इच्छा आहे त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असून नक्की कमला हॅरिस यांची सरकारमधील भूमिका आणि काम काय आहे याबद्दल सार्वजनिक माध्यमातून फार कमी माहिती लोकांपर्यंत पोहचत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल संभ्रम निर्माण झाला.

कमला ताई शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांनी या गोष्टींविरोधात उघड उघड पवित्रा घेतला. त्यांनी तीन डझन माजी आणि सध्या कार्यरत असणारे सहकारी, प्रशासकीय अधिकारी, डेमोक्रॅटिक नेते, सल्लागारांसोबत झालेल्या मुलाखतीमध्ये व्हाइट हाऊसमधील रचनेसंदर्भात भाष्य केलं. 

हॅरिस यांनी केलेल्या दाव्यानुसार व्हाइट हाऊसमधील अनेक संबंधित लोक यामुळे नाराज आहेत की त्यांना पूर्णपणे तयार केलं जात नाही (माहिती दिली जात नाही) आणि नियुक्त्याही रखडल्या आहेत. अनेकांच्या मनामध्ये डावललं जात असल्याची भावना असल्याचं उप-राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. 

स्वतः हॅरिस यांनी अनेकदा राजकीय निर्णयांबद्दल मी जे करण्यासाठी सक्षम आहे त्यामध्ये मला हवे तसे निर्णय घेता येत नाहीत असे संकेत दिले होते.

कमला ताईंच्या बाजूने अधिकारी सुद्धा बोलतात. 

बायडन यांच्या एका सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस या एक मोठ्या नेत्या आहेत. मात्र त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली जात नाहीये. दिर्घकालीन विचार करुन पक्ष हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. कमला यांच्यावर दबाव टाकण्याऐवजी त्यांना निर्णय घेण्यासंदर्भातील अधिकार देऊन यशस्वी वाटचाल करण्यासाठी पक्षाने मदत केली पाहिजे. कमला मजबूत झाल्या तर पक्ष आणखीन मजबूत होईल.

आता तर अमेरिकन मीडियाने बायडन जे काय करतायत त्याबद्दल बातम्या द्यायला सुरुवात केलीय. सीएनएनने पब्लिश केलेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की वेस्ट विंगच्या प्रमुख कर्मचाऱ्यांनी उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचं पालन करणं बंद केलंय. 

आता हे लै झालं बायडनच. ताईंना त्रास दिला तर गाठ भारताशी आहे हे त्यांना सर्व फटकड्या फोडणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.