अल्ताफ राजा ऐकणाऱ्याला कुजकट नजर द्यायची नाय भौ..   

मला घेणं न देणं गावाच्या बसस्टँडवर उतरल्यावर रोमॅन्टीक वाटयला लागतंय. आता हा उगाच रोमॅन्टीक देशीवाद वाटू शकतो. बसस्टँडचा परिसर, गावच्या बाहेरचे हायवेवरील धाबे, खेड्यापाड्यांना जोडणारे फाटे, त्या फाट्यांवरच्या चहाच्या टपऱ्या, टपरी बाजूलची पानपट्टी, नास्त्यांच्या दुकानापुढील स्टॉलवरचे धुळ बसेलले वात्तड भजी-शेव,शिळे समोसे. अन चहाच्या कपाला लागलेला राकेलचा वास. या परिसरात धुळीत उडणाऱ्या गुटाख्याच्या पुड्या….

हे सारं आपल्यात उगाच उरलंय. कारण ना आपण धड शहरी आहोत ना गावातले…

हा मोक्कार तळाला साचलेला पहिल्या प्रेमाचा गाळ, एसटीच्या लाल डब्ब्यानं प्रवास करताना उगाचं उफाळून येतो. आपण एसटी थांबू तिथं उतरतो, पानटपऱ्या, चहाटपऱ्या न्याहळतो, ह्या धुळीचा त्रासही होत नसतो आपल्याला. या सगळ्या सीनच्या बँकग्राउंडला काही ठरलेले गाणे वाजत अस्तेत. म्हणून हे जास्तच रोमँन्टीक वाटतं, आणि आपण कानात लावलेल्या बुचनं, त्यातलं कितीही भारी अर्जीत बिर्जीत सिंगचं गाणंही बंद करून टपरीवर वाजणाऱ्या गाण्यात शिरायला लागतो.

या प्रवासात कधी,

   “पहले तो कभी कभी गम था, अब हर पलही तेरी याद सताती है…..”

असं अल्ताफ राजाचं गाणं टपरीवर वाजत राहतं.

कधी आडनिड्या रेल्वेस्टेशनवर उतरून गावाला जातना टमटम रिक्षात,

“तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओंगे”… 

असं भल्तं येगळंचं गाणं बुलबुल सिताऱ्याच्या मुझ्यीकवर फाटलेल्या स्पीकरमधून वाजत राहतं. या गाण्याचा आवाज मोक्कार फुफाट्यानं आसपासच्या वावरात कापूस येचणाऱ्या बायाच्यांही कानावर हलकासा पडत राहतो.

हिकडं तालुक्याला जाणाऱ्या जिपड्याच्या ड्रायवरकडे धा हाजाराचा मोबाईल अन् जिओ आलं तरीबी ते युटुबरबी मिथुन चक्रवर्ती ज्या गाण्यावर दारू पितो ते

“इश्क और प्यार का मजा लिजीये”… 

या गाण्याचा ड्रायवर गुटख्याचा तोबरा धरून मजा घेत असतो.

पक्या कांबळेकडं जाताना शकीलच्या टपरीवर मोहल्ल्यातून जावं लागतंय. शकील्या भाडखौ तीन लेकराचा आब्बा झालाय तरीबी,

“आवारा हवा कां झोका हू, आ निकला हूँ पल दो पल के लिये”..

ऐकून उगाच खुष होत राहतो. शकील्याकडं अल्ताफच्या भरून आनलेल्या कॅशेटी अाजूकबी आहेत. त्यानं त्या पत्र्याच्या पेटीत ठेवल्यात. त्याचं बाजर समिती जवळ गाण्याच्या कॅसेटी भरायचं ‘सिंगर’ नावाचं दुकानं होतं. 20 ते 30 रूपायला कोरी कॅसेट भेटायची. त्यात 3 रूपायला एक असं गाणं भरून भेटायचं. आमचा संध्याकाळचा अड्डाचं ‘सिंगर’ वर पडीक असायचा. तिथूनंच जिपडे जिल्ह्याला जाण्यासाठी उभे राहिलेले असायचे. सगळी ड्रायव्हर गँग त्याच्याकडं गाणं भरून घ्यायला यायची.  पुढं सिडी प्लेअर आले, एमीथ्री आलं. याचा धंदा चलना गेला. त्यानं पुढं टपरी टाकली. अल्ताफ राजाचा आवाजानं त्याच्या सिंगर दुकानाला बरकत नव्हती आली पण टपरी टाकल्यावरबी शकील्यानं अल्ताफ राजाचा नाद काय सोडला नाय. अशा लयी कहाण्या गावखेड्यात लयीजणासोबत असतील.

टपऱ्या ते मोहल्ले, धाबे ते तालुक्यातले बार, सहा सिटर टमटम ते कमांडर जिपडी सगळ्यात अल्ताफ राजाचा आवाज आजूकबी टिकून आहे.

रोजदांरीनं कामावर जाणाऱ्या यंग्राट पोरांना 2017 मध्येही मिथुनंच आपला हिरो  वाटतो. त्यांच्यासाठी अल्ताफ राजाच गायक असतो. किंवा कोण गायक असतं किंवा नसतो यानंही काही फरक पडत नाही. अभिरूची, कला वैग्रे शब्द या थांबलेल्या काळासाठी नसतात. हिथं मनोरंजन दुय्यम मुद्दाये, अभिरूचीही दुय्यम मुद्दाये फक्त कोणत्याही परिवेशातल्या माणसांना हलकंस गुणगुणता आलं पाहिजे. आपल्या कसल्याबी भावनांना कोणत्याही-कुठल्याही संगीतानं रिलेट करता आलं पाहिजे बास.

आपण हे सगळं दुरून पाहत असतो. तेवढा बेरकीपणा शहर आणि तुमचा सांस्कृतिक हेपालण्याचा संघर्ष तुम्हाला शिकवत असतो.

आता तालुक्याच्या बारमध्ये कुणी शकील्या, पक्या सोबत बसल्यावर ट्युबर्ग वैग्र नस्ती प्यायची. तिथं कडूझार “झिंगारू” बिअर  कडक वटाणे अन् करपलेल्या पापडासोबत वढायची अस्ती. 

झिरोच्या लाईटीत अल्ताफ राजाच ऐकायचा असतो. 

तुमच्यातलं शहर दिवाळीच्या सुट्टीत विसरायचं अस्तं. 

साला, आपण ऐवढीचं रोमँन्टीक डायलॉग बाजी करू शकतो. नव्वदीतल्या निमशहारातून पुण्याबिण्याकडं येऊन पोटपाणी करणारे माझ्यासारखे लयी असतेन. परत  कुणी अल्ताफ राजा ऐकताना दिसलं  तर त्याच्याकडं तुच्छतेनं बघून गचाळ कुचकट पोज दिली नायी पायजे भाऊ .

तमाम कमांडर जिपडं,  टमटम लव्हर संघटनेकडून अल्ताफ राजाला मानाचा लव्ह यू…. 

  • भिडू कुणाल गायकवाड. 

हे ही पहा, हेच पहा  – 

1 Comment
  1. Deepak Baheti says

    Bol bhidu is almost mind blowing

Leave A Reply

Your email address will not be published.