हर्षवर्धन आणि सुशीलकुमार ! पहिल्या दोन करोडपतींचं काय झालं..?

हर्षवर्धन नवाथे आठवतोय का ? आणि तो सुशिलकुमार ?

हा काय विचारायचा प्रश्न झाला का..? त्यांना कोण विसरणार. एकाने ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला तर दूसऱ्याने पाच कोटी जिंकत  कहर केला.

सर्वसामान्य प्रेक्षक घरात बसून टिव्हीवरच्या पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती’ पहायचे तेव्हा प्रत्येकाला ‘मी असतो तर जिंकलोच असतो’ याची जाणिव हा टिव्ही शो करुन द्यायचां. वास्तविक पाहता हाच या टिव्ही शोचा ‘सेलिंग पॉईन्ट’ होता.

बच्चननं प्रश्न विचारला की ‘डॉलर’ नाहीतर ‘रुपा’चं बनियन घालून बसलेल्या म्हाताऱ्याच्या तोंडातनं देखील उत्तर यायचं. पुढच्यानं दहा हजार जिंकले की म्हाताऱ्याला दहा हजार मिळाल्याचा आनंद व्हायचा. म्हाताऱ्याचं ऐकलं नाही आणि चुकिचं उत्तर निघालं तर म्हातारं टिव्हीकडं बघून शिव्या द्यायचं. मीच जिंकतो या अविर्भावात बाहेर पडायचं. भारतातल्या जनतेला तुम्ही ‘बुद्धिवंत’ आहात हा विश्वास देणारा हा टिव्ही शो.

तर असो लय कौतुक झालं आत्ता पुढं. असंच एक दिवस हर्षवर्धनच्या डोक्यावर चमकीचा पाऊस पडला. एक कोटी जिंकल्यावर काय होतं ते लोकांना नव्यानं कळालं.  माणसं एका कोटीत किती ‘क्वालिस’ गाड्या विकत घेता येतील याची गणितं बांधू लागली. ज्योतिबाच्या डोंगरापासून ते भगवानगडावर जायची स्वप्न जनतेला पडू लागली. पण पुढं काय ???

हर्षवर्धन नवाथे आणि सुशिलकुमारनं या पैशाचं काय केलं ? 

पहिली गोष्ट हर्षवर्धन नवाथेची.

हर्षवर्धन नवाथे पहिला करोडपती होता. खऱ्या अर्थानं करोडपती. कारण त्याला एक कोटी मिळाले होते. बक्षीस पण एक कोटीच होतं. २००० साली म्हणजे तब्बल अठरा वर्षांपुर्वी त्याने ही रक्कम जिंकली आणि त्यानंतर त्याच्यापुढे लोकांच्या रांगा लागू लागल्या. ठिकठिकाणच्या सुपाऱ्या मिळू लागल्या. एक कोटी पण होते आणि सोबत सेलिब्रिटी झाल्याचा मान देखील होता.

मग काय हर्षवर्धनची गाडी तुफान चालली असेल…? तर तसं झालं नाही.

या एक कोटीचं त्यानं काय केलं असेल तर पहिलं त्याने घरं घेतलं. ते ही मुंबईत. जे आपण करतो तेच त्यानं केलं. त्यानंतर काय केलं तर गाडी घेतली. म्हाताऱ्याची इच्छा होती ‘क्वालिस’ घ्यावी. त्यानं कुठली घेतली माहित नाही. त्यानंतर एक चांगला निर्णय घेतला तो म्हणजे MBA करायला ब्रिटनला जायचा. आलेला पैसा त्यानं शिक्षणावर खर्च केला आणि MBA करायला ब्रिटनला गेला.

करोडपती झाल्यामुळे फेम मिळाली होता. जॉन अब्राहमसारखी मोठ्ठी माणसं त्याची दोस्त झाले होते पण त्यानं हे सगळं मागं ठेवलं. वाईट फक्त याचंच वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं IAS होण्याचं स्वप्न देखील बुडालं.

harshvardhan

त्यानं MBA केलं आणि नोकरी करायला सुरवात केली. २००७ ला लग्न केलं. सध्या ‘कलर्स मराठी’वर ‘कुंकू,टिकली आणि टॅटू’ नावाची जी मालिका सुरु आहे त्यामध्ये विभा कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ‘सारिका’ या त्यांच्या पत्नी. हर्षवर्धन सध्या ‘महिंद्रा एंड महिंद्रा’च्या (CSR & इथिक्स) डिपार्टमेंन्टचे हेड म्हणून काम बघताहेत. ‘केबीसी’त मिळालेले पैसे शिक्षणासाठी वापरून त्यांनी एक चांगलं उदाहरणं तुमच्यासमोर ठेवलचं आहे.

आता दूसरा करोडपती सुशिलकुमार ! ते कंगाल झालेत का ? 

