भावना दुखावल्यात पण आकडेवारी सांगते राज्यपालांच्या वक्तव्यात “खरच दम” आहे..

“कधीकधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो की, मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. पण मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर मुंबईत पैसाच शिल्लकच राहणार नाही. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच हे वक्तव्य.

मराठी माणूस म्हणून राज्यपालांच्या या वक्तव्याचा राग आला असेल. वाईट वाटलं असेल. पण या वक्तव्यात खरच दम आहे का? तर दुर्देवाने हो.. 

मुंबई आमचीच अस कितीही मराठी माणूस म्हणाला तरी मुंबईच्या आर्थिक आणि सोबतच राजकीय नाड्या देखील गुजराती, मारवाडी, युपी, बिहारी समुदायाच्या हातात गेलेल्या आहेत हेच आकडेवारीवरून स्पष्ट होतं.. 

“मराठी माणूस” म्हणून भावनिकता बाजूला ठेवून आकडेवारी पाहूया, विषय समजून घेवूया.

सर्वात पहिलं बघूया, मुंबईत गुजराती किती महत्वाचे आहेत.

मागेच उद्धव ठाकरेंनी केलेलं एक स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. मुंबई समाचार या वृत्तपत्राला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर उपस्थित होते. 

यावेळेस उद्धव ठाकरे म्हणालेले कि, “मुंबईत मराठी व गुजराती हे दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत.”. 

उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमागचं कारण सांगण्यात आलं येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूका.मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ जागा आहेत. यापैकी ५५ प्रभागांमध्ये गुजराती मतदारांचा थेट प्रभाव आहे. 

कोणत्याही पक्षाला मुंबई ताब्यात हवीय तर गुजराती मतदारांना डावलून चालणार नाही. 

कारण मुंबईत जवळपास ३० लाख गुजराती मतदार असल्याचं सांगण्यात येतं. अगदी आकडेवारीच्या भाषेत सांगायचं तर फ्री प्रेस जर्नल च्या एका बातमीनुसार, देशातलं पाचव्या नंबरचं गुजराती भाषिक लोकांच शहर हे मुंबई आहे. म्हणजेच अहमदाबाद, सुरत अशा शहरांसोबत मुंबईच्या गुजराती भाषिक लोकांची स्पर्धा करताना मुंबई पाचव्या क्रमांकावर येतं. 

पण ही गोष्ट फक्त लोकसंख्येपुरती मर्यादित आहे का तर नाही, 

मुंबईत गुजराती व्यापारी वर्ग बराच मोठा आहे. शहरातील धान्य, कापड, कागद आणि धातूच्या व्यापारात गुजरातींचे वर्चस्व आहे. शहरातील ९० टक्के हिरे व्यापारी हे गुजराती समाजाचे आहेत.  आणि या व्यापारी वर्गाला दुखावणं कोणत्याची पक्षाला परवडणारं नाही. संपूर्ण शेअर मार्केट गुजराती समाजातील लोकांच्या हातातच आहे.

बरं हे झालं अर्थव्यवस्थेचं, राजकारणाचं देखील बोलूया. 

२२७ नगरसेवक असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत २४ नगरसेवक हे गुजराती भाषिक आहेत. अस इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत सांगण्यात आलं आहे. 

अगदी मराठी पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या आकडेवारी बद्दल बोलायचं तर २०१७ साली मिरा भाईंदर महानगरपालिकांसाठी शिवसेनेमार्फत ९५ जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली होती. यापैकी ३८ जागेंवर गैरमराठी लोकांना तिकीट देण्यात आलं होतं तर १० जागांवर गुजराती भाषिकांना तिकीट देण्यात आलं होतं. 

इथे शिवसेना पक्षाचीच आकडेवारी का सांगण्याचा उद्देश इतकाच की शिवसेना मराठी माणसांसाठी राजकारण करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो पण त्यांनाही गुजराती भाषिकांना टाळून राजकारण करणं अशक्य आहे हेच आकडेवारीवरून सिद्ध होतं.. 

आता बघुयात राजस्थानी, मारवाडी समुदाय का महत्वाचे ठरतायत? 

मुंबईतील लोकसभेच्या एकूण जागांचं बोलायचं तर एकूण ९४.५८ लाख मतदारांपैकी १७ लाख मतदार गुजराती, राजस्थानी आणि जैन समाजाचे असल्याचं कळतं. त्यात राजस्थानी लोकांची भूमिका जास्त महत्वाची आहे. 

अगोदर आपण गुजराती लोकांबद्दल बोललो, गुजराती मुंबईत लोकसंख्येने जास्त आहेत मात्र राजस्थानी, मारवाडी लोकांचं तसं नाही. 

