कोरोनासाठीच्या रशियन लशीची नक्की क्षमता किती?

भारतात कोरोना विषाणूंन पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केलीय. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत संक्रमितांच्या नवीन आकड्यांबरोबर मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत चाललाय. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन जरा कुठे पूर्वपदावर आलंय असं वाटतं होत. त्यात सिरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेकनं  कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन लसी विकसित केल्यानं सगळ्यांनीच मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती.

मात्र, गेल्या महिन्यांत पुन्हा एकदा गाडी रुळावरून घसरली आणि कोरोनानं पुन्हा कहर माजवायला सुरुवात केली.

परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीये. वाढत संसर्ग पाहता अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू, मिनी लॉकडाऊन, जमावबंदी करण्यात आली आहे. त्यात परिस्थिती आणखी बिघडल्यास संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत देखील मिळत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने व्हेंटिलेटर, आणि खाटांच्या  कमतरतेबरोबर  रुग्णालय देखील कमी पडू लागली आहे. मात्र त्यात आता नवीन भर म्हणून कि काय.. तर लसींचा सुद्धा तुटवडा जाणवायला लागलाय.

त्यात महाराष्ट्राची परिस्थिती आणखीच  हालाखीची झालीये. 

स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा तुटवडा मान्य केलायं. पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले कि,

‘महाराष्ट्रात सध्या ३ दिवस पुरेल म्हणजेच  14 लाख इतकाच साठा शिल्लक आहे. या तीन दिवसात लस नाही मिळाली तर लसीकरण बंद पडेल. काही जिल्ह्यांत तर अपुऱ्या लसींमुळे लसीकरण बंद करण्यात आलं आहे लोकांना लसीकरण केंद्रातून परतावं लागतंय आणि  राज्यासाठी ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे’.

मात्र, या दरम्यान भारताला तिसऱ्या लसीचा मार्ग उपलब्ध झालाय. केंद्रीय मंत्रालयाने रशियाच्या स्पुटनिक-५ लसीच्या वापरासाठी अखेर मान्यता दिली आहे. 

रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या सरकारी संशोधन केंद्रात म्हणजेच गालायम सेंटरने ही लस विकसित केली असून ती ९२ टक्के परिणामकारण असल्याचं म्हंटल जातंय. स्पुटनिक-५ ही लस डॉ. रेड्डी लॅबला देण्यात येणार असून  रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने या लशीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी मदत करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

देशातल्या अग्रगण्य फार्मा कंपन्यांत मोडल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या डॉ. रेड्डी लॅब  आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात या लसीबाबत करार झाला असून भारतात या लसीचे ३० कोटी डोस तयार करण्यात येणार आहेत.

‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार रशियात या लसीच्या चाचण्या झाल्यात, ज्यात रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत.

शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज करण्याची क्षमता या लसीत असल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे या लसीचे कोणतेच गंभीर दुष्परिणाम नसल्याचा दावाही रशियन शास्त्रज्ञांनी केलाय.  तसेच, डॉ. रेड्डी लॅबबरोबरच ग्लँड फार्मा, विक्रो बायोटेक, हेटरो बायोफार्मा, स्टेलिस बायोफार्मा या कंपन्यांबरोबर देखील या लसीच्या उत्पादनाबाबत करार करण्यात आला आहे.

या सर्वांचे मिळून तब्बल ८ अब्ज ५० कोटी डोस तयार होणार असल्याचं म्हंटल जात आहे. त्यामुळे, कोरोनाच्या या वाढत्या प्रसारात या तिसऱ्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. 

दरम्यान,  भारतात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील आणि ४५ वर्षापेक्षा जास्त गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना कोरोना लस देण्यात आली.

त्यानंतर १ एप्रिल पासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. ज्यात ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्यात आली. भारतात आतापर्यंत ९१,५८७,४०० जणांनी कोरोनाची लस टोचवली आहे. मात्र  या दरम्यान संक्रमितांच्या वाढत्या संख्येबरोबर लसीचा तुटवडा अडचणींत वाढ करणारा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.