राजकीय संबंधांसोबतच या उद्योगांमुळं अदानी श्रीमंतांच्या यादीत अंबानींना टक्कर देतायेत
स्वातंत्र्यांनंतर टाटा, बिर्ला, बजाज या घराण्यांनी भारताच्या औद्योगिक भरभराटीला हातभार लावला. १९९१-९१ पर्यंत मार्केट ओपन होईपर्यंत याच घराण्यांच्या दबदबा होता. मात्र आर्थिक उदारीकरणानंतर काही नवीन प्लेयरची मार्केटमध्ये भरभराट होऊ लागली त्यातलेच दोघं होते अदानी आणि अंबानी.
आज २१व्या शतकात भारतातल्या सगळ्यात मोठे वेल्थ क्रिएटर्स कोण म्हटल्यावर फक्त हीच दोन नावं डोळ्यासमोर येतात.
मागच्या शुक्रवारी $९१.१ अब्ज संपत्तीसह अदानी यांनी अंबानींना धोबीपछाड देत आशियातील सगळ्यात श्रीमंत माणसाचा ‘किताब पटकावला होता.
अंबानी यांची एकूण संपत्ती तेव्हा $८९.२अब्ज आहे. आता या दोघांमध्ये आटातटीचा सामना असल्याने शेअरबाजारातील किंमतीवर यांचे क्रमांक पुन्हा खालीवर होत राहतील.
परंतु अंबानींच्या विपरीत, अदानी हे पहिल्या पिढीतील उद्योजक आहे ज्यामुळे त्याचे यश अधिक उल्लेखनीय असल्याचं सांगण्यात येतंय.
खाद्यतेल कंपनी अदानी विल्मार मंगळवारी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग होणारी अदानी समूहाची होणारी ७वी कंपनी ठरली आहे.
एवढा यशस्वी अदानी समूह उभारण्यासाठी गौतम अदानी यांना फक्त तीन दशके लागली त्यात त्यांच्या शेअर बाजरात लिस्टिंग झालेल्या कंपन्यांचे आज एकत्रितपणे $१५३ अब्ज डॉलर्सचे बाजार भांडवल आहे.
१९७८ मध्ये, वयाच्या १६ व्या वर्षी हिऱ्यांच्या व्यापारात कोणती संधी मिळते का हे बघायला अदानी मुंबईला आले होते. पुढे गुजरातला परत जाऊन त्यांनी आपल्या भावाचा प्लास्टिक कारखाना चालवण्यास मदत केली. मग १९८८ मध्ये, अदानी समूहाचा जन्म झाला जेव्हा अदानी यांनी वस्तूंची आयात आणि निर्यात करण्यासाठी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसची स्थापना केली.
आज दोन डझन पेक्षा जास्त कंपन्या अदानी समूहामध्ये येतात, त्यापैकी बरेच भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी आहेत.
त्यातल्या शेअरबाजरात लिस्टिंग असलेल्या ७ कंपन्यांनी अदानींना एवढी संपत्ती जमवण्यास मदत झाली आहे. त्यांचीच माहिती घेऊ.
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन हे भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर ऑपरेटर आहे, ज्याची १३ बंदरे आणि टर्मिनल्स पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनारपट्टीवर आहेत.अदानी एंटरप्रायझेस हा भारतातील सर्वात मोठा कोळसा व्यापारी, सर्वात मोठा कोळसा खाण कंत्राटदार तसेच सर्वात मोठा खाजगी विमानतळ ऑपरेटर आहे, ज्यांच्याकडे सध्या मुंबई विमानतळासारखी आठ विमानतळे आहेत.
अदानी ग्रीन एनर्जी ही जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा विकासकांपैकी एक आहे, अदानी ट्रान्समिशन ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनी आहे आणि अदानी विल्मार हा देशातील सर्वात मोठा खाद्यतेल ब्रँड आहे.अदानी टोटल गॅस भारतातील सर्वात मोठा शहरी गॅस वितरण व्यवसाय चालवते आणि शेवटी, अदानी पॉवर ही भारतातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक वीज उत्पादक आहे.
सोलर मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स, औद्योगिक जमीन, संरक्षण आणि एरोस्पेस, फळे, डेटा सेंटर, रस्ते आणि रेल्वे, रिअल इस्टेट या क्षेत्रातही अदानी यांचे पायाभूत सुविधांचे साम्राज्य पसरले आहे.
राजकीय पुढाऱ्यांशी असलेल्या संबंधांचा फायदा गौतम अदानी यांना पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात फायदा झाला.
इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात गुंतवणूक करणं रिस्की असते, अनेकवेळा या गुंतवणुकी बऱ्याच वेळ अडकून राहते मात्र राजकीय क्षेत्राशी असलेल्या घनिष्ट संबंधांवर अदानी यांनी हे धाडस केल्याचं सांगण्यात येतं.
मात्र या समूहाच्या वाढण्यावर काही आक्षेप पण नोंदवले जातात. ज्या क्षेत्रामध्ये जास्त भांडवल लागतं त्या उद्योगांमध्ये अदानी यांची गुंतवणूक आहे. त्यामुळं या कंपन्यांत एकूण थकित कर्जाचा $20 अब्जचा बोजा आहे.
तसेच समूहातील काही कंपन्यांचे मूल्यांकन हे फुगवून केले गेले असल्याने या उद्योगांची नक्की किती वॅल्युएशन आहे हे कळत नाही असं तज्ञ सांगतातवॅल्युएशन किती दिवस टिकून राहते हे.
अदानी विल्मार वगळता समूहाच्या लिस्टिंग केलेल्या समभागांची एकत्रित १२ महिन्यांची कमाई $१४.५ अब्ज आहे तर त्यांचा एकत्रित नफा फक्त $१.१४ अब्ज आहे. तरीही या सहा समभागांचे एकत्रित बाजार मूल्य $१४८अब्ज आहे.
त्यातही ग्रीन एनर्जीचे वाढलेले शेअर्सनी अदाणींच्या संपत्ती वाढीसाठी सर्वात मोठा हातभार लावला आहे.
अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स गेल्या तीन वर्षांत ५५००% पेक्षा जास्त वाढले आहेत आणि $४० बिलियनवर गेलेली ही कंपनी समूहाची सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे.आता अदाणींच्या कंपन्यांचे हे त्यांच्या भविष्यातील उद्योगांत कसे गुंतवणूक करतात यावर अवलंबून राहणार आहे.
हे ही वाच भिडू :
- गौतम अदानी यांनी आपल्या चरित्र लेखनाची तयारी २०१३ सालीच सुरू केलेली
- दक्षिण आफ्रिकेत वादग्रस्त ठरलेले गुप्ता बंधू आयपीएलच्या बोलीत अदानींना फाईट देत आहेत…
- आता राडा करणाऱ्या राखीनं अंबानींच्या लग्नात ५० रुपयांसाठी केटरिंगचं काम केलंय…