अल्ताफ म्हणजे लांबूनच प्रेम करणाऱ्या व लांबूनच प्रचंड प्रेमभंग करून घेणाऱ्यांचा राजामाणूस.

‘इक रात ठेहेर जाए हम घर मे तेरे लेकीन, छत पर न सुला देना हम निंद मे चलते है ... किंवा  ‘मै खुद को जला भी सकता हू,  तेरी आंखो के काजल के लीये’ …. हे अस काही पहिल्यांदा जेव्हा ऐकले तेव्हा हसाव की रडाव कळल नाही, नेहमीच्या गाणे व शायरीपेक्षा काहीतरी वेगळे आहे इतक जाणवलं.

आमच्या डीएड च्या जीवनात ईश्वर नावाचा मित्र आला आणि त्या ईश्वराने अल्ताफ राजा नावाचा डीएनए आमच्यात सोडला…

आज इतक्या वर्षानंतर देखील मध्येच हा डीएनए कधीतरी अॅक्टिव होतो आणि अस्वस्थ करतो…. त्यामुळे कधीतरी त्याचे व सोबत ईश्वराचे देखील उतराई होणे गरजेचे होते. म्हणून –
समाजाच्या जीवनात अनेक समांतर समाज व त्यांच्या आवडी निवडी टिकून असतात.  समाजाच्या व सत्तेच्या वरच्या घटकात काय होतेय पेक्षा गाव पातळीवर काय होत व हा गाव समूह आपल्या सांस्कृतिक व भाषिक ऐवजाची पिढ्यानपिढ्या जपणूक करत अधिकाअधिक समृद्ध करत जातो.
नेमाडे सरांनी हिंदूमध्ये असाच समांतर जीवनप्रवाह मांडला आहे. सातपाटिल कुलवृत्तांत सुद्धा रंगनाथ पठारे सरांनी असेच नायक घेऊन समाज प्रवाह मांडला आहे. जे आपल्यातले, आजूबाजूच्या वातावरणाचे घटक असतात.
जे कोणत्याही उच्च राजवंशीय घरात जन्मलेले नसतात पण ही लोक व त्यांचे जगने हा तत्कालीन समाजाचे अस्सल चित्र उभे करतो.
पूर्वीच्या राजांच्या पदरी लेखक असत ते राजाचा काळातील इतिहास लिहितांना तो राजवैभवाचा इतिहास लिहीत. जसे सम्राट हर्षवर्धनच्या काळात बाणभट्टने हर्षचरित लिहिले होते किंवा गुप्त राजांच्या प्रशस्ती लिहिल्या गेल्या,  त्या राजा व राजघराण्याचा इतिहास सांगतात.
तत्कालीन समाजातील दुर्लक्षित, खालच्या व मध्यम घटकातील जीवन, त्यांच्या आवडी निवडी त्यांचे सांस्कृतिक संचित क्वचितच अशा लिखाणात येत असे. त्यामुळे उच्च वर्ग व त्यांची अभिरुचि ही कालांतराने बाकीच्या समाजावर पसरत असे व कळत-नकळत गाणी-नाट्य हे  सांस्कृतिक घटक देखील त्यात विभागले जात असत. प्रसिद्ध राजकीय विचारवंत अंटोनियो ग्रामशी याच्या  सांस्कृतिक वर्चस्व (cultural hegemony) संकल्पनेच्या परिप्रेक्ष्यातून पाहील्यास अशा अनेक घटना आपल्याला जाणवतात.

म्हणून मग अनेक वर्षं भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटीशांचा शेक्सपियर भारताच्या घराघरात जातो

