आईच्या भाषेत लिहून भोजपुरीचा शेक्सपिअर बनलेला भिखारी ठाकूर
तर आम्ही बोल भिडूचे कार्यकर्ते. आम्हाला लई जन म्हणत्यात तुम्ही चांगलं लिहिताय पण थोडी तुमची भाषा अशुद्ध असते. पुण्यात पहिल्यांदा पाउल टाकलं त्या दिवशी पीएमटीच्या कंडक्टर पासून ते कॉलेजच्या सिक्युरिटी गार्ड पर्यंत सगळ्यांनी विचारलं,”काय गाववाले? सांगली कि कोल्हापूर?”
सुरवातीला वाटायचं आपलं गाव लई फेमस. सगळ्यांना वळखतय आपलं गाव पण नंतर कळाल ही बेनी आपल्या भाषेची मज्जा घेत होती.
सुरवातीला काही दिवस प्रत्येक वाक्यात ” हो ना, नाही ना” असलं ना टाकून बोलायचा प्रयत्न केला. त्यात पण ना आणि णा वेगळ असतय हे जनरल नॉलेज नव्यानं शिकायला मिळालं. एमपीएससीच्या क्लास मध्ये चाणक्य मास्तर स्वची ओळख वर तीन तास बोलला. पहिल्यांदाच त्याच पटलं. उडत गेला न आणि ण. आपण आपल्या आईच्या भाषेत बोलणार.
असाच एक दिवस भिकारी ठाकूर भेटला. भेटला म्हणजे असा टिळक रोडवर फिरताना नव्हे तर त्याने लिहिलेल्या “बिदेसिया” नाटकातून भेटला.
जवळपास शंभर वर्षापूर्वी भोजपुरीमध्ये लिहिलेलं हे नाटक. आपला गाव बायको घरदार सोडून दूरदेशी गेलेला बिदेसिया मोठ्या शहरातल्या झगमगाटात अडकतो. तिकड गेल्यावर आपली मातीचा त्याला विसर पडतो . खूप दिवस वाट बघितल्यावर त्याची बायको एका वाटसरूच्या हातून त्याला एक चिठ्ठी धाडते आणि ती वाचून तो इमोशनल होऊन गावी परत येतो.
अशी साधी सिंपल स्टोरी. पण नाटकान आपल्याला फुल इंप्रेस केलं. कारण? भाषा.
हँसि हँसि पनवा खीऔले बेईमनवा कि अपना बसे रे परदेस।
कोरी रे चुनरिया में दगिया लगाई गइले, मारी रे करेजवा में ठेस!
अस्सल सोन म्हणता येईल अशी अस्सल भाषा हे भिकारी ठाकूरच बलस्थान होत. ज्या काळात शुद्ध हिंदी, शुद्ध उर्दू, शुद्ध इंग्लिश मध्ये लिहिणाऱ्या लेखक कवींची चलती होती तेव्हा भोजपुरी मध्ये लिखाण करणारा भिकारी ठाकूर हा पहिला होता.
१८ डिसेंबर १८८७रोजी बिहारच्या कुतुबपूर गावात एका न्हाव्याच्या घरात त्यांचा जन्म झाला.
कामाच्या शोधात भरपूर गावे फिरून झाली. पण गावातल्या रामलीलेच्या ओढीन परत आणलं. आपला पारंपारिक व्यवसायाच्या बरोबरीन रामलीला त्यांनी चालू ठेवली. याच रामलीलेच्या निम्मितान त्यांना आपल्यातल्या साहित्यप्रतिभेचा शोध लागला.
त्यांनी अनेक गाणी लिहिली, कविता केल्या, नाटके लिहिली पण सगळी आपल्या मातृभाषेत. लोकसंगीत रक्तात खेळत होत त्या भागीरथीला पुस्तकामधून परत मातीमध्ये आणलं.
लौन्डा नाच, कट्टा आणि पिंजरेवाली मुनिया या मध्ये अडकून पडलेल्या भोजपुरी भाषेला त्यांनी अभिजात भाषेच्या रांगेत आणून उभ केलं.ननंद भौजाई सारख्या चटकदार रचनेबरोबर बिधवा विलाप, बेटीबेचवा, बेटीविरोध असे सामजिक भाष्य करणारे नाटक सुद्धा लिहिले.
भले भले पुरस्कारप्राप्त लेखक कवी त्यांचा थिएटर ला उपस्थिती लावत होते. हातावरच पोट भरण्यासाठी परदेसी झालेल्या बिहारी श्रमिकांना भिकारी ठाकूरचे शब्द घरची आठवण करून देणारे वाटत होते.
भिकारी ठाकूरला कोणी भोजपुरीचा शेक्सपियर म्हणत तर कोणी भरतमुनीच्या परंपरेतले कवी म्हणत.
इंग्रज सरकारन रायबहाद्दूर पदवी दिली, भारत सरकारन पद्मश्री. बिहारी जिथं जाईल तिथं गोड गीतामधला भिखारी ठाकूर घेउन गेला आहे.
“अखियन में लोर, बंद होखे जुबान, खूब पिटे सब थपरी,
धयिके किसिम किसिम के रूप जब मंच पर चढ़े भिखारी…”
आजही भाषा शुद्ध अशुद्ध करणाऱ्या प्रत्येकाच्या मनाच्या अशुद्धतेवर भिखारी ठाकूर वस्तरा फिरवतोय.
हे ही वाच भिडू.
- एकविसाव्या शतकाची भाषा जाणणारा गीतकार.
- आदिवासी समाज ‘बिरसा मुंडा’ यांची देव म्हणून पूजा का करतो..?
- साहिरच्या शायरीमागची कहाणी !