सर छोटू राम, ज्यांच्या ६४ फुट उंच पुतळ्याचं अनावरण नरेंद्र मोदी करणार आहेत…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरयाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रोहतक येथे ब्रिटीशकालीन जाट नेते सर छोटू राम चौधरी यांच्या ६४ फुट उंच पुतळ्याचं अनावरण करणार आहेत.

या कार्यक्रमानंतर ते सर छोटू राम म्युझियम कॉम्प्लेक्स ला देखील भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमके होते कोण सर छोटू राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण का करताहेत.

कोण होते सर छोटू राम…?

दीनबंधू उर्फ सर छोटू राम चौधरी हे हरयाणामधील ब्रिटीशकालीन जाट नेते होते. देशातील इतर राज्यात त्यांच्याविषयी फार माहिती नसली तरी हरयाणातील जनतेच्या मनात त्यांना अतिशय मानाचं  स्थान आहे.

२४ नोव्हेंबर १८८१ रोजी हरयाणामधील गढी सापला गावात त्यांचा जन्म झाला होता. रिछपाल असं नाव असलेले छोटू राम भावंडांमध्ये सर्वात लहान होते, त्यामुळेच त्यांना छोटू राम असं नाव पडून गेलं.

प्राथमिक शिक्षण आपल्या गावातूनच पूर्ण केलेल्या सर छोटू राम यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून आपली पदवी पूर्ण केली. काही काळ हिंदुस्तान या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण सुरु असतानाच ते राजकीयदृष्ट्या सक्रीय झाले होते आणि त्यांनी जाट सभेची स्थापना केली. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांना आधीपासूनच रस होता. त्यामुळे या क्षेत्रात काहीतरी भरीव काम करण्यासाठी म्हणून त्यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आलेले जाट आर्य वैदिक संस्कृत हायस्कूलने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

जाट आणि शेतकरी नेते म्हणून उदय.

पुढच्या काही काळातच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी हातात घेतलेल्या अनेक कार्यक्रमांमुळे  शेतकरी नेते म्हणून त्यांचा उदय झाला. जाट गॅजेट या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात आवाज बुलंद केला. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी सावकारी प्रथेविरोधात एल्गार पुकारला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहिताना त्यांच्या लेखणीला इतकी धार येत असे की एकदा त्यांच्या एका लेखामुळे सरकारने त्यांना देशातून हद्दपार करण्याचा  आदेश दिला होता, परंतु त्यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई झाली तर मोठा विद्रोह होईल या भीतीने सरकारने आपलाच आदेश रद्द केला होता.

१९१६ साली ते काँग्रेसशी जोडले गेले होते. रोहतक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती, परंतु पुढे गांधीजींच्या असहकार चळवळीपासून त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला. असहकार चळवळ शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही, असं सांगत या चळवळीपासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर सर छोटू राम यांनी युनियनिस्ट पार्टीची स्थापना केली आणि १९३७ सालच्या निवडणुका देखील लढवल्या. या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला मोठ यश मिळालं. छोटू राम सरकारमध्ये विकासमंत्री झाले.

आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात सर छोटू राम यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक कायदे केले ज्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण थांबवलं जाऊ शकेल. त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या अनेक कामांमुळेच हरयाणातील जनतेमध्ये त्यांच्या नावाला मोठी प्रतिष्ठा आहे.

घराणेशाहीचे कट्टर विरोधक. 

सर छोटू राम हे घराणेशाहीचे कट्टर विरोधक होते. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणारे नेते म्हणून देखील त्यांचं नाव घेतलं जातं. आपल्या तत्वांशी ते किती प्रामाणिक होते याचं एक उदाहरण असं सांगितलं जातं की सर छोटू राम सरकारमध्ये असताना इंडियन सिव्हील सर्व्हिसचे एस.के. कृपलानी एकदा आपल्या मुलाच्या कामासाठी शिफारस घेऊन त्यांच्याकडे आले होते.

आपल्या मुलाला नोकरीमध्ये बढती देण्यात यावी अशी विनंती एस.के. कृपलानी यांनी सर छोटू राम यांना केली होती. त्यावर उत्तर देताना सर छोटू राम म्हणाले की, “मी स्वतःच्या कामासाठी काही नियम ठरवून घेतले आहेत, ज्यानुसार आपण कुठल्याही नातेवाईकाला किंवा जवळच्या किंवा दूरच्या परिचिताला नोकरी मिळवून देण्यासाठी कुठलीही मदत करू शकत नाही. माझ्यावर जर घराणेशाहीचा आरोप केला तर मला राजकारण सोडण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही”

‘रावबहादूर’ या उपाधीने सन्मानित करण्यात आलेल्या सर छोटू राम यांच्या पुतळ्याच्या निमित्ताने हरयाणामधील जाट समुदायावरील आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी भाजप प्रयत्नरत आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.