गेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी कोण?

काही वर्षापूर्वीची गोष्ट . दुपारची वेळ होती. आम्ही बसने गावाला परत निघालो होतो. पुढ एक नाईनटीज कीड वाल कपल बसल होतं. नवरा बायको दोघे पण आयटीवाले वाटत होते. त्यांच्या गप्पा सुरु होत्या. तसं आम्हाला नवरा बायकोची चर्चा आईकायची खोड नाही तरी पण त्यांची गप्पांची गाडी गेम ऑफ थ्रोन्सवर आली होती. मग मात्र आमचं कान टवकारल. त्यातला बाप्या आपल्या बायकोला सांगत होता.

“अग गेम ऑफ थ्रोन्स कोण लिहिलय माहित्ये का? जॉर्ज आर आर मार्टिन. तो ना अगदी नव्वद वर्षाचा म्हातारा आहे आणि मरायला टेकलाय . कधी वेळ येईल सांगता येत नाही. “

बायको बिचारी टेन्शन मधी आली. अजून शेवटचे दोन सिझन येणार होते.

“अय्या आता सिरीयल चं काय होणार?”

बाप्या म्हणालं बघू.

ते तसं म्हंटल्यावर आपल्याला पण टेन्शन आलं.

” All men must die. “

पण नंतर लक्षात आलं, गोष्ट सांगणार नाईनटीज वाला हाय. कशावर पण विश्वास ठेवणारी ही जमात !! पँाटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग, कलिंगडाचं बी खाल्यावर डोक्यावर झाड उगवतंय, अच्छे दिन आल्यावर पंधरा लाख मिळणार असल्या सगळ्या अफवांवर हेनी विश्वास ठेवत्यात. यांच्यापैकी लई पोर शक्तिमान हुण्याच्या नादात बिल्डींगवरन उडी मारून वाया गेली.

तर याच्यावर इश्वास ठेवण्यापेक्षा गुगल वर चेक करून बघितलं. तसं काय नव्हत. सत्तर वर्षाचा हा आज्ज्या आजून फिट हाय. उद्या भांगलायला नेलं तर “ड्रकारीस” असं म्हणत चार सरी पटापट उडवील.

आता तर शेवटचा सिझन परवा सुरु होतोय. म्हातारबाबा त्यात एक छोटा रोल पण करणार आहे म्हणे. आता या डावात तो कोणा कोणाला उडवतोय , थ्रोन वर कोणाला बसवतोय सगळ्यांनाचं उत्सुकता हाय.

ते काही का असेना भिडू काय स्पोईलर घेऊन आला नाही. (आम्हाला पण माहित नाही) आम्ही घेऊन आलोय जॉर्ज आर आर आबाची कुळकथा .

तर जॉर्ज रेमंड रिचर्ड मार्टिन असं भल मोठ नाव असणारा हा आज्जा. हा काय जन्मला तेव्हा काय तो आज्जा नवता. २० सप्टेंबर १९४८ साली अमेरिकेतल्या न्यू जर्सी मध्ये तो जन्मला. त्याचे वडील एक गोदी कामगार होते. घरची परिस्थीती हलाखीची. हे कुटुंब जॉर्जच्या पणजीच्या घरात राहायचं. तिथून सरकारी स्कीममध्ये मिळालेल्या एका छोट्याशा घरात ते रहायला गेले.

जॉर्जची शाळा त्यांच्या घरापासून अगदी दोन गल्ल्या पलीकडे होती. शाळा आणि घर सोडून तो कुठेच जायचा नाही.  पैसे नसल्यामुळे अगदी सुट्टीतही त्याला कुठे सोडायचे नाहीत. जॉर्जला बाहेरच्या जगाच खूप आकर्षण होतं. पण कुठे जायलाच मिळायचं नाही. आणि त्याकाळात टीव्ही मोबाईल याचही काही फॅड नव्हत. शेवटी उरली पुस्तकं. एकलकोंड्या बनलेल्या जॉर्जने स्वतःला पुस्तकांच्या विश्वात बुडवून घेतलं.