किंबहुना स्वातंत्र्योत्तर  काळात अमेरिकन – यूरोपियन आवडी -निवडी, साहित्य, कला, दैनेदिन वापरायच्या वस्तु आपल्यावर अधिराज्य गाजवत असतात.
असे असले तरी समाज हा आपल्या-निवडी टिकवून ठेवतो व त्या जोपासतो सुद्धा. म्हणून मग गावकुसाबाहेरील म्हणून ओळखली जाणारी तमाशा -लावणी सारखी कला याच समाजाने जोपासली व टिकवली सुद्धा.
नंतर मग सुरेखा पुणेकर सारख्या मंडळींनी तिला प्रतिष्ठित म्हणवल्या जाणार्‍या नाट्यमंदिरात तिकीट लावून प्रयोग सुरू केल्यावर मग आपोआप त्याभोवती एक वलय तयार झाले. पण तोपर्यंत अनेक ज्ञात-अज्ञात कलाकारांनी त्यासाठी आपली आयुष्ये वेचली होती.
दादा कोंडकेच्या चित्रपट व विनोदांवर नाके मुरडणारि मंडळी होती. हा एक समांतर प्रवाह सुरूच असतो.
1988-89 च्या काळात आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांच्या ‘जवा नवीन पोपट हा’ ला घरात व बैठकीत नावे ठेवणारी मंडळी बाहेर जाऊन पान-टपरीवर  हीच गाणी ऐकत उभी राहत. एरवी पार्टी किंवा इतर ठिकाणी नाव न घेणारी मंडळी लग्नात सचिन कुमावत चे ‘सावन ना महिना मां…’, ‘केसावर फुगे’ किंवा ‘रेतीवाला नवरा’ किंवा ‘मामा तुनी पोर..’ अशी गाणी लागल्याशिवाय नाचत नाहीत. किंबहुना डिजे कडे याच फर्माईश जास्त येतात.
परवा अमोल उदगीरकर त्याच्या एका लेखात जस म्हटला की, ‘हिमेश रेशमिया मला आवडतो अस चार-चौघात बोलायचं नसत. शास्र असत ते. एकट असतांना त्याची गाणी रिपीट मोडवर ऐकायची असतात व ग्रुपमध्ये त्याला शिव्या घालायच्या असतात’  असा प्रकार आहे हा. हाच धागा पुढे अल्ताफ राजा पर्यन्त वाढवता येतो. म्हणून मग तथाकथित बौद्धिक – सांस्कृतिक वर्तुळातील चर्चा व कार्यक्रमात अल्ताफ राजा निषिद्ध असतो.

अल्ताफ राजा आपल्याला सापडायचा ढाबे, पानटपर्‍या, ट्रकचे केबिन, वडाप, काली-पिली व बार मध्ये.

अजूनही अनेकदा तो तिथेच सापडतो. साधारण 1996-98 चा काळ असावा. त्या काळात वयात येणार्‍या पिढीत करिश्मा-अमीर चा ‘राजा हिंदुस्तानी’ टॉप फ्लेव्हर होता. त्यातील ‘परदेशी परदेशी जाना नही’  जोरात असतांनाचा खालून अचानक उसळी मारून वर याव तस ‘तूम तो ठेहेरे परदेशी’ आल.
नुसत वरवर मुखडा जरी पाहिला तरी ‘जाना नही’ मध्ये एक request होती आर्जवं होत. जे नैसर्गिक असणार होत पण ‘तूम तो ठहेरे’ मध्ये एक निगेटिव आत्मविश्वास होता ज्याला जणू आधीच माहीत असलेल्या अपेक्षाभंगाची तीव्र झालर होती.

त्यामुळे अर्धशहरी व ग्रामीण भागात अल्ताफ झटकन पचनी पडला.

मुलींशी न बोलताच लांबून प्रेम करणारी व लांबूनच प्रचंड प्रेमभंग करून घेणारी एक जमात असते. अर्धवट न कळणारे वय, वाफाळलेले दिवस, शरीरातील बदल व हे कुठच व्यक्त करू न देणार्‍या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितित अनेक गंड घेऊन वयात येणार्‍या या पिढीला अल्ताफ च्या शायरी व गाण्यांनी सांभाळले.
किंबहुना ‘मेरे बाद तुम कीस पर बिजलिया गिराओगे’ किंवाऔर भाव क्युं गिर गया है सोने का, उसने पितल पेहेन लिया होगा’ तसेच ‘ये आईने जो तुम्हे कम पसंद करते हैवो जानते है की तुम्हे हम पसंद करते है’ इतका भयंकर कॉन्फिडन्स  अल्ताफ शिवाय आजून कोण देणार होत?!

बारावी नंतर डी.एड ला नंबर लागण्याचा मधला कालावधी होता तो.

