क्रिकेटच्या इतिहासात ३९ हजार रन्स आणि ४ हजारपेक्षा अधिक विकेट्स नावावर असणारा एकमेव खेळाडू !

विल्फ्रेड ऱ्होड्स.

क्रिकेटच्या इतिहासातलं अजरामर नाव. या खेळाडूच्या नावे असे काही विक्रम आहेत की ज्याचा विचार करणं सुद्धा अवघड. या खेळाडूची क्रिकेटींग प्रोफाईल म्हणजेच एक विक्रमांची यादी आहे.

आजच्याच दिवशी विल्फ्रेड यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा प्रथमश्रेणी सामना खेळला होता. हा त्यांचा १ हजार ११० वा प्रथमश्रेणी सामना होता.

क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. नजर टाकूयात विल्फ्रेड यांच्या नावावर असणाऱ्या अशाच काही विक्रमांवर.

  • प्रथमश्रेणी क्रिकेटचे १ हजार पेक्षा अधिक सामने खेळणारे देखील ते एकमेव क्रिकेटर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या फ्रँक वूली यांनी ९७८ सामने खेळलेत. फ्रँक वूली यांच्या नावावर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ५८ हजार ९५९ रन्स आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक रन्सच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिला क्रमांक ६१ हजार ७६० रन्ससह जॅक हॉब्ज यांनी पटकावलाय !
  • २९ ऑक्टोबर १८७७ रोजी म्हणजेच क्रिकेटच्या जन्माच्या वर्षीच इंग्लंडमध्ये जन्मलेल्या विल्फ्रेड यांनी १८९९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीस सुरुवात केली होती. या पहिल्याच सामन्यात त्यांनी पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३ अशा एकून ७ विकेट्स मिळवल्या होत्या.
  • आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील ५८ सामन्यांमध्ये २३२५ रन्स आणि १२७ विकेट्स मिळविणाऱ्या र्होड्स यांनी आपला शेवटचा कसोटी सामना ३ एप्रिल १९३० रोजी वेस्ट इंडीज विरोधात खेळला. त्यावेळी त्यांचं वय होतं ५२ वर्षे आणि १६५ दिवस. त्यावेळी ते सर्वाधिक वयात आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळणारे खेळाडू ठरले.
  • त्यापूर्वी हा विक्रम डब्ल्यू.जी. ग्रेस यांच्या नावे होता ५० वर्षे आणि ३२० दिवसांचं वय असताना आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. विशेष म्हणजे ग्रेस यांचा शेवटच्या सामन्यातूनच विल्फ्रेड यांनी आपलं कसोटी पदार्पण केलं होतं, जणू काही ग्रेस यांचा विक्रम मोडण्यासाठी विल्फ्रेड यांनी जन्म घेतला होता !
  • विल्फ्रेड र्होड्स
  • १९१२ सालच्या अॅशेज सिरीजमध्ये विल्फ्रेड ऱ्होड्स आणि जॅक हॉब्ज यांनी इंग्लंडच्या डावाची सुरुवात करत ३२३ रन्सची सलामी दिली. त्यावेळी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कुठल्याही क्रमांकावरील ही पहिलीच त्रिशतकी भागीदारी ठरली होती. त्यापूर्वीच विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रॉजर हार्टगन आणि क्लेम हिल यांच्या नावावर होता. या दोघांनी १९०८ सालच्या अॅशेज सिरीजमध्ये आठव्या विकेटसाठी २४३ धावा जोडल्या होत्या.
  • यॉर्कशायरच्या संघाकडून आपल्या प्रथमश्रेणी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या विल्फ्रेड यांनी १८९९ च्या मोसमात १५४ विकेट्सचा पाऊस पाडला होता, त्यांच्या या कामगिरीसाठी त्यावर्षी त्यांना ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईअर’ पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
  • आपल्या एकूण प्रथमश्रेणी क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यांनी ३९९६९ रन्स आपल्या नावावर जमवले. विशेष म्हणजे त्यांनी खेळलेल्या १११० सामन्यांमधील २३७ इनिंग्जमध्ये ते ‘नॉट आउट’ राहिले. शिवाय बॉलिंग करताना देखील त्यांनी ४२०४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यामुळेच त्यांना प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वकालीन महान ऑल-राउंडर समजलं जातं. त्यांचा हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता दूर-दूरपर्यंत नाही.

हे ही वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.