सुट्टीच्या वेळी दिवसभर कॉमिक्स वाचणे आणि रात्रभर स्वप्नात त्यात वाचलेल्या कल्पनाच्या जगात फिरून येणे एवढाच त्याचा उद्योग चालायचा. नंतर नंतर तर जवळची सगळी पुस्तकही वाचून झाली. मग काय स्वतःच एखादी गोष्ट रचायची आणि त्यात मस्त मज्जा करायची अशी त्याला सवय लागली.

गडी जात्याच लई हुशार डोक्याचा होता आणि त्यात खोडगुणी !!

तेवढ्या लहान वयात जॉर्जला आपल्या मधल टँलेंट लक्षात आल. त्याचा वापर तो पैसे मिळवण्यासाठी करू लागला. तो भुताच्या गोष्टी तयार करायचा आणि त्या लिहून आपल्या दोस्तांना विकायचा. थोड्याच दिवसात तो त्याच्या गल्लीत पॉप्युलर झाला. छोटी पोरच नाही तर मोठी माणस देखील त्याला पैसे देऊन त्याच्या गोष्टी ऐकू लागली.

जॉर्जने लहानपणीच आपल्या स्टोरीमध्ये एक किंगडम बनवलं होत. त्याच्याकडे एक खेळण्यामधला किल्ला होता. त्याच्याशी खेळताना तो आपल्या गोष्टीशी रिलेट करायचा. आपल्या पाळलेल्या कासवाला त्या किल्ल्यात सोडायचा. हे कासव त्याच्या गोष्टीतल एक कॅरेक्टर असायचं.  पण का कुणास ठाऊक ते कासव त्या किल्ल्यात मेलं. मग जॉर्ज नवीन कासव घेऊन आला पण तेही फार दिवस जगल नाही. हा सिलसिला सुरूच राहिला. कासव मरेल तसं जॉर्ज गोष्टितल ते कॅरेक्टर देखील मारायचा.(बघा आबाला ही सवय लहानपणी लागली.)

शाळा कॉलेजमध्ये देखील त्याच्या हुशारीची चर्चा होऊ लागली. त्याने पत्रकारितेमध्ये डिग्री, पोस्ट ग्रज्यूएशन वगैरे केलं. तिथ पहिला नंबर काही सोडला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने मास्तरकीची नोकरी मिळवली. आवड म्हणून छोट्या मोठ्या मासिकात वैज्ञानिक कथा छापू लागला. एरव्ही चारचौघांप्रमाण लग्न, नोकरी मुल यात तो गुंतून गेला.

पण हे चाकोरीबद्ध आयुष्य त्याला खूप दिवस बांधून ठेवू शकलं नाही. त्याचा एक जवळचा लेखक मित्राचा अकाली मृत्यू झाला. तेव्हा जॉर्जला जाणवलं की आपण जे करतोय ते आपल्या आयुष्याच ध्येय नाही. आपण एक स्टोरीटेलर आहे. जीवन मृत्यूचं काही खर नाही. कधी वरून बोलावण येईल सांगता येत नाही. आपल्या गोष्टी आपल्याबरोबरचं निघून जातील.

त्यादिवशी जॉर्जचं आयुष्य बदललं. त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखक व्हायचं ठरवलं. तो राहत असलेल युनिव्हर्सिटी कम्पसमधील घर देखील त्यान सोडलं. कारण काय माहित आहे?? तिथे पडणारी हुडहुडी थंडी. विंटर येणार म्हणून तो मेक्सिको ला सटकला.

तिथे त्याने सँडकिंग, नाईटफ्लायर्स वगैरे कादंबरी लिहिल्या. शेक्सपियर टॉल्कीन अशा महान लेखकांचा त्याच्यावर प्रभाव होता. टोल्कीयन ने लिहिलेल्या लॉर्ड ऑफ द रिंग्ज तर त्याला स्वल्पविराम, अल्पविरामासकट पाठ होत. लेखक म्हणून त्याच नाव झालं. त्याच्या कादम्बरी चांगल्या खपल्या. त्यानंतरही त्याची बरीच छोटीमोठी पुस्तक पब्लिश झाली.

