चित्रकुटमधील बालाजी मंदिर औरंगजेबाने बांधलं होतं ?

मुघल बादशाह औरंगजेबच्या धार्मिक कट्टरतेचे आणि त्याने ध्वस्त केलेल्या मंदिर आणि गुरुद्वारांचे अनेक किस्से आपण ऐकलेलेच असतील. पण चित्रकुटमधील बालाजी मंदिराच्या निर्मिती संदर्भातील किस्सा मात्र औरंगजेब बादशहाच्या धार्मिक कट्टरतावादी प्रतिमेच्या अगदी उलट आहे.

चित्रकुट येथील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेलं ‘बालाजी मंदिर’ हे १६८३ ते १६८६ दरम्यानच्या काळात औरंगजेबाच्या आदेशाने उभारण्यात आल्याचा दावा तेथील रहिवाशांकडून करण्यात येतो.

एवढंच नाही तर औरंगजेबाने या मंदिराच्या खर्चासाठी मंदिराचे पुजारी महंत बालक दास यांना मंदिराच्या परिसरातील ३३० बिघे जमीन दान म्हणून दिली होती, जिच्यावर कसलाही कर आकारण्यात येणार नव्हता, असंही सांगितलं जातं.

‘इंडिया टूडे’साठी पंकज पचौरी यांनी केलेल्या ‘चित्रकुट: ए लीगसी विथ प्राउड मुस्लीम’ या स्टोरीमध्ये या मंदिरासंदर्भातील ऐतिहासिक तथ्यांवर प्रकाश टाकण्यात आलाय.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात औरंगजेब बादशहा आपल्या फौजफाट्यासह चित्रकुट परिसरात आला होता.

चित्रकुटमधील हिंदू-मुस्लीम समुदायाला या गोष्टीचा विशेष अभिमान आहे की बालाजी मंदिराच्या उभारणीस औरंगजेबाचा हातभार लागला होता. तेथील लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात औरंगजेब बादशहा आपल्या फौजफाट्यासह चित्रकुट परिसरात आला होता.

आपल्या या सफरीदरम्यान त्याने आपल्या सैन्याला या परिसरातील सर्व मंदिरे उध्वस्त करून मंदिरातील मूर्ती नद्यांमध्ये प्रवाहित करण्याचा हुकुम  दिला होता. त्यात चित्रकुटमधील बालाजी मंदिराचा देखील समावेश होता.

औरंगजेबाच्या सैन्याने ज्यावेळी हे मंदिर पाडायला सुरुवात केली त्यावेळी अचानकच त्याच्या सैन्याच्या आणि औरंजेबाच्या देखील पोटात दुखायला सुरुवात झाली. अनेक प्रयत्न करून देखील ही पोटदुखी थांबायला तयार नव्हती. औरंगजेबाच्या शाही वैद्याच्या कुठल्याच औषधींना ही पोटदुखी दाद द्यायला तयार नव्हती.

पोटदुखीची बाधा झालेल्यांपैकी काही सैनिकांची पोटदुखी मात्र बरी झाली होती. त्यांच्याकडून असं समजलं की चित्रकुट मंदिराचे पुजारी असलेल्या महंत बालक दास यांच्या इलाजामुळे त्यांची पोटदुखी बरी झाली. नाईलाजाने औरंगजेबाला महंत बालक दास यांच्याकडे जायला लागलं आणि त्यांच्या उपचाराने औरंगजेबाची आणि त्याच्या सैन्याची पोटदुखी बरी झाली.

औरंगजेबाच्या ऐतिहासिक आदेशाची प्रत उपलब्ध.

महंत बालक दास यांच्यावर खुश होऊन औरंगजेबाने बालाजी मंदिराच्या उभारणीस हातभार लावला. औरंगजेबाने महंत बालक दास यांच्यासाठी एक लिखित आदेश दिला. या आदेशान्वये मंदिराला शाही संरक्षण प्राप्त झालं आणि आसपासच्या ८ गावांमधील ३३० बिघे जमीन महंत बालक दास यांना मंदिराच्या खर्चासाठी दान देण्यात आली.

