ALT न्यूज, मोहम्मद झुबेर हे खरंच शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत आहेत का ?
ऑक्टोबर उजडल्यानंतर जगभर एकाच पुरस्कराची जगभर चर्चा चालू असते ते म्हणजे नोबेल पुरस्कार. त्यातही सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती नोबेल शांतता पुरस्काराची. यासंबंधातच भारताच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
नॉर्वेच्या संसद सदस्यांनी शांतता पुरस्कारासाठी त्यांनी केलेल्या संस्थांची व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.रॉयटर्सच्या बातमीमधून यामध्ये बेलारूसच्या सरकारविरोधी नेत्या स्वीयातलाना सिखानौस्काया, ब्रिटीश पर्यावरण कार्यकर्ते डेव्हिड अॅटनबरो, जागतिक आरोग्य संघटना, पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग, पोप फ्रान्सिस, तुवालूचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे आणि म्यानमारचे राष्ट्रीय एकता सरकार यांचा समावेश आहे. भारताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ALT न्यूज संस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांचा देखील या शॉर्ट लिस्ट केलेल्या नावांमध्ये समावेश आहे.
विशेष म्हणजे बाकीची नोबेल पारितोषिकं स्वीडनतर्फे दिली जात असताना शांततेसाठीचं नोबेल मात्र नॉर्वेतर्फे दिलं जातं.
जी नोबेल कमिटी नोबेल पिस प्राईझसाठीच्या नावाची निवड करते त्या कमिटीची नेमणूकसुद्धा नॉर्वेच्या संसदेमार्फत केली जाते आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही अपवाद वगळता नोबेल कमिटीने निवडलेला विजेता हा नेहमी नॉर्वियन संसद सदस्यांनी निवडलेल्या नावातीलच एक राहिला आहे. त्यामुळे जेव्हा नॉर्वियन संसद सदस्यांनी केलेलं नामांकन महत्वच ठरतं.
पण आता नॉर्वेयच्या संसद सदस्यांनी नॉमिनेट केलंय म्हणून नोबेल मिळतं असं कन्फयुजन करू नका. कारण पाच सदस्यांची नोबेल समिती हे संपूर्ण स्वायत्तपणे काम करते. या समितीला नामांकन पाठवतात. जगभरातील संसद सदस्यांपासून माजी विजेत्यांपर्यंत हजारो लोक उमेदवारांचं नामांकन देण्यास पात्र आहेत.
त्यामुळेच 2022 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी 343 उमेदवार आहेत, त्यापैकी 251 व्यक्ती आणि 92 संस्था आहेत.
आता यातील एका संस्थेची किंवा व्यक्तीची निवड नोबेल कमिटीतर्फे केली जाणार आहे. थोडक्यात नोबेल प्राइझसाठी नामांकनं भरपूर आहेत मात्र मोहम्मद झुबेर आणि प्रतीक सिन्हा म्हणजे ज्यांच्या नामांकनाने नोबेल प्राईझ मिळण्याची शक्यता आतपर्यंत जास्त राहिली आहे अशा लिस्टमध्ये त्यांचं या दोघांचं नाव आलं आहे.
पण या लिस्टमध्ये असणारी बाकी नामांकनही तेवढीच तगडी आहेत. त्यांचीच एक एक करून माहिती घेऊ म्हणजे ALT न्यूजच्या कार्यकर्त्यांच्या नोबेल पिस प्राईझ मिळण्याच्या शक्येतेची आपल्याला आयडिया येइल.
व्होलोडिमिर झेलेन्स्की
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या शांतता पारितोषिक जिंकण्याला सट्टेबाजांनीही पसंती दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, झेलेन्स्की देश सोडून नं जाता कीवमध्ये खंबीरपणे उभे राहिले.
“आम्ही इथे आहोत… आम्ही कीवमध्ये आहोत. आम्ही युक्रेनचे रक्षण करत आहोत.” हा त्यांनी कीव्हमध्येच दिलेल्या संदेशाची जगात चर्चा झाली होती.
बलाढय रशिया विरोधात युक्रेनचं जे खंबीरपणे नेतृत्व केलं आहे त्यामुळे त्यांना यंदाचं नोबेल पिस प्राईझ मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
निर्वासितांसाठी काम करणारी UN रेफुजी एजेंसी
युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजी (UNHCR) युक्रेन आणि अफगाणिस्तानमधील निर्वासितांना प्रतिसाद देण्यासाठी, गरजूंना रोख मदत आणि मदत वस्तू प्रदान करण्यात आघाडीवर आहे. युक्रेनमधील युद्धामुळे 24 फेब्रुवारीपासून संपूर्ण युरोपमध्ये युक्रेनमधून 7.2 दशलक्षाहून अधिक निर्वासित आले आहेत आणि 6.9 दशलक्षाहून अधिक युक्रेनियन लोक अंतर्गत विस्थापित झाले आहेत. यू.एन.च्या म्हणण्यानुसार हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपमधील सर्वात मोठे निर्वासित संकट आहे. या संस्थेला यापूर्वी 1954 आणि 1981 मध्ये शांतता पुरस्कार मिळाला होता.
स्वीयातलाना सिखानौस्काया
देशाच्या 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या विरोधात लढल्यापासून बेलारशियन विरोधी राजकारणी स्वियातलाना त्सिखानौस्काया हद्दपार जीवन जगत आहेत. अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या एकाधिकारशाही विरोधात स्वियातलाना त्सिखानौस्काया यांनी बेलारुसमध्ये मोठं जनांदोलन उभारलं गेलं आहे.