असेच कुठेतरी काली-पिली मधुन जात होतो. त्यांच्या पुढच्या शिटवर कसही करून पाच प्रवासी बसवत असत.  नेमका माझा नबर ड्रायव्हर जवळ होता. गियरच्या नेमक्या या की त्या बाजूला पाय घ्यायचे असा प्रश्न असतो. एकदा अडकले की अडकले. अशात गाडी चालवत असतांना नेमकं चालू असलेले गाण संपलं त्यामुळे ड्रायव्हरने मला हात खाली घेऊन दुसरी कॅसेट काढायला सांगितली. खाली काही दिसत नव्हते पण ड्रायव्हरची आज्ञा असल्याने खाली हाताला येईल ते काढले ती एक कॅसेट होती. ज्यावर अमीर व करिश्मा चा राजा हिंदुस्तानी तील फोटो होता पण खाली अजून एक व्यक्तिचा पण फोटो होतो व नाव होते,
‘तूम तो ठेहेरे परदेसी’… हा माझा पहिला परिचय होता अल्ताफ राजाचा.
पुढे डी.एड. ला असतांना ईश्वर आमचा रूममेट झाला व कधी-मधी खिडकीतून झलक देणारा अल्ताफ दरवाजातून आमच्या रूममध्येच मुक्कामी आला,
आम्ही आपल सहज नॉर्मल गाण ऐकाव म्हणून ऐकत असू पण ईश्वर त्याचा डाय हार्ट फॅन होता.
‘जगह भी मेरी व इलाखा भी मेरा’ सारखं ‘कॅसेट भी माझी व टेप भी माझाच’ अस ईश्वरचे होत त्यामुळे आम्हा गरीब बापुड्यांना ऐकण्यावाचून पर्याय नव्हता. त्या काळात जेव्हढे काही अल्ताफ ची गाणी असतील ती आरती सारखी रोज आमच्या रूम मध्ये वाजत. त्यामुळे जाणीव नसतांना अनेक गाणी आमची तोंडपाठ होऊन जात.

पण तरी ती गाणी ईश्वर कडून ऐकण्याची एक मजा असे.

अगदी तल्लीन होऊन तो ती म्हणत असे. त्यामुळे चिखलदर्‍याच्या घाटात बसमध्ये धर्माधिकारी सरांनी ईश्वरला ‘तूम तो ठहरे ..’ म्हणायला सांगितलं तेव्हा आधीच तब्येतीने किरकोळ असलेल्या ईश्वरने ते म्हटलेले अजूनही डोळ्यापुढे उभे राहते.
‘क्या करोगे तूम आखीर कब्र पर मेरी आकर…. इथून जो जानेवारी ते डिसेंबर असा बारा महिन्यांचा प्रवास सुरू होतो  तो संपल्यानंतर लेकीन ये लेकिन ये क्या बताऊंअब हाल दूसरा है यातील समेवर येणारी दुसरी ओळ,
अरे वो साल दूसरा थाये साल दूसरा है’ म्हटल्यानंतर चेहर्‍यावर झळकणारे पूर्ततेचे समाधान औरच होते.
अल्ताफच्या गाण्यांमध्ये त्याच्यानंतर कोरसमध्ये गाणारे कव्वाल जस त्याच्या गाण्यांना वेगळेपण देतात तस अजून काही बाबी होत्या ज्यामुळे अल्ताफचे फॅन मनातूनच त्याच्यावर खुश असत.
एक तर त्याचा आवाज पठडीतील गायकांपेक्षा फारच वेगळा होता. काहीसा तलम, मुलायम असलेला त्याचा आवाज लगेच ओळखू येत असे.

तसेच गाणी म्हणणारा अल्ताफ त्यातील शेर अशा काही नजाकतीने पेश करत असे की बस. 

शिवाय जवळपास प्रत्येक शेर दोनदा म्हणण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे तो सर्वांना पटकन कळत असे. त्याने गाण्यात व शेर मध्ये वापरलेली भाषा सहज व सोपी असे उर्दूतील  अवघड शेर  तो वापरत नसे.
‘तुम्हारे घर दरवाजे है लेकीन तुम्हे खतरे का अंदाजा नही है, हमे खतरे का अंदाजा है लेकीन हमारे घर मे दरवाजा नही है’
हे समजण्यासाठी कोणत्याही स्पेशालिटीची गरज नव्हती. शेर व गाण्यातील एखादी शब्दावर विशेष जोर देऊन वळण देण्याची त्याची पद्धत होती. तुझको देखेंगे सितारे तो ज़िया मांगेंगे यानंतर ‘ऐ’ वर जोर देवून परत तीच ओळ म्हणणे असो वा, खिंचे खिंचे हुए रहते होक्यूँ? यातील ‘क्यूँ?’ शब्द म्हणण्याची पद्धत. अशा अनेक जागा त्याच्या गाण्यात होत्या.
काही गाण्यात अनेक इंग्रजी शब्द सहज वापरत असे, जसे  यारो मैने पंगा ले लिया मधील, कन्फ्युजन, डार्लिंग, प्रोग्राम इत्यादि.

थोड्याच कालावधीत अल्ताफ चित्रपटांमध्ये गाणी म्हणताना व नाचताना दिसायला लागला.

