मराठा साम्राज्याच्या नाशास कारणीभूत ठरलेल्या माणसानेच आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला !

ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं. जगाच्या नकाशावर ठिपक्या एवढा हा देश, आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर, तरी या प्राचीन इतिहास लाभलेल्या आणि पराक्रमी वीरांचा वारसा लाभलेल्या भारतावर इतकी वर्षे कसा काय राज्य करू शकला?

अनेक कारणे सांगता येतील पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्रिटीश साम्राज्याशी प्रामाणिक असलेले भारतात काम करणारे इंग्लिश अधिकारी.

यांच्या जिवावर इंग्लंडच्या राणीचा सूर्य कित्येक वर्षे जगात मावळत नव्हता. त्यांनी इथे सत्ता टिकवली.  भारतातून जास्तीतजास्त फायदा आपल्या देशाकडे कसा पाठवता येईल असाच विचार हे अधिकारी करायचे, यात काही असे हि अधिकारी होते जे भारतीय गोरगरीब जनतेची काळजी करायचे मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने इंग्लंडचं नुकसान कधीच होऊ दिल नाही.

अशाच अधिकाऱ्यांच्या मांदियाळीतील एक महत्वाचं नाव लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन .

एल्फिन्स्टनचा जन्म स्कॉटलंडच्या लॉर्ड घराण्यात झाला. मात्र घरात त्याचा नंबर चौथा त्यामुळे त्याने धाडसी मार्ग चोखाळला. १७९६ साली वयाच्या सतराव्या वर्षी तो इस्ट इंडिया कंपनीत काम करण्यासाठी भारतात आला. तिथे कनिष्ठ पदापासून त्याने सुरवात केली. काहीच वर्षात त्याला बढती मिळाली आणि १८०१ साली पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या दरबारात त्याची ब्रिटीश दूत म्हणून नेमणूक झाली. त्याची नेमणूक नेपोलियनला हरवणारा ब्रिटीश सेनापती आर्थर वेलस्लीने स्वतः केली होती.

सतराव्या शतकात मराठी सत्ता हीच भारतात प्रबळ उरली होती. मुघलांचं केव्हाच पानिपत झालं होतं, राजपूत राजे आधीच मांडलिक होऊन बसले होते, ब्रिटीश सत्तेला एकमेव आव्हान मराठयांच उरलेलं. मात्र एकमेकात फुटीचा शाप मराठ्यांना आधीच लागलेला. पेशवे, शिंदे, होळकर कोणालाच एकमेकाच तोंड पहायचं नव्हतं. त्यांच्यावर करडी नजर ठेवायची जबाबदारी एल्फिन्स्टन कडे देण्यात आली होती.

सुरवातीला पुण्यात बाजीराव दुसरा याने एल्फिन्स्टनकडे विशेष लक्ष नाही. दरबारी राजकारणाच्या मोकळ्या वेळेत  एल्फिन्स्टन ने सर्वात महत्वाचे काम केले ते म्हणजे वाचन.

तो कायम काहीना काही वाचताना दिसायचा. त्यानं पेशव्यांचं अख्ख दफ्तर पालथं घातलं. बारा मावळाची सगळी माहिती गोळा केली. तीच डॉक्युमेंटेशन केलं. कुठे किती पिक येते, इथले हवामान, जमिनीची माहिती असे सर्व गोष्टी त्याने लिहून ठेवल्या होत्या. ज्याचा फायदा पुढे जेव्हा ब्रिटीशराज आला तेव्हा त्यांना महसूल गोळा करताना झाला. खुद्द पेशव्यांना मराठी मुलुखात किती पिक येत आणी तिथून किती महसूल गोळा करता येऊ शकतो याची इथ्यंभूत माहिती नव्हती. ती ब्रिटिशांना होती कारण एल्फिन्स्टन.

