हे आहेत “क्रिकेटच्या डकचे” अफलातून किस्से…!
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कर्णधार कोहलीच्या आक्रमक इनिंगच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला, मात्र भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या नावावर मात्र या सामन्यात एक नकोसा विक्रम जमा झाला.
टी-ट्वेंटी सामन्यात ‘गोल्डन डक’ होणारा तो पहिलाच भारतीय विकेटकीपर ठरला.
क्रिकेटमध्ये अनेकवेळा शून्यावर आउट होणाऱ्यांसाठी ‘डक’ हा शब्द वापरल्याचं आपण बघतो. पण तसा तो का वापरला जातो, ‘डक’चे प्रकार किती आणि तो कधीपासून वापरला जायला लागला, याविषयी मात्र आपल्याला फारशी माहिती नसते. तर आज जाणून घेऊयात याविषयी सार काही..
‘डक’ म्हणजे काय आणि शून्यावर आउट होणाऱ्यास ‘डक’ का म्हणतात..?
बदकाला इंग्रजीत ‘डक’ म्हणतात, हे तर आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असेलच. क्रिकेटमध्ये शून्यावर आउट होणाऱ्यास ‘डक’ म्हणण्याचा संबंध देखील बदकाच्या अंड्याशीच आहे. शून्याचा आकार हा बदकाच्या अंड्यासारखा असतो, म्हणून जेव्हा खेळाडू शून्यावर आउट व्हायचा, त्यावेळी त्याला ‘डक एग आउट’ असं म्हंटल जायचं. पुढे चालून हीच टर्म शॉर्ट होऊन ‘डक’ बनली.
‘डक’ हा शब्द सर्वप्रथम कधी वापरला गेला..?
क्रिकेटमध्ये ‘डक’ हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला तो १८ जुलै १८६६ रोजी. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळवल्या गेलेल्या एका सामन्यात ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ शून्यावर आउट झाले होते. या घटनेची बातमी देताना एका स्थानिक वर्तमानपत्राने ‘प्रिन्स ऑफ वेल्स बदकाच्या अंड्यावर बसून राजवाड्यात परतले’ अशी हेडलाईन वापरली. या वृत्तपत्राने शून्यासाठी ‘बदकाचे अंडे’ हा शब्द वापरला आणि तिथूनच ही टर्म क्रिकेटमध्ये वापरली जायला सुरुवात झाली.
‘डक’चे प्रकार.
गोल्डन डक–
एखादा खेळाडू जेव्हा तो खेळत असलेल्या पहिल्याच बॉलवर आउट होतो, त्यावेळी त्याला ‘गोल्डन डक’ असं म्हणतात.
रॉयल डक–
जेव्हा कधी एखाद्या टीमचा ओपनर बॅट्समन इनिंगच्या पहिल्याच बॉलवर आउट होतो, तेव्हा त्याला ‘रॉयल डक’ असे म्हणतात. याच प्रकाराला ‘प्लॅटीनम डक’ असंही एक नाव आहे.
डायमंड डक–
जेव्हा एखादा खेळाडू एकही बॉल न खेळता शून्यावर आउट होतो, त्यावेळी तो ‘डायमंड डक’ म्हणून ओळखला जातो.
आता तुम्ही विचार करत असणार की एकही बॉल न खेळता आउट होणं, कसं शक्य आहे..? किमान आउट होण्यासाठी तरी बॉल खेळावाच लागेल ना..? थांबा घाई करू नकात. तुम्हालाच लक्षात येईल की खेळाडू जेव्हा रन-आउट होतो, त्यावेळी आउट होण्यासाठी बॉल खेळण्याची गरज नसतेच.
‘सिल्व्हर’ आणि ‘ब्राँझ’ डक-
एखादा खेळाडू जेव्हा इनिंगच्या दुसऱ्या बॉलवर आउट होतो तेव्हा त्याला ‘सिल्व्हर डक’ आणि तिसऱ्या बॉलवर आउट होतो तेव्हा त्याला ‘ब्राँझ डक’ म्हंटलं जातं. पण या दोन्हीही टर्म फारशा लोकप्रिय नाहीत.
‘पेअर’ आणि ‘किंग पेअर’-
कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा खेळाडू दोन्हीही इनिंगमध्ये शून्यावर आउट होतो, तेव्हा त्याला ‘पेअर’ म्हणतात तर हेच ज्यावेळी तो दोन्ही इनिंग्जमध्ये तो खेळत असलेल्या पहिल्याच बॉलवर घडतं त्यावेळी त्याला ‘किंग पेअर’ असं म्हणतात.