औरंगजेबाच्या या आदेशाची प्रत आज देखील जतन करून ठेवण्यात आलेली आहे. या आदेशावर औरंगजेबाचा महसूल मंत्री सआदत खां याचा शिक्का देखील असून बेहरामंद खान याने हा आदेश लिहलेला आहे.

आदेशातील काही त्रुटी 

चित्रकुटमधील मंदिरात सध्या उपलब्ध असलेल्या आदेशाची सुरुवात ‘अल्लाहू अकबर’ने झाल्याची बघयला मिळते. पण औरंगजेबाने त्यापूर्वीच ‘अल्लाहू अकबर’ ऐवजी ‘बिस्मिल्लाह-हिर-रहमान-नीर-रहीम’ वापरायला सुरुवात केली होती. त्यामुळे या आदेशातील  ‘अल्लाहू अकबर’ प्रश्नचिन्ह उभा करतं.

आदेशाच्या मागच्या बाजूस असलेल्या ‘जिम्न’वर मुख्य आदेशातील मजकुरापूर्वीची तारीख आहे, जी इतर आदेशांमध्ये साधारणतः मुख्य मजकुरानंतरच्या तारखेच्या स्वरुपात असते.

ख्यातनाम इतिहासकार इरफान हबीब यांच्या मते आदेशातील चुका या तो आदेश जतन करताना झालेल्या असाव्यात. आदेशात चुका असल्या तरी आदेशात वापण्यात आलेली भाषा, आदेशावरचा शिक्का आणि त्याकाळातील अधिकाऱ्यांच्या नावावरून हा आदेश औरंगजेबाच्याच काळातला आहे याची मात्र खात्री देता येते.

खरंच हे मंदिर औरंगजेबाने बांधलं होतं का..?

चित्रकुटमधील बालाजी मंदिर औरंगजेबाने बांधलं असेल किंवा नाही याबद्दल खात्रीशिरीत्या काही सांगता येत नाही. हे औरंगजेबाने बांधलं असल्याचं सिद्ध करण्यासाठीचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, मात्र असं असलं तरी मंदिराची स्थापत्य शैली मुघलकालीन आहे एवढं नक्की.

मंदिर औरंगजेबाने बांधलेलं असेल किंवा नसेल परंतु हे मंदिर गेल्या कित्येक वर्षांपासून ‘हिंदू-मुस्लीम’ एकतेच्या संदेशाचं प्रतिक समजलं जातं. साधारणतः ३० वर्षांपूर्वी पंकज पचौरी यांनी जेव्हा मंदिराविषयीची स्टोरी केली होती त्यावेळी या ६५ दररोज सकाळी वर्षांपासून न चुकता मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या द्वारका प्रसाद सैनी यांनी पंकज पचौरी यांना दिलेली प्रतिक्रिया फार महत्वाची आहे.

द्वारका प्रसाद सैनी म्हणाले होते,

“जा आणि त्या आयोध्यावाल्या लोकांना सांगा की, आमचे ठाकूरजी अशा मंदिरात निवास करतात जे औरंगजेबाने बांधलं होतं आणि या गोष्टीवरून इथं कुणीच भांडत नाही”

द्वारका प्रसाद सैनींची ही प्रतिक्रिया ३ दशकांनंतर ‘मंदिर-मस्जिद’वरून भांडणाऱ्या आपल्या समाजासाठी आज देखील प्रासंगिक आहे.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Amol says

    टायटल ला प्रश्नचिन्हं लाऊन अशा प्रकारे सादर करणे चुकीचे आहे,या पुढे ईतीहास विषयी पोष्ट करतांना तुमच्याकडे संदर्भ असेल तरच पोष्ट करावी कारण अश्या भ्रमीत करणार्या पोष्ट मुळे वाचकांची दिशाभूल होणार नाही याची खबरदारी घ्या .
    धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.