५१ दिवसांसाठी २० लाख, मोदींनी भारताच्या पहिल्या रिव्हर क्रूझचं उदघाटन केलंय…

आज पंतप्रधान मोदींनी नदीत फिरणाऱ्या जगातल्या सगळ्यात लांब क्रूझचं उद्घाटन व्हिडीओ काँफरन्सिंगद्वारे केलं.

एम व्ही गंगा विलास असं या क्रूझचं नाव आहे. ही क्रूझ म्हणजे साधी नाहीये. या क्रूझवर जीमपासून ते स्पा पर्यंत सगळ्या सुविधा असणार आहेत. अगदी बारसुद्धा या क्रूझवर आहे.

या क्रूझवरच्या नेमक्या सुविधा काय काय आहेत ते बघुया.

३६ प्रवासी राहू शकतील अशी या क्रूझवरील डेकची क्षमता आहे. या प्रवाशांसाठी १८ सूट्स आहेत. या क्रूझवर जे रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटमध्ये ४० सीट्स आहेत. बरं या रेस्टॉरंट मध्ये कॉंटिनेंटल फूड पासून ते भारतीय खाद्यपदार्थांपर्यंत सगळं आहे. एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहेत. याशिवाय, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचाही या क्रूझवर समावेश करण्यात आला आहे.

या क्रूझवर एक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे जेणेकरून कोणतेही सांडपाणी गंगेत वाहू नये, तसंच एक फिल्टरेशन प्लांट आहे जो अंघोळ आणि इतर कारणांसाठी गंगेचं पाणी शुद्ध करतो, अशी माहिती क्रूझ संचालकांनी दिली आहे.

या क्रूझची खास वैशिष्ट्य आहेत.

ही क्रूझ नदीत फिरणारी जगातली सगळ्यात लांब क्रूझ आहे. ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद आहे. पाण्यात फिरत असताना इंधनाची कमी पडू नये यासाठी या क्रूझमध्ये तब्बल ४० हजार लिटरची इंधन टाकी आणि ६० हजार लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आलीये. ताशी १०-१२ किलोमीटर वेगाने प्रवास करणार असलेली ही क्रूझ बनवण्यासाठी जवळपास ६८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय.

एम व्ही गंगा विलास हे भारतातील पहिलं क्रूझ जहाज आहे. क्रूझ ५१ दिवसांत ३,२०० किलोमीटरचा प्रवास करेल. पहिला प्रवास करणाऱ्या स्वित्झर्लंडमधील ३२ पर्यटकांचं वाराणसी बंदरात पुष्पहार आणि शहनाईच्या सुरांनी स्वागत करण्यात आलं. क्रूझवर जाण्यापूर्वी ते वाराणसीतील विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देतील.

प्रवासाचा मार्गही ठरलेला आहे.

ही क्रूझ एकूण ३,२०० किलो मीटरचा प्रवास करत पर्यटकांना घेऊन जाईल आणि विविध प्रमुख स्थळांवरून प्रवास करेल. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी लखनौमध्ये दिलेल्या निवेदनानुसार, या क्रूझमध्ये जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट आणि बिहारमधील पाटणा, झारखंडमधील शाहिगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता या प्रमुख शहरांसह ५० पर्यटन स्थळांचा समावेश असेल. आसाम या राज्यातून प्रवास करत पुढे ती बांगलादेशमध्ये सुद्धा प्रवेश करणार आहे. ही क्रूझ १ मार्च रोजी आसामच्या दिब्रुगड येथे पोहोचेल.

या लक्झरीयस प्रवासासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

इतक्या सगळ्या सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी ही क्रूझ अतिशय खर्चिकही आहे. या क्रूझवर प्रवास करण्याचा एका दिवसाचा खर्च हा साधारण २५ हजार ते ५० हजार इतका आहे. त्यामुळे, एकूण ५१ दिवसांच्या प्रवासासाठी साधारण २० लाख रुपये एका माणसाला खर्च करावे लागणार आहेत.

ही इतकी मोठी रक्कम मोजायची असूनही ही संपुर्ण क्रूझ पुढल्या दोन वर्षांसाठी आधीच बूक झालेली आहे. बूक झाल्यानंतरही लोक वेटींग लिस्टमध्येही थांबलेत. कुणाचं बुकिंग कॅन्सल झालं तरच वेटींग लिस्ट मधल्या नागरिकांचा नंबर लागेल.

या उद्घाटनावेळी बोलताना मोदींनी एम व्ही गंगा विलास ही फक्त एक सुरूवात आहे आणि अश्याप्रकारे जलमार्गावर आधारित असलेले बरेच प्रकल्प होणार आहेत अशी भुमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,

“आज, १,००० कोटींहून अधिक किमतीच्या इतर अनेक अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. यामुळे पूर्व भारतात व्यापार आणि पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढतील”

आता या एम व्ही विलास गंगा क्रूझमध्ये प्रवास करणं जरी सर्वसामान्यांसाठी अवघड असलं तरी पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे यानंतरच्या जलप्रवासाच्या प्रकल्पांमध्ये रोजगार आणि व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. पंतप्रधानांचं हे म्हणणं सत्यात उतरलं तर, हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.