त्याच्या लेखनाची चर्चा हॉलीवूडमध्ये देखील झाली. जॉर्जला ट्वालाईट झोन, ब्युटी अँड बीस्ट अशा टीव्ही सिरीयलचं स्क्रिप्ट लिहिण्यासाठी बोलवलं गेलं. लिहायला मिळतंय म्हणून जॉर्जनं खुश होऊन ते काम स्वीकारलं. पण काही दिवसातच जॉर्जला कळाल आपलं यांच्या बरोबर जुळणार नाही. व्हायचं काय तर जॉर्जने स्क्रिप्ट लिहिली तर डायरेक्टर त्याच्या जवळ यायचा. 

“तू युद्धाचा सीन खूप  भारी लिहिला आहेस. पण तू जे लिहिलयस ते पडद्यावर दाखवायला करोडो रुपये लागतील. मला ते शक्य नाही. काही तरी नॉर्मल लिही की.”

अगदी रोज असच घडू लागलं. शेवटी त्याने आपल्या या सुखाच्या नोकरीला देखील लाथ मारली. घरात स्वतःला कोंडून घेतले. आता त्याच्याकडे भरपूर वेळ होता. त्याने ठरवलं आता आपण आपल लहानपणापासूनचं स्वप्न लिहून काढायचं.

“SONGS OF ICE AND FIRE”

मध्ययुगात घडणारी ही कथा. सात  किंग्डम. त्यांच्यात सिंहासनावर कोण बसणार याची स्पर्धा. युद्ध. राजकारण, ड्रॅगन, भूतांची सेना असं भरपूर काय काय यात होत.

त्याच्या डोक्यात खूप वर्ष ही स्टोरी तयार होती. त्यातली पात्र जॉर्जला भेटायला रोज यायची. त्याला माहित आहे लिहायला घेतलं तर हे एका महाकाव्या प्रमाणे मोठ होणार आहे. सुरवातीला तीन पुस्तक लिहायचं त्यान ठरवलं. पहिलं पुस्तक प्रकाशित करायलाचं त्याला पाच वर्ष लागली, त्या पुस्तकाच नाव होत. गेम ऑफ थ्रोन्स.

पुस्तक चांगलंचं गाजलं. जॉर्जला तेव्हाच लक्षात आलं होत. आपण हे शिवधनुष्य उचललंय. हे भूत फक्त तीन खंडात मावणार नाही. त्याने ही नॉव्हेल  सात खंडात बसवायचं ठरवलं. पुढची पुस्तकं लवकर आली.  क्लॅश ऑफ किंग्स, स्टोर्म ऑफ स्वोर्ड्स त्यानंतर फिस्ट ऑफ क्रोज. हे चौथ पुस्तक येईपर्यंत जॉर्ज न्यूयोर्कचा best seller writer बनला होता.

याच काळात त्याला भेटायला दोन तरुण आले. जॉर्ज आता दाढी वगैरे वाढवून आबा बनलाच होता. त्याने या पोरांना दरडावून विचारलं काय पाहिजे. ते दोघे चाचरत म्हणाले,

“सर आम्हाला तुमच्या सॉंग ऑफ आईस अँड फायर वर सिरीयल बनवायची आहे.”

आबाला हा प्रश्न नवीन नव्हता. गेल्या काही महिन्यापासून रोज कोणी तरी आम्ही तुमच्या स्तोरीव्र सिरीयल बनवतो, फिल्म बनवतो म्हणून येऊन टपकतचं होत. पण जॉर्ज त्यांची परीक्षा घ्यायला एक प्रश्न विचारायचा. तो प्रश्न ऐकला की सगळे पळून जायचे. तोचं प्रश्न त्याने या दोघानाही विचारला.

“माझ्या नॉव्हेल वाचल्या आहेत काय?”

