सांगलीच्या पोरीच्या या बिनधास्तपणाने मराठी सिनेमाला बदलून टाकलं.

मराठीतली ती मोठी अॅक्ट्रेस आहे पण कोणी सुपरस्टार नाही. सौंदर्याचे सो कोल्ड फुटमाप घेऊन बसलं तर ती काय खूप सुंदर वगैरे आहे असं काही नाही. अभिनय म्हणावा तर चार चौघींपेक्षा ती खूप काही भारी करते म्हणाव तर तसही काही नाही. पण गेल्या काही वर्षात मराठी सिनेमा जो काय थोडाफार बदलला आहे यात तिचं नाव नक्की येईल.

सई ताम्हणकर.

या आधी मराठी सिनेमाला लोक वरण भात म्हणायचे. कॉमेडी सिनेमाच नाही तर अलका कुबल टाईप रडतराऊ सिनेमाचं रतीब घातल जात होतं. म्हणजे तशी काही मराठीमध्ये परंपरा नव्हती. भारतात पहिली बिकिनी मीनाक्षी शिरोडकर नावाच्या अभिनेत्रीने मराठी सिनेमामध्ये घातलेली, आणि या गोष्टीला ऐंशीपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. पण मध्यंतरीच्या काळात सिनेमातला तो बोल्डनेस कुठेतरी हरवला गेला. आणि तो बोल्डनेस परत आणण्याचं क्रेडीट जात सई ताम्हनकरला.

सांगलीत एका टिपिकल मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबात जन्मलेली. पण वडील मर्चंट नेव्ही मध्ये असल्याने घरात पाश्चात्य विचारांचा ,संगीताचा पगडा भारी होता. पण तिला खेळायला आवडायचं. शाळेत असतानाच कब्बडीमध्ये राज्यस्तरापर्यंत तिने मजल मारलेली. अभिनय वगैरे तिच्या गावीदेखील नव्हत. पण एक गोष्ट होती,

“बिनधास्तपणा”

सई सांगलीच्या चिंतामणराव पटवर्धन महाविद्यालयात शिकत असताना ती यामाहा कंपनीची RX 100 ही गाडी वापरायची. या काळात सईचा रुबाब वेगळाच असायचा तुम्ही मुलांना एखाद्या सुंदर मुलीला गाडीवरून कट मारून जातांना पहिलं असेल पण  सईमात्र मुलांना कट मारून जायची. तिच्या स्वभावातील बेफिकिरी अंगचीच आहे. जग काहीही म्हणो आपण आपल्या नादात राहायचं.

याच बेफिकरीमुळे ती अभिनय क्षेत्रात आली. झालं असं की तिच्या आईच्या मैत्रिणीने तिला सहज एका नाटकात काम करणार का असं विचारलं, सईने देखील त्याच सहजतेने होकार दिला. पहिलं नाटक केलं तेव्हा तिला जाणवलं अरे हे तर आपल्याला जमतंय. लगेच पुढच्या नाटकाच्या तयारीला लागली. या आधे अधुरे नाटकासाठी तिला बक्षिस मिळाली. त्या दिवशी तिला कळाल की आपल्याला अक्टिंगचं करायची आहे.

सिरीयल मिळाले, मुंबईला आली. सांगली सुटली. 

या गोजिरवाण्या घरात, अग्निशिखा सारखे सिरीयल चालू होते, सुभाष घई यांच्या ब्लॅक अँँड व्हाईट सिनेमामध्ये काम मिळालं, त्यांनीच तिला श्रेयस तळपदेचा सनई चौघडे मिळवून दिला.सईची गाडी तिथून सुसाट सुटली. आमिरच्या गजनीमध्ये छोटा रोल मिळाला. इंडस्ट्रीमध्ये हळूहळू नाव होत होतं.

तेवढ्यात ती कॉन्ट्रावर्सी  झाली.

१७ एप्रिल २०११. त्या दिवशीच्या सगळ्या मराठी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एक बातमी होती. अर्ध नग्न अवस्थेत असलेल्या एका मराठी अभिनेत्रीने कोथरूड भागात घातला गोंधळ. ती सई होती असं गॉसिप गप्पांमधून बाहेर आलच. एकाच चार करण्यात प्रसिद्ध असणाऱ्या पुणेकरांनी तिखटमीठ लावून ही गोष्ट बरेच दिवस चघळली गेली. तिच्याबद्दल बरच उलटसुलट बोलल गेलं.

सईचं करीयर संपलं असं डीक्लेर करण बाकी ठेवलं होतं. पण बिनधास्तपणा रक्तात भिनलेली साई ताम्हणकर यातूनही बाहेर आली. पण एखाद्या व्यक्तीचे जीवनात विवाद हा पाचवीलाच पुजलेला असतो हेच सई बाबतीत खरं आहे . पण तिच्या पुढे नवीन वाद वाटचं बघत होता.

sai tamhankar photoshoot

नो एंट्री पुढे धोका आहे या सिनेमासाठी तिने बिकिनी घातली होती. मराठी संस्कृतीचा ऱ्हास ही मुलगी करतीय अशी चर्चा सुरु झाली. पण ही तर सुरवात होती. संस्काराच्या नावाखाली जे जे सोशल नॉर्म्स बनवून ठेवले होते त्याला सई ताम्हणकर मुलीने मोडून काढण्यास सुरवात केली. तिच्या पासूनचं मराठीत अभिनेत्रींनी नवे प्रयोग करण्यास घाबरायचं बंद केलं.

ती बिनधास्त आहे, ती बोल्ड आहे, ती कोणतेही सीन त्याच कॉन्फिडसने देऊ शकते.  पण एवढीच तिची ओळख नाही. नॉन ग्लॅमरस भूमिका सुद्धा तितक्याच भारी करू शकते हे तिने दाखवून दिलंय.  पुणे ५२ असेल, बालक पालक असेल, वजनदार असेल किंवा काही वर्षापूर्वी आलेला हंटर असेल. प्रत्येक सिनेमामध्ये सईच्या मादकतेमध्ये एक वेगळीच छटा आहे. तिने प्रेक्षकांबरोबर समीक्षकांनाही दखल घेण्यास भाग पाडलंय.

सई ताम्हणकरने मराठी सिनेसृष्टीला कूस बदलण्यास भाग पाडली. खूप वर्षापूर्वी हिंदी सिनेमामध्ये झीनत अमानने जे केलं ते सई ताम्हणकरने मराठीमध्ये करून दाखवलं. तिने तेव्हा केलेला बंड फक्त सिनेमाच नाही तर मराठी पिढ्यांना ही आत्मविश्वास देणारा ठरला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.