जागतिक आरोग्य संघटना
जवळपास तीन वर्षांपासून जागतिक आरोग्य संघटना कोविड-19 ला प्रतिसाद देण्यात आघाडीवर आहे. जगभरात या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पैसे, लस आणि उपकरणे पुरवल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेची जगभर प्रशंसा केली जात होती. गरीब देशांवर लक्ष केंद्रित करणार्या WHO-समर्थित COVAX कार्यक्रमाने आतापर्यंत 146 देशांमध्ये 1.7 अब्जाहून अधिक लसी वितरीत केल्या आहेत.
ॲलेक्सी नॅव्हल्नी
रशियाचे तुरुंगात असलेले रशियातील प्रमुख विरोधी पक्षनेते आणि भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते ॲलेक्सी नॅव्हल्नी हे लोकशाही सुधारणांच्या लढाईतील प्रमुख व्यक्ती आहेत. 2011 मध्ये नॅव्हल्नी यांनी भ्रष्टाचारासाठी उच्च पदस्थ रशियन अधिकार्यांची चौकशी करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी फाउंडेशनची स्थापना केली. तसेच पुतीन यांच्या एकाधिकारशाहीला विरोध करण्यातही नॅव्हल्नी कयामच पुढे राहिले आहेत.
मात्र त्यांच्या या कामामुळे त्यांना वैयक्तिक सुरक्षिततेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. 2020 मध्ये एका हत्येच्या प्रयत्नातून ते थोडक्यात बचावले आहेत. त्याच्या जीवाला धोका असूनही जर्मनीमध्ये काही काळ राहिल्यानंतर ते रशियामध्ये परतले आहेत.
ग्रेटा थनबर्ग
स्वीडिश हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग जागतिक शक्तींवर हवामान संकटाचा सामना करण्यासाठी आणखी काही करण्याचा दबाव ठेवला आहे. थनबर्ग बऱ्याच काळापासून क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2021 मध्ये तिने COP26ची हवामान शिखर परिषद “अयशस्वी” म्हणून नाकारली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ग्रेटाचं नाव नोबेल पिस प्राईझ साठी चर्चेत आहे त्यामुळे यावेळी तरी तिला नोबेल भेटणार का हे पाहण्यासारखं आहे.
सायमन कोफे
तुवालू या पॅसिफिक समुद्रातील छोट्या देशाचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे यांनी हवामानाच्या संकटाशी निगडित करण्याच्या त्यांच्या मिशनचा मुख्य भाग बनवला आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आणि नऊ लहान बेटांनी बनलेला तुवालू सारख्या पॅसिफिक बेटांना वाढणारा समुद्रपातळीचा महत्त्वाचा धोका आहे.
डेव्हिड अॅटनबरो
डेव्हिड अॅटनबरो 9 हे लाइफ ऑन अर्थ आणि द ब्लू प्लॅनेटसह त्याच्या प्रतिष्ठित निसर्ग मालिकेसाठी सर्वात प्रिय आहे. त्यांनी अनेक दशकांपासून वन्यजीव आणि निसर्गाच्या संवर्धनसाठी प्रयत्न केले आहेत. अगदी अलीकडे अॅटनबरो यांनी संयुक्त राष्ट्र आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी हवामान संकटाचा सामना करण्याचं आवाहन केलं आहे.
आणि या सर्वांशी नोबेल प्राइझसाठी तगडी फाइट करताना दिसतील भारताचे झुबेर आणि प्रतीक सिन्हा
नुकत्याच झालेल्या नूपुर शर्मा प्रकरणानंतर एका जुन्या शोधलं मीडिया पोस्टसाठी मोहम्मद झुबेरला जेलमध्ये जावं लागलं होतं. पत्रकार प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर भारतीय तफॅक्ट चेकिंग वेबसाइट AltNews चे सह-संस्थापक भारतात चुकीच्या माहितीशी लढा देत आहेत, जिथे हिंदू राष्ट्रवादी भाजप पक्षावर वारंवार मुस्लिमांविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप आहे.
सिन्हा आणि झुबेर यांनी पद्धतशीरपणे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा , द्वेषयुक्त भाषण आणि खोट्या बातम्यांमागील सत्य सांगितलं आहे असं टाइम मॅगझिनने या दोघांबद्दल म्हटलं आहे. त्यामुळे जगभर फेक न्यूजचा लोकशाहीला सर्वात मोठा धोका असताना जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात फेक न्यूजच्या विरोधात काम करणाऱ्या या दोघांना नोबेल पिस प्राइझसाठी नॉमिनेट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.त्यामुळे सध्यातरी ALT न्यूजचे हे संस्थापक नोबेल पीस प्राईझ मिळवण्याच्या शर्यतीत आहे मात्र त्यासाठी त्यांच्याबरोबर अनेक तुल्यबळ नावं आहेत.
इतर संस्थांनी जसं की The Peace Research Institute Oslo या संस्थेने भारतात मानवी हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते हर्ष मंदेर यांचंही नाव नामांकित केलं आहे.
त्यामुळे मदर तेरेसा आणि कैलाश सत्यार्थी यांच्यानंतर तिसरं शांततेचं नोबेल भारतात येतं का हे या निमित्ताने पाहण्यासारखं असणार आहे.
हे ही वाच भिडू :
- ज्या प्रकरणात मोहम्मद झुबेरला अटक करण्यात आली आहे; ते प्रकरण नेमकं काय आहे ?
- केतकी म्हणतेय तसं खरंच तिला वेगळा आणि झुबेरला वेगळा न्याय मिळालाय का?