कुस्ती आणि क्रांतिकार्याची परंपरा हातात हात घालून उभं असलेलं कुंडलचं कुस्ती मैदान

सांगली जिल्ह्यातील कुंडल म्हणजे स्वातंत्र्याच्या धगधगत्या क्रांतीपर्वाचा साक्षीदार. प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांची ही राजधानीच. इंग्रज सरकारच्या विरोधातली अनेक खलबत इथे शिजली. या गावात शिरण्याचं  ब्रिटिश पोलीसांच धाडस होत नव्हतं. घराघरात भारतभूमीसाठी लढणारे शूर मावळे ही कुंडलची परंपरा.

याच कुंडलच्या भूमीची आणखी एक परंपरा म्हणजे कुंडलच जगप्रसिद्ध कुस्ती मैदान.

गेली ९६ वर्ष हे कुस्ती मैदान भरवलं जातंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या साक्षीने पहाडाच्या पायथ्याशी हे मैदान उभारलेले आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कुस्त्यांचा कुंभमेळावा भरला जातो.

जागतिक दर्जाचे मल्ल आखाड्यात एकमेकांशी झुंजत आहेत आणि लाखो प्रेक्षक या निसर्गरम्य मैदानात हा नजारा पहात आहेत असे ते थरारक दृश्य पहाणे हीच एक पर्वणी असते. कडाडणाऱ्या हलगीच संगीत कुस्तीच्या रोमांचात वाढ करत असते.

लाल मातीत कुस्ती खेळणाऱ्या प्रत्येक मल्लाला  एकदा तरी कुंडलला जाऊन लाखो रसिकांच्या समोर आपले कौशल्य दाखवून त्यांची वाहवाह मिळवू अशी महत्वाकांक्षा असते. क्रिकेट मध्ये जसे लॉर्डस आणि इडन गार्डन या मैदानांना महत्व आहे. त्याप्रमाणेच कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या खासबाग च्या खालोखाल या कुंडल कुस्ती मैदानाला महत्व आहे. खासबाग वरच्या कुस्तीला शाहू महाराजांमुळे संस्थांनी परंपरा आहे पण कुंडलचे कुस्ती मैदान पूर्णपणे लोकाश्रयावर उभे राहिले आहे.

आजही पूर्णपणे लोकवर्गणीतून या कुस्तीच्या विजेत्यांना बक्षीस दिले जाते. या भागातल्या शेतकऱ्यांनी एकदा अभिनव कल्पना मांडली की विजेत्या मल्लाला मानाच्या गदेबरोबर ट्रॅक्टरसुद्धा द्यायचा. पुढे पूर्ण भारतभर ही प्रथा रूढ झाली. देशातलं पहिलं ओपन थिएटर महिला मल्लयुद्ध इथेच खेळवण्यात आलं.

क्रांतीकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंडलच कुस्ती मैदान क्रांतीकार्यापासून दूर कसे राहील. कुंडलच्या पहिलवानानीच खर तर प्रतिसरकारची चळवळ उचलून धरली. गावाच्या पूर्वेला असलेल्या गौतमगंगाओढ्याच्या काठी एका विस्तीर्ण वटवृक्षाच्या खाली बांधलेल्या “व्यायामशाळेमध्येच” प्रतिसरकारचे मुख्य सचिवालय होते.

तुफान सेना म्हणून उभारलेल्या क्रांतिकारकांच्या सेनेचे प्रशिक्षण येथे दिले जाई. जी.डी. बापू लाड, रामभाऊ लाड, आकाराम पवार, शंकरराव जंगम आणि प्रतिसरकारचे सर्वेसर्वा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इथूनच चळवळीची सूत्रे हलवली.

स्वातंत्र्य मिळवल्यावरही हे कुंडलच्या पहिलवानानी चळवळ सोडली नाही. हैद्राबाद मुक्ती संग्राम , गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये युद्धआघाडीवर लढण्यासाठी हे तरूण पुढे राहिले. यातल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण म्हणूनच कुंडलच्या कुस्ती मैदानाचे नाव “महाराष्ट्र कुस्ती मैदान” असे ठेवण्यात आले. चळवळीच्या धामधुमीतही या क्रांतिकारकांच कुस्तीवरचं प्रेम कधी माग पडलं नाही.

तुफानसेनेचे कॅप्टन राम भाऊ लाड यांचं जादुई समालोचन ही तर कुंडलच्या कुस्तीची ओळख होती.

शाब्बास र माझ्या वाघरया” अशी  कॅप्टन भाऊ यांची सिंह गर्जना झाली की हरणारया पैलवानाला सुद्धा ताकद येऊन आपल्या पेक्षा दुप्पट तगड्या मल्लाला तो भिडत असे.  एकेकाळी बॉम्ब आणि गोळ्याबंदुकामध्ये खेळणारे  कॅप्टन भाऊ लाड यांची मुलुखमैदान तोफ कित्येक वर्ष मैदान गाजवली. आज ९७ वर्षी प्रकृती साथ देत नसली तरी नाना पाटलाचा हा छावा कुस्ती मैदानावर काही वेळा साठी का होईना पण हजेरी लावतो. त्याला बघून “कुंडलचा म्हातारा है की लगा अजून.” असे उद्गार प्रेक्षकांतून निघतात.

46350456 773205699692674 1363189496962613248 n
कुंडल मध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती लावताना कॅप्टन राम भाऊ लाड

हळूहळू ती पिढी काळाच्या पडद्याआड जात आहे. आज राम भाऊ लाड यांची तुफानी कॉमेंट्री तिथ ऐकायला मिळत नाही. आज्ज्याच्या खांद्यावर बसून कुस्ती बघायला येणाऱ्या नातवंडाना हिंदकेसरी मारुती मानेच्या कुस्तीच्या कथांबरोबर  जीडी बापू, नाना पाटलानी गिल्बर्टच्या नाकावर टिच्चून ताकारीला ट्रेन लुटलीच्या कथा सांगितल्या जातात का माहित नाही.

“कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही” असं म्हणतात. तिथं गेल्याशिवाय अनुभवता येणार नाही हेच खरं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.