राजस्थानी लोकसंख्येने नाही तर धनशक्तीने जास्त आहेत. 

मुंबईतील मारवाडी लोकं हे प्रामुख्याने राजस्थान आणि राजस्थानमधील मारवाडमधून आलेले आहेत.  मारवाडी समाज हा दागिन्यांच्या व्यापारापासून ते किराणा दुकान चालवण्यापर्यंतचा व्यवसाय करण्यात कुशल असून या समाजाचे बरेच लोकं मुंबईत विखुरलेले आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत मारवाडी लोकसंख्या २.५७ टक्के इतकी आहे. 

यामध्ये राजस्थानचे मारवाडी, गुजराती आणि जैन मारवाडींचा समावेश आहे. बोरिवली, मीरा रोड, दहिसर, कांदिवली आणि मालाड यांसारख्या मुंबईच्या उत्तर उपनगरात तुम्हाला असे मारवाडी समाजाचे लोक मोठ्या संख्येने दिसून येतात. 

गुजरात, राजस्थान, बिहार, युपी अशा उत्तर-मध्य भारतातल्या अशा संपूर्ण आकडेवारीबद्दल बोलायचं तर या भागातले मतदार २७ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतं. 

महापालिकेच्या २२७ जागांपैकी १८४ जागांमध्ये ५ टक्के ते ६७ टक्के पर्यन्तची आकडेवारी ही उत्तर भारतीय लोकांची आहे. तर ६३ प्रभांगामधला उमेदवार हे थेट उत्तर भारतीय ज्यामध्ये गुजराती, मारवाडी, राजस्थानी, यूपी, बिहारी समुदाय येतो. 

इंडियन एक्सप्रेसच्या आकडेवारी पाहिली तर, 

२०१७ च्या २२७ सदस्यसंख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ७२ बिगरमराठी नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी २४ गुजराती, १४ उत्तर भारतीय, ५ दक्षिण भारतीय होते.

थोडक्यात आर्थिक व राजकीय या मुंबईच्या दोन्ही नाड्यांवर गुजराती, मारवाडी लोकांचा प्रभाव आहे हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही. बाकी वाद होतील, चर्चा होतील, राजकारण होईल पण आकडेवारी कशी लपवणार हा खरा प्रश्न आहे.

हे ही वाच भिडू :

 

1 Comment
  1. Mahesh Sandhan says

    नमस्कार ., हि सारी आकडेवारी खरी असली तरी मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आहे . राहणारच . गुजराती , राजस्थानी , मारवाडी , सिंधी व जैन हि मंडळी ईंग्रजांप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रात आणि मुंबईत पोट भरण्यासाठी च आलेली . स्वाभाविक विचार करता त्यांनी त्यांच्या फायद्याकरीता महाराष्ट्रात राजकारणात ईंग्रजांप्रमाणे शिरकाव केला हि गोष्ट मराठी जनतेला समजली कशी नाही की जाणूनबुजून अज्ञान ठेवण्याचा प्रयत्न काही शक्तींनी केला आहे . महाराष्ट्र राज्य व मुंबई चा विचार करता स्थानिक पातळीवर जनतेने निसर्गाच्या सानिध्यात अनेक व्यवसाय सुरू केले होते . आजही करतात . मुळचे बारा बलुतेदार ही संकल्पना महाराष्ट्रात ईंग्रज किंवा ईतर व्यावसायिक कंपन्या येण्याआधीची होती . सर्व एका वेळी लिहिणे शक्य नाही ., परंतु मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्रातील जनतेने याचा विचार करून प्रत्यक्ष कृती करावी . सन्मानिय बाळासाहेब ठाकरे असोत की त्यांच्या आधीचे थोर समाज सुधारक असोत , या सर्वांनी मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी हौतात्म्य पत्करले आहे . हेही विसरून चालणार नाही . बाकी पुन्हा चर्चा सुरू राहिलच . भैय्याला दिली ओसरी भैय्या पाय पसरी ही गोष्ट महाराष्ट्रात साहजीकच मुंबई त घडत आहे . सावध व्हा . अन्यथा ईंग्रजांनी गुलाम म्हणून राबविले आणि आता गुजराती , राजस्थानी , मारवाडी यांचे गुलाम होऊ नका . सावध व्हा . मुंबई सह महाराष्ट्र वाचवा . बाराबलुतेदारांता अभ्यास करून ऊद्योग व्यवसाय सुरु करा . जय महाराष्ट्र . जय हिंद .

Leave A Reply

Your email address will not be published.