सुशिलकुमार यांनी किती रुपये जिंकले होते तर तब्बल पाच कोटीं. पाच कोटी छोटी रक्कम नसते फक्त टॅक्स कट व्हायला नको होता. तर टॅक्स कटून सुशिलकुमार यांच्या हाती आलेली रक्कम होती जवळपास साडेतीन कोटींच्या घरात.

त्यांनी या पैशाचं काय केलं..? तर ‘सध्या त्यांच्या अकाऊंट मध्ये रुपया पण नाही’ असं त्यांनीच सांगितलं होतं. त्यानंतर कहर झाला. बातम्या लागल्या. सुशिलकुमार यांचा फाटक्या बनियनवरचा फोटो ठिकठिकाणी छापून आला !

तर तो किस्सा की सुशिलकुमार नितीशकुमारांच्या रॅलीमध्ये गेले होते. कारण तेच सेलिब्रिटी झालं की सुपाऱ्या मिळू लागतात. तशीच एक सुपारी होती. कार्यक्रम पण चांगला होता म्हणून ते गेले. तिथं एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की ‘तुम्ही राजकारणात येणार का ?’ सुशीलकुमार नाही म्हणाले.

ख्याली खुशाली  जाणून घेणारे प्रश्न विचारून झाले पण बातमीमुल्य तयारच होतं नव्हतं. तेव्हा पत्रकाराने विचारलं की सध्या किती रक्कम आहे अकाऊंटवर ? तुम्हाला कुणी विचारलं तर तुम्ही तरी खरं सांगता का ? सुशीलकुमारनं तरी का खरं सांगावं…? तो म्हणाला ‘शुन्य रुपये’ !!! 

झालं ! बातमी मिळाली !! छापली !!!

सुशीलकुमार कंगाल झाल्याची बातमी छापली गेली आणि एकच दंगा सुरू झाला. त्यानंतर सुशिलकुमारनेच वर्तमानपत्रांना मुलाखती दिल्या. त्यामध्ये त्यानं सांगितलं, “सगळं चांगल चालूय ! आत्ता तुमचं तुम्ही बघा !!”

सुशिलकुमार होता बिहारचा. बिहारच्या चंपारण्य भागातला. तोच गांधीजींचा एरिया. तर त्या भागातून असं व्यक्तिमत्व बाहेर पडल्यावर तो साहजिकच सेलिब्रिटी झाला.

त्यानं पहिल काम केलं ते विणा वाजवायचं. ते कशासाठी तर ही कला जपण्यासाठी.

sushil kumar

झालं असं की त्याच्या गावात विणा वाजवणारा एकच व्यक्ती शिल्लक राहिला होता. तोच सुशीलकुमारला म्हणाला, “तू सेलिब्रिटी झालायस तर शिकून घे. तुझं बघून लोकं शिकतील, नाहीतर ही कला संपून जाईल.” सुशिलकुमारनं शिकून घेतलं.

आलेल्या पैशातून दिल्लीत गाड्या भाड्याने लावल्या. ‘ओला-उबेर’साठी त्या गाड्या आजही उपलब्ध आहेत. त्यानंतर त्यानं ‘दिल कौ छू लेंने वाला’ टाईप दुसरं काम केलं. ‘चंपारण्य’ प्रसिद्ध होतं ते ‘चंपा’ झाडांसाठी. त्यानं काय केलं तर चंपारण्यमध्ये चंपाची झाड लावण्याबाबत चळवळ सुरू केली. त्यावेळी चंपारण्यमध्ये चंपाचं एकही झाडं शिल्लक राहिलं नव्हतं.

सुशीलकुमारच्या चळवळीमुळं घराघरात झाडं लागली आणि चंपारण्य पुन्हा तयार झालं. 

यात पैशाचं काय तर त्याचे पैसे तसेच आहेत. तो म्हणतो, “भावाला गाडी घेऊन  दिली. सगळ्यांना कामाधंद्याला लावलं. गावातल्या १०० मुलांचं शिक्षण संभाळतो आणि ‘प्यासा’ बघतो.” ‘प्यासा’ का तर ‘प्यासा’ त्याच्या आवडीचा पिक्चर आहे. त्याची बायको त्याला म्हणते, “ ‘प्यासा’ बघुन बघुन तुमचाच ‘प्यासा’ झालाय”

काहीही असो पण काम तर भारीच करतो की तो ! 

असो आता दहावा सिझन येतोय. आता पण लोकं करोडपती होतीलचं. हल्ली म्हाताऱ्याला ‘शो’ मधली ‘गंम्मत’कळाल्यामुळं तो जोतिबाच्या डोंगरावर ‘क्वालिस’ घेऊन जायची स्वप्न बघत नाही इतकंच काय ते चांगल झालंय. बाकी शुभेच्छा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.