भारताची गुप्तचर संघटना ‘RAW’ चा जन्म या एकाच व्यक्तीच्या विश्वासातून झाला होता…!!!

भारतीय गुप्तचर संस्था आणि या संस्थेसाठी काम करणारे गुप्तहेर अधिकारी यांच्या आयुष्यावरील अनेक चित्रपटांची निर्मिती बॉलीवूडमध्ये झालेली आहे. नुकताच येऊन गेलेला ‘राझी’ असेल किंवा काही दिवसांपूर्वीचा ‘एक था टायगर’ असेल असे  कितीतरी उदाहरणे त्यासाठी सांगता येतील. पण हे चित्रपट ज्या ‘रॉ’ अर्थात ‘रिसर्च अँड अँनालिसिस विंग’ या भारतीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित आहेत त्या संस्थेबद्दल आपल्यापैकी अनेकांना फारशी माहिती नाही. आज ‘माहितीच्या अधिकारात’ जाणून घेऊयात ‘रॉ’विषयी आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर नाथ काव यांच्याविषयी.

स्थापना कधी व कशी झाली…?

साल होतं १९६८.

देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होत्या इंदिरा गांधी. तोपर्यंत भारतात खास हेरगिरीसाठी म्हणून कुठली संस्था अस्तित्वात नव्हती. ‘इंटेलिजन्स ब्युरो’अर्थात आयबी  तोपर्यंत अशाप्रकारचं काम बघत होती. तत्पूर्वी १९६२ सालच्या चीनविरुद्धच्या युद्धात भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. या पराभवास जबाबदार असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शत्रुपक्षाच्या सशक्त आणि कमजोर बाजूची माहितीच भारताकडे नव्हती.आपल्या सुरक्षा यंत्रणा ती मिळविण्यात अयशस्वी ठरल्या होत्या.

१९६५ च्या युद्धानंतर देखील भारतीय सैन्यदलाचे प्रमुख ज्योयांतो नाथ चौधरी यांनी गुप्तचर संस्थांकडून अधिकच्या माहितीची मागणी केली होती. ही सर्व परिस्थिती बघता देशाची एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी एका वेगळ्या संस्थेची गरज इंदिरा गांधींना भासत होती. त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोचं विभाजन करून एक वेगळी संस्था स्थापन करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घेतला.या संस्थेवर प्रामुख्याने परदेशात घडणाऱ्या घडामोडीवर नजर ठेऊन सरकारला त्यासंदर्भातील माहिती देण्याची जबाबदारी असणार होती.

संस्थेच्या स्थापनेसाठी इंदिरा गांधींनी पाचारण केलं रामेश्वर नाथ काव यांना. काव यांच्यावर इतर देशातील गुप्तचर संस्थांच्या कार्यशैलीचा अभ्यास करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याच नेतृत्वाखालील साधारणतः २५० अधिकाऱ्यांच्या तुकडीने जगभरातील नामांकित गुप्तचर संस्थांचा अभ्यास करून आपला अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारेच दि. २१ सप्टेबर १९६८ रोजी एका नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली.

संस्थेला  ‘रिसर्च अँड अँनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’ असं नांव देण्यात आलं.

कोण होते रामेश्वर नाथ काव..?

r n kao
रामेश्वर नाथ काव

भारताचे मास्टर स्पाय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामेश्वर नाथ काव यांच्या नावाला भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात फार महत्वाचं स्थान आहे. ‘रॉ’चे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करण्यापूर्वी काव यांनी आय.बी.मध्ये काम केलेलं होतं. शिवाय माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली होती.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० साली ज्यावेळी इंग्लंडच्या राणीने भारताला भेट दिली होती, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जवाहरलाल नेहरूंनी काव यांच्यावरच सोपवली होती. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोघांचेही ते विश्वासू समजले जात असत.

