प्लाझ्मा संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळून जातील..

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आजारावर असंख्य केसेस मध्ये यशस्वीपणे लागू झालेली एक उपचार पद्धती म्हणजे प्लाझ्मा थेरपी. प्लाझ्मा थेरपी बाबत लोकांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हा लेख म्हणजे त्याबाबतचाच एक खुलासा आहे.

प्लाझ्मा म्हणजे काय ?

आपले रक्त अनेक घटकांपासून बनलेले असते, प्लाझ्मा देखील त्यातलाच एक घटक आहे. रक्तातील इतर घटक जसे की लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स, इ. घटक रक्तापासून वेगळे केले असता खाली जे काही शिल्लक राहील त्याला सोप्या भाषेत आपण प्लाझ्मा म्हणतो. आपल्या शरीरातील एकूण रक्ताच्या ५५% भाग ह्या प्लाझ्मा ने व्यापलेला असतो.

काय आहे कोरोना आजारात वापरली जाणारी प्लाझ्मा थेरपी ?

जेव्हा एखादी व्यक्ती कोरोना आजारातून ठणठणीत बरी होते, तेव्हा त्याच्या शरीराने स्वतःच्या प्रतिकारक्षमतेच्या जोरावर कोरोनाच्या विरोधात लढणारी एक फौज निर्माण केलेली असते. त्या फौजेने शरीरात शिरकाव केलेल्या कोरोनाच्या सर्व विषाणूना हरवून त्याला सहीसलामत बाहेर काढलेले असते. त्या फौजेला आपण अँटीबॉडीज असे म्हणतो.

ही विजयी झालेली अँटिबॉडीज नामक फौज जेव्हा प्रतिकारक्षमता कमी असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या एखाद्या गंभीर रुग्णाच्या शरीरात सोडली जाते तेव्हा तिच्या अनुभवाच्या जोरावर ती फौज त्या गंभीर आजारी शरीरात देखील कोरोना विषाणूला हरवण्याची क्षमता बाळगून असते. किंबहूना आतापर्यंत अनेक गंभीर आजारी व्यक्तींमध्ये ती यशस्वी ठरली आहे.

याच उपचार पद्धतीचे नाव प्लाझ्मा थेरपी असे आहे.

हा प्लाझ्मा मिळतो कुठे ?

सोपंय.. कोरोनातुन ठणठणीत बरा होऊन २८ दिवस पूर्ण झालेला कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात हा अँटीबॉडीयुक्त प्लाझ्मा मिळू शकतो. अशी व्यक्ती जवळच्या कुठल्याही ब्लड बँकेत जिथे प्लाझ्मा डोनेशनची सुविधा उपलब्ध आहे त्याठिकाणी जाऊन प्लाजमा डोनेट करू शकते.

प्लाझ्मा डोनेट कुणी करावा ?

कोरोना झालेला व्यक्ती ज्याचा RTPCR रिपोर्ट पोजिटिव्ह आला होता. आणि ज्याची २८ दिवसानंतर RTPCR टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे असा व्यक्ती सुरक्षित प्लाझ्मा डोनर समजावा.
गंभीर आजाराने पीडित असलेल्या व्यक्ती, रक्तक्षय असलेल्या व्यक्तींनी प्लाजमा डोनेट करू नये.

प्लाजमा कसा घेतला जातो ?

प्लाजमा डोनेशन हे रेग्युलर ब्लड डोनेशनसारखेच असते, फक्त यात प्लाजमा सेपेरेशनसाठी एक वेगळी मशीन असते, ज्यात तुमच्या शरीरातला फक्त प्लाजमा घेतला जातो आणि रक्तातील बाकीचे घटक परत शरीरात सोडले जातात.

प्लाजमा डोनेशनमुळे शरीराला कमजोरी येऊ शकते का ?

स्वस्थ पुरुषाच्या शरीरात त्याच्या वजनाच्या प्रति किलो ७६ मिली आणि स्वस्थ स्त्रीच्या शरीरात वजनाच्या प्रति किलो ६६ मिली इतके रक्त असते. म्हणजे एखाद्या ५० किलो पुरुषाच्या शरीरात ७६ × ५० = ३८०० मिली म्हणजे ३.८ लीटर इतके रक्त असते. अशा व्यक्तिमधून सरासरी ३५० मिली रक्त घेतले जाते. उरलेलं सगळं रक्त त्या व्यतिच्या शरीरातच राहतं. प्लाजमा डोनेट केल्यानंतर नवीन प्लाजमा तयार होण्यासाठी जास्तीत जास्त २४ ते ४८ तास पुरेशे असतात. त्यामुळे शरीराला थकवा येईल कमजोरी येईल ह्या सगळ्या बिनबुडाच्या गोष्टी आहेत.

महिनाभरात तुम्ही २ वेळा प्लाजमा डोनेट करू शकता. आणि या प्लाजमाने किमान ४ लोकांचा जीव वाचू शकतो.

डोनर कुठे शोधावा ?

सोशल मीडियावर प्लाजमा डोनर हवे आशा प्रकारचे खूप सारे मॅसेजेस पाहायला मिळतायत. यात गोंधळून जाण्यासारखे काहीही नाही. तुमच्या आजूबाजूला पाहिल्यास शेकडो कोरोनातून बरे झालेले रुग्ण पाहायला मिळतील. तेच आपले डोनर आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना या सगळ्या बाबी व्यवस्थित समजून सांगायची. जनजागृतीची. या सर्व मिळून एकजूट होऊया आणि कोरोनाला हरवूया.

  • डॉ सुरज सुनील मोटे, उस्मानाबाद.

soorajmote@gmail.com

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.