मोदी, गांधी, केजरीवाल: गुजरात जिंकण्यासाठी प्रत्येकाला हाच माणूस हवाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य गुजरातच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने तर कंबर कसली आहेच परंतु काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे.

नरेंद्र मोदी गुजरातमध्ये हजारो करोडच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उदघाटन करत आहेत. तर काँग्रेसचे आणि आम आदमी पक्षाकडून वेगवेगळे आश्वासन दिले जात आहेत.

यातच राज्यातल्या वेगवगेळ्या नेत्यांना आणि प्रमुख व्यक्तींना स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 

यातच एक नाव आहे नरेश पटेल…

चार दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात असलेल्या खोडलगढ मंदिराला भेट दिली आणि खोडियार मातेचं दर्शन घेतलं. या भेटीमध्ये त्यांनी खोडालधाम संस्थानाचे विश्वस्थ नरेश पटेल यांच्याशी चर्चा केली. मोदी आणि पटेल यांच्या भेटीनंतर पटेल भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती पण नरेश पटेल यांनी ही निव्वळ सदिच्छा भेट होती असं स्पष्टीकरण दिलं होतं.

पण भाजपचं नाही तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून सुद्धा नरेश पटेल यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी २ ऑक्टोबरला खोडलधाममध्ये गरबा कार्यक्रमात भाग घेतला होता. तर केजरीवाल यांच्यापूर्वी जून २०२२ मध्ये नरेश पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माध्यमात चर्चा सुरु होती.

पण नरेश पटेल कोणत्याही पक्षात जाण्यास तयार नसतांना तीनही पक्ष नरेंद्र पटेलांना पक्षात घेण्यासाठी एवढे प्रयत्न का करत आहेत?

तर याचं कारण आहे गुजरातमधील पाटीदार समाजाची लोकसंख्या. गुजरातच्या एकूण लोकसंख्येपैकी १.५ कोटी लोकसंख्या ही पाटीदार समाजाची आहे. गुजरातमधील एकूण १८२ विधानसभा जागांपैकी सुमारे ७० जागांवर ‘पाटीदार मतदार’ थेट प्रभाव टाकतात. थोडक्यात गुजरातमध्ये कुणाचं सरकार येणार हे पाटीदार मतदार ठेवतो म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार आंदोलनामुळे भाजपला या जागांचे नुकसान झाले होते. पक्षाला १०० जागांचा आकडाही पार करता आला नव्हता. भाजपला केवळ ९९ तर  काँग्रेसला ८२ जागा मिळाल्या. भाजपचं सर्वात जास्त नुकसान सौराष्ट्र भागात झाले आहे. जिथे काँग्रेसने ५६ पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी भाजपला अवघ्या २२ जागांवर समाधान मानावे लागले.

२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३६ आमदार पाटीदार समाजाचे होते, तर २०१७ मध्ये त्यांची संख्या २८ झाली. तर काँग्रेसचे २० पाटीदार उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते.

गुजरातच्या राजकारणात इतक्या महत्वपूर्ण असलेल्या पाटीदार समाजामध्ये लेउवा आणि  कडवा अशा दोन पोटजाती आहेत.

या पोटजाती रामाचे दोन पुत्र लव आणि कुश यांचे वंशज असल्याचा दावा करतात. सध्याचे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे कडवा पाटीदार आहेत तर नरेश पटेल हे लेउआ पाटीदार आहेत. 

यातील लेउवा पाटीदारांचं  एक श्रद्धास्थान आहे, ज्याचं नाव आहे खोडलधाम.

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात कावागढ गावात खोडियार मातेचं मंदिर आहे. धार्मिक मान्यतेनुसार लेउवा पाटीदार समाजातले लोक या देवीला स्वतःची रक्षक देवी मानतात. नरेश पटेल हे याच संस्थानाचे चेअरमन होते. २०१७ मध्ये खोडियार मातेचं भव्य मंदिर बांधण्यात आलं आणि ट्रस्टची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून नरेश पटेल या संस्थानाचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.

मंदिराचे विश्वस्थ असलेल्या नरेश पटेल यांचा लेउवा पाटीदारांमध्ये चांगला वट आहे. त्यामुळेच नरेश पटेल यांच्या माध्यमातून लेउवा पाटीदार समाजातले मतदार खेचण्यासाठी तीनही पक्ष करत आहेत.

गुजरातच्या राजकोट, जामनगर, सुरेंद्रनगर, अमरेली, जूनागढ़, पोरबंदर आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये पाटीदार समाजाची लोकसंख्या आहे.

भाजपला आजवर ८०-८५% मतं ही पाटीदार-पटेल यांच्याकडूनच मिळत आलीत. गुजरातमधील पाटीदार समाज दीर्घकाळापासून भाजपसोबत आहे. आत्तापर्यंत भाजपाला “पटेल” नावाचे मुख्यमंत्री मिळाले त्यावरून तरी ते स्पष्ट होते.  गुजरातमध्ये चिमणभाई पटेल, केशुभाई पटेल, बाबूभाई पटेल, आनंदीबेन पटेल आणि विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे सगळे मुख्यमंत्री पाटीदार समाजातूनच होते.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे कडवा पाटीदार आहेत तर अलीकडच्या काळात काँगेसमध्ये प्रवेश करणारा हार्दिक पटेल लेउवा पटेल आहे. या दोन नेत्यांच्या जोडीला आता नरेश पटेल यांना सुद्धा पक्षात घेण्यासाठी भाजप प्रयत्नात आहे असं सांगितलं जातं. 

गुजरातमध्ये काँग्रेसच्या ६२ आमदारांपैकी २० आमदार एकट्या पाटीदार समाजाचे आहेत त्यामुळे काँग्रेस नेते नरेश पटेल यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जोडीला गुजरातमध्ये अलीकडच्या काळात प्रवेश केलेल्या आम आदमी पक्षाकडून सुद्धा नरेश पटेल यांना पक्षात घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. 

या सगळ्यांमध्ये नरेश पटेल मात्र कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही. म्हणूनच लेउआ पाटीदार समाजाचं धार्मिक नेतृत्व असणाऱ्या नरेश पटेलांना पक्षात घेण्यासाठी तीनही पक्ष प्रयत्न करत आहेत.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.