हिट गाणी देऊनही वडिलांना ओळख नव्हती तरीही समीर गीतकार झाला आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं

तब्बल ३०० हिंदी चित्रपट आणि पंधराशेहून अधिक गाणी लिहिणारे गीतकार अंजान हे नावाप्रमाणेच ‘अंजान’ राहिले का? खरंतर त्यांनी अतिशय लोकप्रिय अशी गाणी दिली. विशेषत: अमिताभ बच्चन यांच्या भरभरीटीच्या काळामध्ये ते त्यांच्या चित्रपटांची गाणी लिहीत होती. त्यामुळे साहजिकच त्यांची गाणी त्या काळात खूप गाजत होती.

‘रोते हुए आते है सब हसता हुआ जो जायेगा’,’ खैके पान बनारस वाला’, ‘इंतहा हो गई इंतजार की’, ‘दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या ‘,’कबके बिछडे हुए आज हम आके मिले’ हि आणि अशी अतिशय लोकप्रिय गाणी यांच्या लेखणीतून उतरलेली होती. पण गीतकार म्हणून त्यांना तितका सन्मान मिळाला नाही ज्याचे खरं तर ते हकदार होते. त्यांना तेवढे Recognition मिळाले नाही.

अंजान यांना ‘आपल्याला एकदा तरी फिल्मफेअर पुरस्कार मिळावा’ असं कायम वाटायचं आणि तसं ते काही गैर पण नव्हतं. कारण त्यांनी लोकप्रिय चित्रपटातील गाणी जरी लिहिलेली असली तरी त्यातील दर्जा हा अतिशय उत्तम होता. त्यामुळे त्यांची पुरस्काराची अपेक्षा असणं साहजिक होतं पण त्यांना आयुष्यभर पुरस्कारापासून वंचित राहावं लागलं. अंजान यांचे  खरं नाव लालजी पांडे! बनारस ला त्यांचा जन्म झाला.बनारस  मधील अनेक कवी समेलानातून,मुशायाऱ्या मधून त्यांच्या काव्य प्रतिभेची झलक दिसत होती. काव्य लेखनासाठी त्यांनी ‘अंजान’ हे नाव घेतले होते.

पदवी मिळाल्यानंतर साहजिकच घरच्यांचा आग्रह सरकारी नोकरीचा होता पण यांना साहित्य संगीताची रुची होती. त्यामुळे त्यांनी गीतकार होण्याचे ठरवले आणि त्यांनी मुंबईकडे कूच केले.१९५३ साली प्रेमनाथ यांच्या ‘गोलकोंडा का कैदी’ या चित्रपटापासून त्यांची रुपेरी कारकीर्द सुरू झाली. दुर्दैवाने हा सिनेमा फ्लॉप झाला. पुढची  दहा-बारा वर्षे संघर्षातच केली. त्यांना खरा ब्रेक मिळाला गुरुदत्त यांच्या ‘बहारे फिर भी आयेगी’ या चित्रपटापासून. या चित्रपटातील ‘आपके हसीन रुख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर…’ हे रफी ने गायलेले गाणे प्रचंड गाजले.

मुंशी प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ या कादंबरीवर चित्रपटात त्यांनी पूरबी शैलीतील गाणी लिहिली आणि ती समीक्षकांना खूप आवडली. हा चित्रपट फारसा चालला  नाही पण यातील गीत संगीताचे  कौतुक झाले. या चित्रपटात ‘पिपरा के पतवा’,’ हिया जरत राहत दिन रैन’ ही गाणी खूप गाजली. अवधी,पूरबी आणि भोजपुरी या भाषांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. उत्तरेकडील लोकसंगीताचा  त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी त्या शैलीची गाणी लिहायचा प्रयत्न केला.

जी पी सिप्पी यांच्या ‘बंधन’ या चित्रपटातील ‘बिना बदरा के बिजुरिया कैसे बरसे’ हे गाणं त्याकाळी अफाट लोकप्रिय झाले. संगीतकार कल्याणजी यांच्यासोबत त्यांची चांगली जोडी जमली. या जोडीने पुढे सत्तरच्या दशकामध्ये अनेक चित्रपट दिले. लावारिस, खून पसीना , डॉन,  गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले आणि त्यासोबत अंजान यांची गाणी देखील लोकप्रिय ठरली. अमिताभ बच्चन यांचे इतर संगीतकारांनी स्वरबद्ध केलेले याराना, नामक हलाल, शराबी या चित्रपटातील गाणी देखील अंजान यांनी लिहिली होती.त्यांच्या ‘खैके पान बनारस वाला…’ या गाण्याला  लोकप्रियता मिळाली परंतु अंजान यांना कुठलाही महत्त्वाचा पुरस्कार कधीच मिळाला नाही. पाच वेळा त्यांना फिल्म फेयर चे नामांकन  मिळाले. पण पुरस्कार मात्र  एकही नाही.

याचे शल्य त्यांच्या उरी कायम चालत होतं पण १९९१  साली त्यांचा मुलगा समीर याने गाणी लिहिलेल्या ‘आशिकी’ या चित्रपटाने प्रचंड मोठे यश मिळवले. आणि समीर यांच्या पहिल्याच चित्रपटातील गाण्यासाठी समीर यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. समीर यांना पुरस्कार मिळालेला पाहून अंजान यांना खूप आनंद झाला. ‘मला नाही तर माझ्या मुलाला’ ही कृतज्ञते ची भावना त्यांच्या मनात दाटून आली. पुरस्कार वितरण सोहळ्याला ज्या वेळी समीर याचे नाव पुकारले गेले त्यावेळी समीर यांनी स्टेजवर गेल्यानंतर प्रेक्षकात बसलेल्या आपल्या वडिलांना गीतकार अंजान यांना स्टेजवर बोलावले. अंजान यांचे डोळे भरून वाहू लागले. ते स्टेजवर गेले. समीर यांनी सन्मानपूर्वक त्यांना मिळालेला पहिला पुरस्कार वडिलांच्या स्वाधीन केला आणि वडिलांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली. त्यावेळी अंजान गद्गदलेल्या स्वरात  म्हणाले,”

गेल्या ४० वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे पण या काळ्या  बाहुली ने मला कायम चकवले!  पण आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. माझ्या मुलाला त्याच्या पहिल्याच प्रयत्नात हा पुरस्कार मिळतो आहे. एक बाप म्हणून मला फार आनंद झाला आहे. गीतकार समीर याची पहिली इनिंगची सुरुवात नाही तर  अंजान यांच्या  दुसऱ्या इनिंग ची सुरुवात आहे.” आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या मुलाच्या कला कर्तृवाचा  आलेख वर गेलेला त्यांनी पाहिला आणि आपल्याला जे मिळाले नाही ते मुलाने कमी वेळात प्राप्त केले याचा आनंद झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.