त्यांनी भारताचं भल-मोठ्ठ संविधान शब्दशः लिहून काढलं !

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९४९ साली याच दिवशी संविधान सभेने भारताच्या संविधानाचा स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आलं.

भारतीय संविधानाच्या मसुद्याच्या निर्मितीसाठी दि. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मसुदा समितीने या संविधानाचा मसुदा तयार केला. संविधानाचा स्वीकार केल्यानंतर भारत प्रजासत्ताक देश म्हणून उदयास आला.

मूळ प्रतीमध्ये ३९५ कलमांचा समावेश असलेलं भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं संविधान समजलं जातं. पण आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल की संविधानाची पहिली प्रत ज्यावेळी तयार झाली, त्यावेळी ना ती टाईप करण्यात आली होती ना ती छापण्यात आली होती. तर एका माणसाने संपूर्ण संविधान आपल्या हातांनी लिहिलं होतं. संविधानाच्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील दोन्हीही प्रती प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहून काढल्या होत्या.

प्रेम बिहारी नारायण रायजादा.

प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचा जन्म दिल्लीचा. लहानपणीच त्यांच्यावरील आई आणि वडिलांचं छत्र हरवलं होतं. त्यामुळे त्यांचे आजोबा मास्टर रामप्रसाद सक्सेना यांनीच त्यांना लहानचं मोठं केलं. मास्टर रामप्रसाद हे प्रख्यात कॅलीग्राफर आणि इंग्रजी तसेच पर्शियन भाषेचे जाणकार होते. त्यांनीच प्रेम बिहारी यांना कॅलीग्राफी शिकवली होती.

संविधान सभेने ज्यावेळी संविधानाच्या अंतिम मसुद्याला मंजुरी दिली त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना कुणीतरी प्रेम बिहारी आणि त्यांच्या कॅलीग्राफीमधील कौशल्यविषयी सांगितलं. त्यावेळी नेहरू स्वतः प्रेम बिहारी यांच्याकडे गेले आणि त्यांनी देशाचं संविधान लिहावं, अशी त्यांच्याकडे विनंती केली.

constitution

नेहरूंनी टाकलेली ही जबाबदारी हा आपला गौरव असल्याचीच त्यांची भावना होती, त्यामुळे अतिशय आनंदाने त्यांनी ती स्वीकारायची तयारी दर्शवली. त्यानंतर नेहरूंनी त्यांना विचारलं की,

“या कामाचा मोबादला म्हणून आपण काय घेणार..?”

त्यावर उत्तर देताना प्रेम बिहारी म्हणाले,

“ या कामाच्या बदल्यात मला काहीही नकोय. देवाने मला सगळं काही भरभरून दिलंय. माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे. फक्त माझी एक  विनंती आहे की संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं आणि शेवटच्या पानावर माझ्या आजोबांचं नाव असावं.”

कलेची आणि प्रतिभेची कदर करणाऱ्या नेहरूंना प्रेम बिहारी यांची ही विनंती मान्य करण्यात काहीच अडचण नव्हती. त्यांनी प्रेम बिहारी यांची विनंती मान्य केली आणि लवकरात लवकर काम सुरु करण्याविषयी सांगितलं.

प्रेम बिहारी यांना सध्या ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तत्कालीन कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये एक रूम देण्यात आली. संपूर्ण संविधान लिहून काढायला त्यांना जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लागला आणि प्रेम फौंडेशननुसार ३०३ नंबरच्या ४३२ निब या लिखाणासाठी वापरल्या गेल्या.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.