अरे तो “मनसेचा दाढीवाला” सेनेत गेला..

काही महिन्यांपुर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मुंबईमध्ये एक रिक्षावाला किरकोळ कारणाने एका तरुणाला मारहाण करत असलेला हा व्हिडीओ. आपल्यापैकी प्रत्येकाने तो whatsapp फेसबुक अशा समाजमाध्यमांवर पाहिला. त्या व्हिडिओमधल्या रिक्षाचालकाच्या या वागण्यापुढे बघे देखील हतबल होते आणि तो व्हिडीओ पाहणारे आपण देखील.

आजकाल रिक्षावाले खूप मुजोर झालेत असे टिपिकल डायलॉग मारून आपण आपल्या कामाला लागलो. पोलिसांनी देखील त्या रिक्षावाल्याला शोधायचे विशेष प्रयत्न केले नाहीत. आणि घडलंही तसचं.

घटनेच्या दोनच दिवसात त्या रिक्षावाल्याला शोधण्यात आलं. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं पण त्या पूर्वी एक व्हिडीओ बनवण्यात आला. त्यात एक धिप्पाड दाढीवाला माणूस दिसला.

लोकांनी तो व्हिडीओ पाहीला, अनेकांना आठवलं अरे हा तोच मनसेचा दाढीवाला आहे जो नेहमी चुकीच काय दिसलं की जावून सरळ फोडून येतो. व्हिडीओची सुरवातच होते,

“नमस्कार मी महाराष्ट्र सैनिक नितीन नांदगावकर.”

पण काल रात्री पासून एका गोष्टीत बदल झाला. कारण मनसेचा तो दाढीवाला शिवसेनेत गेला. 

आत्ता प्रत्येक व्हिडीओची सुरवात असेल, 

“नमस्कार मी शिवसैनिक नितीन नांदगावकर”

नितीन नांदगावकर यांना आपण सोशल मिडीयावर कायदा हातात घेऊन लोकांना न्याय मिळवून देताना पाहिलं आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मतमतांतरे असू शकतात पण त्यांच्या उद्देशाच्या पाठीशी मात्र अनेक जन उभे असलेले पहावयास मिळत आहेत.

सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो हे नितीन नांदगावकर आहेत तरी नेमके कोण?

नितीन मधुकर नांदगावकर. गेली अनेक वर्ष कुर्ला इथे ते समाजकार्य करतात. ते मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस होते.

आजचे युग हे सोशल मिडियाचे युग आहे. या अख्ख्या महाराष्ट्रात आज सोशल मिडीयाचा सर्वात इफेक्टिव्ह वापर करून लोकांपर्यंत पोहचलेला कोण नेता असेल तर तो म्हणजे नितीन नांदगावकर.

साधारण दोन वर्षापूर्वी त्यांनी पहिल्यांदा कुर्ल्याच्या भुयारी मार्गाचा प्रश्न फेसबुकच्या माध्यमातून सर्वांच्यापर्यंत मांडला. तो भुयारी मार्ग पंधरावर्षे तयार होऊन ही वापराविना पडून होता. या भुयारी मार्गाचा वापर दारुडे गर्दुल्ले यांच्या अड्ड्यासाठी होत होता.

मनसेचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून नितीन नांदगावकर यांनी उठवलेला आवाज फेसबुकमुळे सगळ्यांच्यापर्यंत पोहचला. यामुळे नितीन नांदगावकर यांना आत्मविश्वास मिळाला की फेसबुक युट्युबसारख्या समाजमाध्यामाचा वापर करून आपण सहज लोकांपर्यंत आपलं कार्य पोहचवू शकतो.

यानंतर मनसे वाहतूक सेनेची जबाबदारी मिळाल्यावर उत्तरभारतीय टॅक्सीचालक, रिक्षावाले, बेकायदेशीर वाहतूक करणारे अशा अनेकांना त्यांनी धडा शिकवला आणि त्याचा व्हिडीओ बनवून फेसबुकवर देखील टाकला. जनतेचं रक्त पिणाऱ्या निष्ठुर अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये रक्तदान करून अभिनव आंदोलन केले.

वेळप्रसंगी गैरवर्तन करणाऱ्याला ठोकायला सुद्धा मागे पुढे ते पाहत नाहीत. पोलीस आणि कायदाव्यवस्था त्यांना दिलेली जबाबदारी जर योग्य पद्धतीने पार पाडत नसतील तर कायदा हातात घेण्याचा अधिकार आपल्याला आहे असे त्यांचे स्पष्ट मत आहे.

“चुकीला माफी नाही.”

हे नितीन नांदगावकरांच ब्रीदवाक्य आहे. त्यांनी आपला मोबाईल नंबर फेसबुक वर ठेवला आहे आणि लोकांना आवाहन केले आहे कि रात्री अपरात्री कधीही संकटप्रसंगात मदत लागली तर मला फोन करा.

यासाठी त्यांना अनेकदा जेल मध्ये देखील जावे लागले आहे. ते गंमतीने म्हणतात की मी घरी कमी आणि पोलीस स्टेशन कोर्टात जास्त असतो. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या घरच्यांचा देखील त्यांना पाठिंबाचं आहे.

काही वेळा त्यांच्यावर आरोप होतो कि ते फक्त उत्तर भारतीयांना टार्गेट करतात. पण नांदगावकरानी एकदा गरीब युपी बिहारच्या मुलांना अखाती देशात नोकरी देतो म्हणून बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. हे रॅकेट चालवणाऱ्या त्यांनी कानफटवल. गेल्या वर्षी ओला उबेर ड्रायव्हरांच्या प्रश्नासाठी देखील त्यांनी आंदोलन केलेलं आंदोलन गाजलं.

त्यांच्या या आंदोलनाबद्दल राज ठाकरेंच काय मत आहे हे त्यांना विचारण्यात आलं होते. तेव्हा नांदगावकर म्हणाले,

“राजसाहेब माझे व्हिडीओ आवर्जून बघतात आणि त्यांनी एका मिटिंग मध्ये माझं विशेष कौतुक करून इतर कार्यकर्त्यांना देखील असचं कार्य केलं पाहिजे असं सांगितलं”

एकेकाळी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या खळखटयाकने मुंबई गाजवली. मनसेचे नितीन नांदगावकर यांच्यासारखे कार्यकर्ते याच वाटेने पुढे आले. आत्ता ते शिवसैनिक झाले. ते जे करतात तो मार्ग बरोबर चुकीचा ही गोष्ट वेगळी पण मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात जर मुलभूत गोष्टींसाठी जनतेला कायदा हातात घ्यावा लागत असेल तर काही तरी चुकीच घडत होतं व नितीन नांदगावकर त्याला वाचा फोडत होते हे मान्य करावच लागतं. आत्ता सेनेत त्यांची तोफ तशीच वाजते का पाहणं महत्वाच ठरणार आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. भिमराव says

    मनसे कार्यकर्ते आद. नितीनजी नांदगावकर साहेब यांच्या बरोबर भेट महत्वाच्या कामानिमिताने भेट घ्यायची आहे. भेट मिळावी ही नम्र विनंती. धन्यवाद!

Leave A Reply

Your email address will not be published.