सलमान सुद्धा साऊथचा स्टायलिश आयकॉन समजल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनची कॉपी करतो…

मुद्दा एंटरटेनमेंटचा असो किंवा टेक्नॉलॉजीचा, बॉक्सऑफिसवर यशस्वी होणं असो किंवा तिकीटविक्रीसाठी हाणामारी असो सगळ्या कामात साऊथ इंडस्ट्रीने बॉलीवूडला मागे टाकलं आहे. इतकंच नाही तर साऊथमधले सीनचं नाही तर पूर्ण सिनेमेच बॉलिवूड कॉपी करतं. याहीपेक्षा लोकं मूळ साऊथ सिनेमा सोडून त्याच हिंदी डब व्हर्जन बघणंच पसंत करतात.

काही वर्षांपूर्वी साऊथच्या काही हिरोनी बॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवायचा प्रयत्न केला खरा पण बॉलिवूडमध्ये त्यांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही. पण आज साऊथमधल्या काही हिरोंची तारीफ फक्त बॉलिवूडचं नाही तर सगळा देश करतो. साऊथमधला असाच एक ऍक्टर आहे अल्लू अर्जुन.

अल्लू अर्जुन हा पहिला ऍक्टर होता ज्याने साऊथ सिनेमात स्टायलिश हिरोचा ट्रेंड आणला. आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्लू अर्जुनने अनेक हिट सिनेमे दिले. त्याची स्टाईल इतकी भारी आहे कि सलमान खान सुद्धा त्याची कॉपी करतो.

आज अल्लू अर्जुनाचा सिनेमॅटिक प्रवास जरा जाणून घेऊया.

८ एप्रिल १९८३ जन्मलेल्या अल्लू अर्जुनाचे वडील साऊथमधले मोठे निर्माते आहेत. अल्लू अर्जुनचं फॅमिली बॅकग्राउंड हे पूर्णपणे सिनेमाशी निगडित आहे. साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी, पवन कल्याण, नागेंद्रबाबू, रामचरण हे सगळे अल्लू अर्जुनचे जवळचे नातेवाईक आहे.

त्याचा पहिला सिनेमा हा विजेता होता. त्यात बालकलाकार म्हणून चिरंजीवीने त्याची निवड केलेली. नंतर तो काय सिनेमाकडे वळला नाही. BBA ची डिग्री त्याने मिळवली. सोबतच डान्स, मार्शल आर्ट आणि जिमनॅस्टीक मधेही त्याने विशेष प्राविण्य मिळवलं. 

अल्लू अर्जुनला पहिला सिनेमा मिळाला तो होता २००३ मध्ये आलेला गंगोत्री. हा सिनेमा चांगला चालला मात्र अल्लू अर्जुन काय तितका फेमस झाला नाही. पण

२००४ मध्ये अल्लू अर्जुन काय चीज आहे हे सगळ्या भारताला कळलं. त्याचा पुढचा सिनेमा होता आर्या. या सिनेमामधून अल्लू अर्जुन चांगलाच गाजला. लव्ह स्टोरीवर आधारित हा सिनेमा अजूनही मोठ्या आवडीने पाहिला जातो.

आर्या या सिनेमात अल्लू अर्जुनाची स्टाईल इतकी गाजली कि त्याला साऊथचा स्टायलिश आयकॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या सिनेमामुळे तो ONE NIGHT STAR झाला. या सिनेमानंतर अल्लू अर्जुनला अनेक सिनेमे ऑफर झाले. याने केलेल्या सिनेमांपैकी जवळपास बरेच सिनेमे सुपरहिट आहेत. अगदी कमी काळात त्याने टॉलीवुडच्या टॉप हिरोंमध्ये जागा बनवली. 

आजवर अल्लू अर्जुनने साऊथचे ५ फिल्मफेअर अवॉर्ड, २ नंदी अवॉर्ड त्याला मिळाले आहेत. अल्लू अर्जुनच्या स्टायलिश राहणीमानामुळे त्याला अनेक जाहिराती ऑफर होतात पैकी 7UP, कोलगेट मॅक्सफ्रेश, OLX या जाहिरातींमधून तो बऱ्याचदा आपल्याला दिसतो.

वेदम, रुद्रमादेवी, बद्रीनाथ, आर्या २, सन ऑफ सत्यमूर्ती, सरायनोडू हे अल्लू अर्जुनचे सगळ्यात जास्त गाजलेले सिनेमे. बॉक्सऑफिसवर करोडोंमध्ये या सिनेमांनी कमाई केली होती.

पण मध्ये सलमान खानचा सिनेमा राधे आला आणि अल्लू अर्जुन पुन्हा चर्चेत आला, यात सलमान खानने अल्लू अर्जुनाचा डान्स आणि गाणं कॉपी केलं होतं. सिटी मार हे गाणं साऊथमधलं सगळ्यात जास्त वाजलेलं गाणं होतं.

यावरून सलमान भारी कि अल्लू अर्जुन भारी यातच सगळे वाद घालू लागले. अर्थात मूळ गाणं हे अल्लू अर्जुनच्या सिनेमातलं होतं त्यातल्या त्यात अल्लू अर्जुन हा जबरदस्त डान्सर त्यामुळे सलमान खान ट्रोल होणं साहजिकच होतं. 

पण यावरून सलमान खानला प्रमाणाबाहेर ट्रोल करण्यात आलं. बॉलिवूड हे कायम साऊथच्या सिनेमाच्या कथा चोरतात आणि इकडे स्वतःच्या नावाने खपवतात अशी ओरड तर आपण कायम ऐकत असतो. सलमान खानचे बरेच सिनेमे हे साऊथ वरून उचलले असल्याचे आरोप सुद्धा केले जातात.

पण अल्लू अर्जुनचं मार्केट इतकं जबरी आहे कि बॉलिवूडचा मेगा स्टार असलेल्या सलमान खानला सुद्धा त्याची कॉपी करावी लागते.

साऊथमध्ये निर्मात्यांना आणि चाहत्यांना हमखास पैसा वसूल सिनेमे देणारा अल्लू अर्जुन हा आजही लोकप्रिय अभिनेता आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.