आबाजी सानपचे झाले भगवान बाबा, धोम्या डोंगराचा केला भगवान गड…!     

संत भगवान बाबा हे विसाव्या शतकात बीड जिल्हयात होऊन गेलेले एक मोठे संत आहेत. आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला जागं करून विकासाच्या प्रवाहात आणलं पण तरीही बाबांच्या व्यक्तिमत्वाला आज अनेक चमत्कार चिटकून बसले आहेत. परिणामी भगवान बाबा हे एक गूढ व्यक्तिमत्त्व बनले आहे.

आळंदीत स्वीकारला संन्यास. 

संत भगवान बाबा यांच्या जन्म 19 जुलै 1896 रोजी बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या गावी झाला. जन्मानंतर बाबांचं नाव आबाजी हे ठेवण्यात आलं तर सानप हे त्यांचं आडनाव होतं. बाबा जातीने वंजारी असले तरी घर मात्र कुनबाऊ शेतकऱ्यांचं होतं.

बाबा लहानपणापासून शाळेबरोबर गुरं राखण्याचं काम करत होते. घरी वारीची परंपरा होती. त्यामुळे ते वयाच्या सहाव्या वर्षांपासून वरील जात आणि तिथूनच त्यांना अध्यात्माची गोडी लागली. पुढे वय वाढत गेलं तसं त्यांची पंढरपूरची वारी नियमित होत गेली.

बीड जिल्ह्यात तेंव्हा नारायण गड हे मोठं अध्यात्मिक केंद्र होतं. या गडाचे महंत माणिकबाब यांच्याशी भगवान बाबांची ओळख झाली आणि पुढे भगवान बाबांनी माणिकबाबांकडून दीक्षा घेतली. माणिकबाबांनी भगवान बाबाला शिकवण्यासाठी पुढे आळंदीला पाठवलं. आळंदीतच  भगवान बाबांनी अध्यात्म आणि धर्माचं शिक्षण घेऊन बाबांनी संन्यास स्वीकारला.

बाबांनी नारायण गड सोडला !

आळंदीतलं आपलं शिक्षण संपवून भगवान बाबा परत आले आणि कीर्तनाच्या माध्यमातून गावोगाव फिरून बाबा समाजजागृती करत असताना 1937 त्यांचे गुरू माणिकबाबांनी देह ठेवला. त्यावेळी माणिकबाबांनी भगवान बाबाला उत्तराधिकारी नेमलं.

गडावर असताना भगवान बाबांनी अनेक लोकउपयोगी कामे सुरू केली. पण गडावरील इतर भक्तांना भगवान बाबांची ही प्रसिद्धी खपली नाही. आणि त्यांनी भगवान बाबावर लोभी असल्याचा आरोप करायला सुरुवात केली. आरोपांमुळे विषण्ण झालेल्या बाबांनी मोठ्या तडफेने भगवान गड सोडला आणि समाजात निघून आले. पुढे बीड जिल्ह्यातील बाजीराव पाटील यांनी बाबांना पाटोदा तालुक्यातील धोम्या डोंगरावर आणले. त्यावेळी धोम्या डोंगर अत्यंत अस्ताव्यस्त, कठीण आणि जंगली होता. पण बाबांनी याच धोम्याडोंगराला आपली कर्मभूमी करायचं ठरवलं.

बाबांनी भक्तांना आवाहन केलं की गड बांधण्यासाठी आर्थिक मदत आणि श्रमदान करावं बाबांची ख्यातीच इतकी होती की शेकडो लोक एक रुपयाचीही मजुरी न घेता गडावर श्रमदानाला आले. आणि विशेष म्हणजे हे सगळे लोक आपल्या घरून भाकरी बांधून आणत आणि श्रमदान करत, गडासाठी आर्थिक मदतही खूप जमली. यात अनेक महिलांनी आपले दागिनेसुद्धा दान दिले होते. बीड जिल्ह्यातल्या एका  गरीब बंजारा महिलेने आपले दहा तोळ्याचे दागिने सुद्धा गडासाठी देऊन टाकले होते हे विशेष.

यशवंतरावांच्या उत्स्फूर्त घोषणेतून मिळालं भगवानगड हे नाव !

गढ बांधून तयार झाला पण गडाचं नामकरण झालेलं नव्हतं, गडावर विठ्ठलाचे विशाल मंदिर बांधण्यात आले होते. मंदिरात विठ्ठलमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्यावेळचे दिगग्ज लोक आले होते. ज्यात त्यावेळेचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा होते. यावेळी कुणाच्या ध्यानीमनी नसतानाही यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या उस्फुर्त भाषणात घोषणा करून टाकली की,

“आजपासून या डोंगराला धोम्या डोंगर म्हणायचं नाही, तर भगवान बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या डोंगराला यापुढे ‘भगवानगड’ म्हणायचं…”

बस्स यशवंतराव चव्हाण बोलून गेले आणि तिथुन पुढे या धोम्या डोंगराचा भगवानगड झाला.

भगवान बाबांचं कार्य

भगवान गडाची निर्मिती झाल्यानंतर भगवान बाबांनी धार्मिक कार्याला जोमाने सुरुवात केली. बाबांनी गावोगावी हरिनाम सप्ताह सुरू केले. देवाच्या नावाखाली गावागावात होणारी पशुहत्या थांबवली, जाती धर्मात होणारे तंटेबखेडे थांबवले. आणि सर्वात महत्वाचे भगवान बाबांनी लोकांना व्यसनापासून दूर नेलं. बाबांनी केलेलं व्यसनमुक्तीचं काम हे क्रांतिकारी म्हणून गणलं जाईल इतकं महत्वाचं होतं. त्यांची शैक्षणिक कार्येही महत्वाची होती.

जातीय सलोखा टिकून रहावा यासाठी भगवान बाबांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या हायतीतली एक चांगली गोष्टही प्रचलित आहे. एका गावात एक मुस्लिम मिस्त्रीने संपूर्ण मंदिर बांधून पूर्ण केले पण देव हा पवित्र असल्यामुळे आणि मिस्त्री मुस्लिम असल्यामुळे देवाचा गाभारा मात्र गावातले लोक त्या मिस्त्रीला बांधू देत नव्हते. त्यावेळी भगवान बाबांनी गावातल्या सगळ्याच लोकांची समजूत घातली आणि त्या मुस्लिम मिस्त्रीच्याच हस्ते गाभारा बांधून घेतला. आणि त्या मंदिरात मूर्तीची स्थापना स्वतः बाबांनी केली हे विशेष.

या आणि आशा असंख्य कामांमुळे आयुष्यात एकही चमत्कार न करता भगवान बाबा या असामान्य व्यक्तिरेखेला दैवत्व प्राप्त झालं. आशा या थोर साधू पुरुषाचं वयाच्या 69 व्या वर्षी पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात निधन झालं.

  • दत्ता कानवटे, औरंगाबाद.

हे ही वाच भिडू 

2 Comments
  1. Malhari Munde says

    Jay Bhagwan

  2. Bhau dahifale says

    धौम्य डोंगर हा पाथर्डी, जि अहमदनगर मध्ये येतो.
    बाजीराव पाटील हे बीड जिल्ह्यातील नसून खरवंडी कासार, ता-पाथर्डी येथील रहिवासी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.