राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी भारतीय सैन्याची सर्वात जुनी रेजिमेंट !

भारताचे राष्ट्रपती हे सैन्याच्या तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. देशाचे प्रथम नागरिक असल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी घोडदळाची एक स्पेशल तुकडी तैनात असते. अतिशय खडतर प्रशिक्षण घेतलेले शूर पॅराट्रुपर जवान ह्या रेजिमेंटचा भाग आहेत. जाणून घेऊयात अंगरक्षकांबद्दलच्या  काही खास गोष्टी.

‘राष्ट्रपतींचे अंगरक्षक दल’ ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित रेजिमेंट समजली जाते. १७७३  साली ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर ‘वॉरेन हेस्टिंग्ज’ याने या रेजिमेंटची सुरुवात केली होती. हेस्टिंग्जने मुघल घोडदलातील ५० सैनिकांना अंगरक्षक म्हणून निवडून त्यांच्या तुकडीला  “गव्हर्नर्स  ट्रूप ऑफ मुघल्स”  असे नाव दिले.

याच तुकडीत बनारसच्या राजाने दिलेल्या ५०  सैनिकांची भर घालण्यात येऊन पुढे रेजिमेंटचे   “गव्हर्नर जनरल्स बॉडी गार्ड” (GGBC) असे नामकरण करण्यात आले. त्याकाळातील  संन्याशांचा उठाव, रोहिल्याचं बंड, टिपू सुलतान विरुद्धची लढाई, इजिप्त, ब्रम्हदेश  अशा अनेक युद्धात या रेजिमेंटने भाग घेतला.

parade

१८५९ भारतावरील इस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपुष्टात येऊन ब्रिटिश राणीच्या  सरकारचा  अंमल सुरु झाला. त्यावेळी या रेजिमेंटला ‘व्हॉईसरॉयचे बॉडीगार्ड’ म्हणून  संबोधण्यात येऊ लागलं. मात्र तरी देखील खरी ओळख GGBG अशीच राहिली.

विशेष म्हणजे या ‘GGBG’ या संबोधनामागे देखील एक अतिशय रंजक किस्सा आहे. किस्सा असा की या रेजिमेंटमध्ये भरती होण्यासाठी  सैनिकाची उंची ६ फुट किंवा त्यापेक्षा अधिक असणे बंधनकारक होते. त्यामुळे या रेजिमेंटमधील बहुतेक सैनिक हे अतिशय उंचेपुरे, सदृढ आणि देखणे होते. त्यामुळे ब्रिटिश अधिकारी त्यांना “God’s Gift to Beautiful Girls” अर्थात ‘GGBG’ म्हणत असत.

या तुकडीमध्ये प्रामुख्याने जाट शीख आणि मुस्लिम समाजातील सैनिकांची भरती करण्यात येत असे. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना देशाची फाळणी करून देशाचे दोन तुकडे केले. त्यावेळी व्हाइसरॉयच्या अंगरक्षकांची सुद्धा विभागणी झाली. मुस्लिम बॉडीगार्डनी पाकिस्तानात जायचा निर्णय तर जाट शीख  बॉडीगार्ड भारतात राहिले. पण इथेही एक मोठा वाद उभा राहिला.

baggi
हीच ती प्रतिष्ठेची बग्गी जिच्यासाठी मोठा वाद झाला !

वादाचं मूळ होतं व्हॉईसरॉयची प्रतिष्ठेची  सोन्याचा मुलामा असलेली बग्गी. ही बग्गी नेमकी ठेवायची कुणाकडे..? दोन्हीही देशांना ती आपल्याकडे हवी होती. अखेरीस नाणेफेकीच्या मदतीने या वादावर तोडगा काढण्यात आला. भारताच्या लेफ्टनंट कर्नल ठाकुरसिंघनी यांनी  टॉस जिंकला आणि ही बग्गी भारताला मिळाली. आजही ती बग्गी राष्ट्रपतींच्या सवारीची शान वाढवते.

सद्यस्थितीत या  रेजिमेंटला “प्रेसिडेंशिअल बॉडी गार्ड” (PBG) म्हणून ओळखलं जातं. प्रजासत्ताक दिन, राष्ट्रपतींचे दोन्ही सभागृहापुढील अभिभाषण, परदेशी राष्ट्रप्रमुखांची भेट अशा अनेक महत्वाच्या कार्यक्रमप्रसंगी या रेजिमेंटचे संचलन होते. निळी सोनेरी पगडी, लाल किंवा पांढऱ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घालून हे जवान रुबाबदार घोड्यावरून बसून दिमाखात  संचालन करतात त्यावेळी डोळ्यांचे पारणे फिटते.

ramnath kovind
चंदेरी तुतारी देऊन सैनिकाचा गौरव करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद !

संचालनाच्या वेळी शांततेचे व त्यागाचे प्रतीक म्हणून सैनिकांच्या हातात हातात भाला असतो. दर शनिवारी व रविवारी राष्ट्रपती भवनात ‘जयपूर कॉलम’समोर रक्षकांच्या बदलाचा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम सामान्य नागरिकांसाठी खुला असतो.  राष्ट्रपती आपल्या कारकिर्दीत एका अंगरक्षकाला उत्कृष्ट सेवेसाठी ‘चंदेरी तुतारी’ देऊन त्याचा सन्मान करतात.

ही रेजिमेंट फक्त राष्ट्रपती भवनातील समारंभाची शान वाढवण्यासाठीच नसून ‘सियाचीन ग्लेशियर’ सारख्या खडतर ठिकाणी बॉर्डरचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. शिवाय  अनेक युद्धांमध्ये या रेजिमेंटने मोठा पराक्रम गाजवलेला आहे. श्रीलंका, सोमालिया, अंगोला या देशात ‘शांतिसेना’ म्हणून देखील काम त्यांनी केले आहे.

या रेजिमेंटला जावा, आवा, महाराजपुर, फिरोजशहा असे अनेक युद्ध सन्मान मिळालेले आहेत. सध्या ह्या दलात ४ ऑफिसर्स, २० ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स आणि १९८ घोडेस्वार असे दोनशेपेक्षा अधिक सैनिक तैनात आहेत.

जवळपास अडीचशे  वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या आणि आपल्या सैन्याचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रपती अंगरक्षक दला’वर ‘नॅशनल जिओग्राफिक’ या वाहिनीने एक माहितीपट बनवला आहे.

हे ही वाचा भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.