१९६८ ते १९७७ या काळात त्यांनी ‘रॉ’चे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. यावेळी त्यांनी जगभरातील अनेक महत्वाच्या देशांमध्ये ‘रॉ’चं जाळ पसरवलं होतं. रॉच्या सर्वच अधिकाऱ्यांना काव यांनी जातीने प्रशिक्षित केलं होतं, त्यामुळेच या अधिकाऱ्यांना ‘कावबॉय’ असं देखील म्हणण्यात येत असे.

बांगलादेशची  निर्मिती आणि सिक्कीमच्या विलीनीकरणात महत्वपूर्ण भूमिका

रामेश्वर नाथ काव यांच्याच अध्यक्षपदाच्या काळातच बांगलादेशची निर्मिती झाली. यावेळी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात ‘रॉ’ने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी निभावली होती. त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानातून म्हणजेच आजच्या बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या विस्थापितांची संख्या त्यावेळी खूप वाढली होती.

इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून काव यांनी या प्रश्नात लक्ष घातलं आणि त्यांच्याच सूचनेनुसार पाकिस्तानच्या विमानांना भारताच्या हद्दीतून उडण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानच्या पूर्व पाकिस्तानमधील हालचालींवर प्रतिबंध आला. काव यांनीच पूर्व पाकिस्तानातील विस्थापितांची सेना उभारली आणि त्यांना युद्धाचे प्रशिक्षण दिले. आपण जीला  ‘मुक्ती वाहिनी’ म्हणून ओळखतो ती हीच विस्थापितांची सेना होती. मुक्ती वाहिनीच्या संघर्षाला यश आले आणि पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशमधून माघार घेतली आणि स्वातंत्र्य बांगलादेशची निर्मिती झाली.

काव यांचा सल्ला ऐकला असता तर…

बांगलादेशची निर्मिती झाली असली तरी पाकिस्तानी कारवाया इतक्यात थांबणार नाहीत.पाकिस्तानकडून पलटवार केला जाईल, याबाबतची माहिती काव यांना आपल्या गुप्त सूत्रांकडून मिळाली होती.  त्यामुळेच काव यांनी बांगलादेशचे अध्यक्ष मुजीबुर रेहमान यांना भेटून त्याविषयी अवगत केलं होतं. अधिकची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

मुजीबुर रेहमान यांनी मात्र काव त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे तेच झालं ज्याची काव यांना भीती होती. काही दिवसातच झालेल्या एका हल्यामध्ये मुजीबुर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती.

सत्तरच्या दशकातील गुप्तचर संस्थांच्या ५ सर्वोत्तम प्रमुखांपैकी एक

१९७५ साली सिक्कीमचं भारतात यशस्वीपणे  विलीनीकरण  घडवून आणण्यात आलं. या प्रक्रियेमध्ये देखील काव यांची भूमिका महत्वपूर्ण होती. शेजारच्या चीनकडून असणारा धोका ओळखत ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्याचा सल्ला त्यांनी इंदिरा गांधींना दिला होता.

काही तज्ञांच्या मते तर भारताच्या श्रीलंकेमधील सैन्य कारवायांमागचं डोकं देखील काव यांचंच होतं. १९८४ साली स्थापन करण्यात आलेली ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ (NSG) ही संस्था काव यांचं अपत्य समजली जाते. फ्रांसच्या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख कौंट आलेक्झांद्रे डे मारेन्चेस यांनी तर काव यांना ‘सत्तरच्या दशकातील गुप्तचर संस्थांच्या ५ सर्वोत्तम प्रमुखांपैकी एक’ म्हणून काव यांचा समावेश केला होता.

१९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर सत्तेत आलेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारच्या काळात काव यांना राजीनामा द्यावा लागला. इंदिरा गांधी यांनी काव यांच्या मदतीने विरोधी नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी ‘रॉ’चा वापर केला असा आरोप त्यांच्यावर झाला. १९८० साली इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर काव यांची परत प्रशासनात प्रवेश झाला. इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी या दोहोंचेही सुरक्षा सल्लागार म्हणून काव यांनी काम पाहिलं. २००२ साली त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.