पडद्यावरच्या लक्ष्या मामांच्या आई खऱ्या आयुष्यात कोल्हापूरच्या नगरसेविका होत्या…
लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मराठी चित्रपट सृष्टीने कित्येक पिढ्या मनामध्ये जपून ठेवलंय. लक्ष्मीकांत बेर्डे या नावासोबत अनेक लोकांच्या लहानपणीच्या आठवणी आहेत. शनिवारी रविवारी सह्याद्री वाहिनीवर लक्ष्यामामाची पोट धरून हसायला लावणारी डायलॉगबाजी आणि त्यांचे येणारे संवाद हे सगळं मराठी पिढी नाही.
पण जर तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांचं कट्टर चाहते असाल किंवा तुम्ही सुजाण मराठी चित्रपट रसिक असाल तर तुम्हाला लक्षामामाच्या अभिनयाबरोबरच त्याची आई कोण असायची हेही चांगलंच आठवत असेल.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीत जितके चित्रपट केले त्यात त्यांच्या आईची भूमिका मोजक्याचं अभिनेत्रींनी केली. प्रामुख्याने मधू कांबीकर आणि अलका इनामदार या दोन अभिनेत्र्या लोकांना चांगल्याच ठाऊक आहेत.
अलका इनामदार तर इतक्या चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई होत्या कि लोकांना वाटायचं कि त्या खरोखरच्या आयुष्यात लक्ष्यामामाच्या आई असाव्या.
आज आपण अलका इनामदार यांच्याविषयी जाणून घेऊया. मराठी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास आणि त्यांच्या भूमिकेने गाजलेले चित्रपट आणि एकूणच जीवनप्रवास.
अलका इनामदार या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या. कोल्हापुरात त्या मंगळवार पेठ, पाण्याचा खजिना या परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांचे पती दिनकर इनामदार हे सुद्धा मराठी चित्रपटातून भूमिका करायचे. हि दोघे मंडळी अगदी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमापासून चित्रपट क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या घराच्या काही अंतरावरच जयप्रभा स्टुडिओ होता. त्यांच्या अभिनयाने खुद्द मराठीतले नामवंत दिग्दर्शक भालजी पेंढारकर त्यांच्यावर कायम खुश असायचे. त्याकाळात भालजी पेंढारकर यांनी छोट्या मोठ्या भूमिका त्यांना देऊन अभिनय क्षेत्रात कार्यरत राहा म्हणून सांगितलं.
पुढच्या काही काळात मग महेश कोठारे यांनी मराठीत एकाहून एक सरस चित्रपट आणले आणि त्यात बहुतांशी चित्रपटात मुख्य नायक म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे असायचे. आईची भूमिका असो किंवा प्रेयसीच्या आईचा रोल मात्र अलका इनामदार याच करायच्या.
त्या इतक्या सशक्त अभिनय करायच्या कि पडद्यावर लक्ष्मीकांत बेर्डे हे खरोखरच त्यांचा मुलगा भासायचे इतकी उत्तम केमिस्ट्री त्यांची होती. लक्षामामाला त्यांनी पुष्कळ जीव लावला आणि पोटचा मुलगा म्हणूनच त्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी वागायच्या.
झपाटलेला या महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपटात अलका इनामदार यांचे पती दिनकर इनामदार हे धनाजीरावच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळालें होते तर धडाकेबाज चित्रपटात अलका इनामदार या आवडीच्या आत्याच्या भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या.
त्यांची सगळ्यात जास्त भूमिका लक्षात राहिली ती म्हणजे माहेरची साडी या चित्रपटातली.
अलका इनामदार यांनी लेक चालली सासरला, सासरचं धोतर, हृदयस्पर्श, माहेरची साडी, फौजदार, शेम टू शेम, धडाकेबाज यांसारख्या अनेकविध चित्रपटांमध्ये अतिशय उत्तम आणि चांगल्या भूमिका साकारल्या.
पुढे त्यांच्या योग्य भूमिका न मिळाल्याने अभिनय क्षेत्रातून त्यांनी संन्यास घेतला.
केवळ अभिनय करत न राहता त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत निवडणूक लढली होती, त्यांची लोकप्रियता इतकी होती कि त्या बहुमताने तिथल्या नगरसेविका देखील बनल्या.
नगरसेविका पदावर असताना त्यांनी अनेक चांगली कामे केली. चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर दिनकर इनामदार आणि अलका इनामदार हे कोल्हापुरातच राहत होते. पुढे वृद्धापकाळाने २२ जानेवारी २००४साली त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अवघ्या एका वर्षातच त्यांचे पती दिनकर इनामदार यांचेही निधन झाले.
चित्रपट क्षेत्रात पडद्यावर त्यांच्याइतकी भावनिक आणि सशक्त आईची भूमिका करणारी अभिनेत्री अजूनही आपल्याला बघायला मिळत नाही. त्यांची प्रत्येक भूमिका कायम स्मरणात राहील.
हे हि वाच भिडू :
- लक्ष्या, तू फक्त मराठी सिनेमा जगवला नाहीस, तर आमचं बालपण अगदी मज्जेत घालवलस..
- मोरूची मावशीपासून ते जत्रातले कान्होळे, विजूमामांची कॉमेडी प्रत्येक पिढयांना हसवत राहिली
- बॉलिवूडच्या नटीने अपमान केला, दादांनी सातारा स्टॅन्डवर गाठ पडलेल्या पोरीला हिरॉईन बनवलं..