‘डक’बद्दल हे देखील माहित असूद्यात..
क्रिकेटच्या इतिहासातला पहिला ‘डक’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात ज्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटीने झाली, त्याच कसोटीत नोंदवला गेला.
ऑस्ट्रेलियाचा इ.जे. ग्रेगरी हा त्यावेळी पहिला ‘डक’ आणि ‘गोल्डन डक’ देखील ठरला होता. तो खेळत असलेल्या पहिल्याच बॉलवर लिलीव्हाईटच्या बॉलिंगवर उडालेला त्याचा कॅच ग्रीनवूडने पकडला होता. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जे.आर. हॉज आणि टी. डब्ल्यू गॅरेट हे ‘डक’ तर इंग्लंडचा ए.हिल हा ‘रॉयल डक’ ठरला होता. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांचा ओपनर हिल शून्यावर आउट झाला होता.
महान सर डॉन ब्रॅडमन आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या इनिंगमध्ये शून्यावर आउट झाले.
त्यांच्या या ‘डक’मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० ची अॅव्हरेज आपल्या नावावर करण्याच्या विश्वविक्रमापासून ते फक्त ४ रन्स दूर राहिले. त्यामुळे त्याचं अॅव्हरेज ९९.९४ इतकं आहे. हा विश्वविक्रम मोडला जाण्याची शक्यता जवळपास नाहीच.
आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक वेळा ‘डक’ होण्याचा नकोसा विश्वविक्रम श्रीलंकेचा महान बॉलर मुथय्या मुरलीधरणच्या नावावर आहे. तो तब्बल ५९ वेळा ‘डक’ ठरलाय. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडीजच्या कर्टनी वॉल्श आणि श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावे अनुक्रमे ५४ आणि ५३ ‘डक’ आहेत.
भारताकडून सर्वाधिक वेळा ‘डक’ ठरलेला खेळाडू म्हणजे झहीर खान. तो कारकिर्दीत जवळपास ४४ वेळा ‘डक’ झाला. त्यानंतर अनुक्रमे ३५ आणि ३४ ‘डक’ सह अनिल कुंबळे आणि इशांत शर्मा या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.
…..जेव्हा संपूर्ण टीम ‘डक’ ठरली होती !
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू ‘डक’ होणं समजण्यासारखं, पण जर इतिहासात एकदा संपूर्ण टीमच शून्यावर आउट झाली होती, असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर..? विश्वास ठेवायला थोडंस अवघड जातंय ना..? पण असंही एकदा घडलं होतं.
साल होतं १९१३. २५ मे चा दिवस. ‘ग्लॅस्टनबरी’ आणि ‘लँगपोर्ट’ या दोन क्लबमधला सामना. ‘ग्लॅस्टनबरी’च्या संघाने प्रथम बँटिंग करताना फक्त ८० रन्स काढले होते, पण ते ८० रन्स सुद्धा त्यांना ८० रन्सनीच मॅच जिंकून द्यायला पुरेसे ठरले. कारण प्रत्युत्तरात बँटिंगसाठी उतरलेला प्रतिस्पर्धी ‘लँगपोर्ट’च्या संघातील एकाही खेळाडूला आपलं खातं उघडता आलं नव्हतं.
विशेष म्हणजे एखाद्या एक्स्ट्रा रनच्या स्वरुपात तरी संघाचं खात उघडू शकलं असतं, पण ‘लँगपोर्ट’च्या संघाच्या नशिबात ते ही नव्हतं. ए. लीस्कने ७ विकेट्स घेताना ‘लँगपोर्ट’च्या संघाच्या नावावर ‘ऑल आउट झिरो’ हा शिक्का मारण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
हे ही वाच भिडू
- ‘हिट विकेट’ म्हणजे काय रे भाऊ..?
- लगावलेला सिक्सर स्टेडियममधून थेट दुसऱ्या देशात जाऊन पडला होता !!
- सेहवागने कसोटी पदार्पणाआधीच भविष्यवाणी केली होती, “मी भारताकडून पहिलं त्रिशतक मारणार”
- त्या दिवशी अक्रमला भारतीयांची मने जिंकता आली असती, पण