इकडे एल्फिन्स्टनच मुत्सद्देगिरीच काम सुरूच होतं. त्यान दु.बाजीरावच्या गळी तैनाती फौजेचा करार उतरवला. मराठी सत्तेला पहिली चीर एल्फिन्स्टनने पाडली . तिथून नागपूरचे भोसले आणि नागपूर हून डायरेक्ट काबुल अफगाणिस्तानच्या दरबारात राजदूत म्हणून एल्फिन्स्टनने स्वतःची छाप सोडली होती. तिथेही माहिती गोळा करण्याचे त्याचे काम सुरूच राहिले. स्वतः सेनानी नसलेल्या एल्फिन्स्टनने अनेक युद्धात जबरदस्त कामगिरी केली. परत १८११ साली त्याची पुण्याला रीजंट म्हणून नेमणूक झाली तेव्हा त्याने आपले डोक्युमेंटेशनचे काम सुरुच ठेवले होते.

मराठ्यांची दुही, बाजीरावाचा कर्तुत्वशून्य कारभार यांची नोंदअसलेल्या एल्फिन्स्टनने अखेर 5 नोव्हेंबर १८१७ साली खडकीच्या युद्धात मराठी सत्तेचा पराभव केला आणि शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवला. असे म्हणतात कि पेशवाईला कंटाळलेल्या जनतेने त्या दिवशी आनंदच साजरा केला होता. याच दिवशी खऱ्या अर्थाने इंग्रजांचा भारतावरील राज्य सुरु झाले.

एल्फिन्स्टनच्या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला तत्कालीन बॉम्बेचा गव्हर्नर बनवण्यात आले .

अख्ख्या पश्चिम भारताचा कारभार त्याच्या हाती आला. तिथे त्याने ब्रिटीशांचे मुंबईप्रांतासाठीचे कायदे लिहिले. मुंबईच्या विकासाला एल्फिन्स्टनने सुरवात केली. त्याच्याच काळात महाराष्ट्रात आधुनिक शिक्षणाचा पाया रचला गेला. फक्त आधुनिक शिक्षणच नव्हे तर पारंपारिक भारतीय शिक्षणाला सुद्धा त्याने मदत केली. पुण्यात संस्कृत पाठशाला काढली आणि तेथे संस्कृत, मराठी न्यायशास्त्र,ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. देशी भाषेतून विज्ञान शिकवण्याचे कार्य त्याने हाती घेतले. त्याला स्वतःला मराठी, ग्रीक, लॅटीन, संस्कृत,फारसी या भाषांचे ज्ञान होते. त्याकाळात दरवर्षी शिक्षणाच्या तरतुदीसाठी  १ लाख रुपये खर्च करण्याचा त्याने ठराव केला होता.

१८२७ पर्यंत तो भारतात राहिला. तिथून तो इंग्लंड ला परत गेला. तिथे त्याने ” history of india “हा ग्रंथ लिहिला. त्याने महाराष्ट्रातील गोळा केलेली माहिती “territories conquered from peshwa ” या नावाने प्रसिद्ध केली. दरम्यानच्या काळात हि पुस्तके लिहिण्यासाठी संपूर्ण भारताचा गव्हर्नर होण्याची ऑफर त्याने दोनदा धुडकावून लावली.

२० नोव्हेंबर १८५९ साली एल्फिन्स्टनचे निधन झाले. त्याने महाराष्ट्रात केलेल्या शैक्षणिक कार्यच प्रतिक म्हणून त्याच्या नावच एल्फिन्स्टन कॉलेज आजही मुंबईत दिमाखात उभे आहे. सर्वसामन्य पणे एखाद्या मोठ्या राजकारण्याने जर देणगी दिली तर त्याचे नाव शाळा कॉलेजला दिले जाते मात्र एल्फिन्स्टनने भारत सोडल्यावर त्याच्या नावाने मुंबईकरांनी  देणगी गोळा केली आणि १८५६ साली हे कॉलेज सुरु झाले.लॉर्ड एल्फिन्स्टनच्या कार्याला हा खरा सलाम होता.

नुकतंच ज्याचं नाव प्रभादेवी करण्यात आले ते एल्फिन्स्टन रोड स्टेशन मात्र माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या पुतण्याच्या नावावरून ठेवण्यात आले होते. तो सुद्धा मुंबईचा गव्हर्नर होता.

हे ही वाच भिडू

2 Comments
  1. Saurabh says

    What a fantastic documentation, by British in and for !Maharashtra and also by Bol Bhidu

  2. रवीन्द्र खडपेकर says

    I am staunch admirer of Lord Elphinston.

Leave A Reply

Your email address will not be published.