दोघांनी मान डोलावली. जॉर्ज मग पुन्हा गरजला,

“मग सांगा माझ्या नॉव्हेल मधल्या जॉन स्नो या पात्राची आई कोण?”

खर तर अजून जॉर्जने देखील आपल्या पुस्तकात जॉन स्नो ची आई कोण ते सांगितलेलं नव्हत. त्या दोन्ही तरुणांनी एकमेकाच्या कानात काही तरी खुसरपुसर चर्चा केली. काही क्षणांनी जॉर्ज कदे वळून त्यातला एक जण म्हणाला,

” लायना स्टार्क”

आता आपल्या पैकी सगळ्यांनाचं माहित आहे, हे उत्तर बरोबर आहे. जॉर्ज आर आर आबाच्या डोळ्यात पाणीचं आलं. मिळाला, माझ्या गेम ऑफ थ्रोन्सना बनवणारा मिळाला.

ते दोघे म्हणजे डेव्हिड बेनीऑफ आणि डी.बी.वेईस. एचबीओसाठी त्यांनी २००७साली पहिला पायलट एपिसोड बनवला. जॉर्जच्या स्वप्नात जस होत तसाच गेम ऑफ थ्रोन्स बनवायचा प्रयत्न त्यांनी केला होता.

चॅनलवाल्यांना सुद्धा हा एपिसोड आवडला. पण याच बजेट खूप प्रचंड होतं. एकएका एपिसोडसाठी मुव्हीपेक्षा पण भरपूर बजेट लागणार होत. शिवाय सेक्स, व्हायोलन्स वगैरे भरपूर होतं. काय करायचं त्यांचा डिसिजन होत नव्हता. अखेर दोन तीन वर्ष विचार केल्यावर एचबीओने गेम ऑफ थ्रोन्स बनवायला परवानगी दिली.

१७ एप्रिल २०११ साली सिरीयल टीव्हीवर आली. आल्या आल्या दिवसापासून सिरीयलने धुमाकूळ घालायला सुरवात केली.जॉर्ज सिरीयलच्या सेटवर हजर राहून काटेकोरपणे आपल्या म्हणण्याप्रमाणे शुटींग होते का ते पाहू लागला. प्रत्येक गोष्टीत त्याच मत विचारात घेतलं गेलं. त्याचा समावेश सिरीयलचा एक्जीक्यूटिव्ह प्रोड्यूसर म्हणून होता. 

सिरीयल तर जगभर गाजलीचं शिवाय २०१२साली आलेलं डान्स ऑफ ड्रॅगन्स देखील तुफान गाजलं. पुस्तकविक्रीचे सगळे रेकॉर्डसं त्याने मोडले. त्याच आयुष्य गेम ऑफ थ्रोन्सनी व्यापून टाकलंय. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पासून दूर भारतामध्ये पक्क इंग्लिशही न येणाऱ्या तरुणांच्यात गेम ऑफ थ्रोन्सची क्रेझ आहे.

या गेम ऑफ थ्रोन्स मध्ये येणारे लाखो कॅरेक्टर्स  प्रत्येकाचा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ , यातले कोट करून भिंतीवर लावावेत असे डायलॉग, थ्रोनवर कोण बसणार, यावेळी आबा कोणाला मारणार याची चर्चा यांनी रोजचं इंटरनेट भरून वाहत असत. 

या वर्षी गेमऑफ थ्रोन्स सिरीज संपेल. याच शेवटच पुस्तक देखील येईल. या सिरीयलशी जोडले गेलेले सगळे अब्जाधीश झाले. यात आपला जॉर्ज आबा पण आहे. तो आता खरोखर सत्तरीत पोहचलाय. पण अजूनही थांबायचं लक्षण नाही .  त्याच लिखाण थांबलेलं नाहीय. त्याची पुढची पुस्तक येतायतचं.

बघू गेम ऑफ थोन्स नंतर जगाला खुळ करायला तो काय घेऊन येतोय.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Pavan says

    Mast aahe

Leave A Reply

Your email address will not be published.