शपथ, कंपनी मधील त्याची गाणी हीट होती. अलीकडे हंटर(2015) मधील ‘तू मुस्कूराए वही चाहत है, दिल चुराणा तो मेरी आदत है’ हे त्याचे ऐकलेले शेवटचे हीट गाणे.
डिएड नंतर बाबांच्या गावी गेलो. मुक्ताईनगर-मलकापुर-बरहानपूर बॉर्डर वर सातपुडयाच्या पायथ्याशी असलेले आदिवासी गाव व  छोटी आश्रमशाळा, कधीतरी जात असल्यामुळे जुजबी ओळखी.  संध्याकाळ घालवायला सहज मैदानात जात असू.
अशाच एक अवलियाच्या भेटीत कळले की बस ये भी फॅन है….
जवळच असणार्‍या सातपुड्याच्या डोंगरांकडे नजर लावून तो एक दिवस बोलला, ‘दादा, त्या तिकडे डोंगरापलीकडे बरहानपुरला अल्ताफ राजाचा मुशायरा होता. आधी जाऊन पुढे घुसून बसलो होतो. हे अस जवळून पाहिलं होत मी त्याला…. अशावेळी काळ्याशार चेहर्‍यावरील त्याचे डोळे चमकदार होत असत.

अल्ताफ राजा जवळून पाहिलेला माणूस’ होता तो.’

मग ‘एहेसास के शिकस्त से कुछ अश्क निकलते है,ये बर्फ के तुकडे है गरमी से पिघलते है’
(त्याचा तो  आवडता शेर होता)  अस म्हणून तो अजून कोणाच्या तरी आठवणीत रमून जात असे. त्याच्या आवाजात भयंकर दुख असे.
एकदा जिंतुर (परभणी) हून नाशिक जायचे होते. रात्रीची शेवटची एस.टी निघून गेली होती. फाट्यावरून एक पीक-अप भेटली. ड्रायव्हर एकटाच होता त्यामुळे बसायला मोकळी जागा मिळाली. मंठ्या पर्यन्त थोडाफार संवाद झाला असही मी तेव्हा फार बोलत नसे. मग हे गिराहिक फार बोलत नसल्याचे पाहून गड्याने  कॅसेट लावली, नेमकी अल्ताफ राजाची.
मनात म्हटलं आता जर हा लईच मोठा फॅन निघाला तर आपली काही रात्रभर खैर नाही. आणि झालेही तसेच. सकाळ-सकाळी साडेतीन-चार वाजता वैजापूर च्या आसपास त्याने हॉटेल्सची लाइन पाहून साईडला गाडी लावली. हाइट म्हणजे एवढ्या सकाळी त्या हायवेच्या ढाब्यावर याचीच गाणे सुरू होती. पीक अप वाल्याला म्हटलं,
‘भाई, एकतर त्याचा तरी आल्ताफ राजा एकू दे नाहीतर तुझा तरी.’
मग याने बंद केला, मी पण झोपलो.  तो पण झोपला.

हे असे अल्ताफचे डायहार्ट फॅन भेटले की ते तुम्हाला विसरू देत नाहीत.

जाता-जाता अजून एक आठवण. काल-परवा एका वृत्तपत्रात मजूर करत असलेल्या स्थलांतरितांच्या बातमीत एक शेर वाचला आणि पटकन मला शिरपूरच्या करवंद नाक्याची आठवण आली. डीएडच्या हिवाळ्यातील सुट्टीचा  दिवस. दुपारी चहा प्यायला म्हणून नाक्यावरच्या हॉटेल वर आलो.(आता तिथे नाही ते हॉटेल). तीच गाणे सुरू होती, म्हटलं यार बदल आता लाव दुसर काही. इतक्यात चहा पित बसलेला मळकट कपड्यातील एक माणूस म्हटला,
भाऊ इतकच राहू दे मग बदल,
मग तो स्वत:च म्हणू लागला,
‘अभी राह मे है समंदर बहुत

खुदा मत बनो ना खुदाई के बात’
यातील पुढच्या ओळीत मी आता वाचलेला वृत्तपत्रातील शेर होता, तो असा-

न होंसले न इरादे बदल रहे है लोग
थके थके है मगर फिर भी चल रहे है लोग
वफा न प्यार न किरदार न उसुल कोई
न जाणे कौनसे सांचे मे ढल रहे है लोग’

अगदी आजच्या स्थितीला परफेक्ट बसणार्‍या या ओळी होत्या.

  • समाधान महाजन
हे ही वाच भिडू.
1 Comment
  1. Swapnil says

    सतवाहन अपवाद होते गाहासत्तसई वाचा कधि वेळ मिळाला तर

Leave A Reply

Your email address will not be published.