खर्गेंचा विजय फिक्स होता तरी निवडणुका घेऊन गांधी घराण्याने या गोष्टी साध्य केल्यात

मल्लिकार्जुन खर्गे अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यात पाहिली महत्वाची  गोष्ट म्हणजे ते निवडणुकीच्या माध्यमातून ‘निवडून’ आले आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख असणाऱ्या भारतात पक्षाचा अध्यक्ष मात्र फार दुर्मिळपणे निवडून जातो. अशावेळी काँग्रेसने पक्षांतर्गत निवडणूक घेण्याच्या दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहेत. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे हे शशी थरूर यांच्यावर अपेक्षितपणे मात करतील अशी शक्यता निर्माण झाली होती आणि झालंही तसंच.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच गांधी घराण्याचे निष्ठावान अशोक गेहलोत यांना उमदेवार म्हणून उभं करण्यास काँग्रेस हायकमांड उत्सुक होतं मात्र त्यांनी उमदेवार स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांना उमेदवारी देण्यात आली.

काँग्रेसला नॉन-गांधी उमदेवार मिळणार हे फिक्स होतं त्याचवेळी या निवडणुकीत गांधी घराणं न्यूट्रल राहील असं अनेकदा काँग्रेसकडून सांगण्यात येत होतं. मात्र त्याचवेळी गांधी घराण्याशी निष्ठावान असलेले मल्लिकार्जुन खर्गे हेच काँग्रेसचे उमेदवार असतील हाच मेसेज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला.

त्यामुळे शशी थरूर यांना सपोर्ट करण्यास एकही मोठा काँग्रेस नेता पुढे आला नाही.

अगदी G-२३ मधले नेते जे सुरवातीला गांधी घराण्यातील अध्यक्ष नको अशा भूमिकेचे होते त्यांनी देखील शशी थरूर यांच्या बाजूने उघडपणे बोलले नाहीत. त्यामुळे अखेर शशी थरूर काँग्रेसाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मागे पडले आणि गांधी घराण्याशी सदैव निष्ठावान राहणाऱ्या  मल्लिकार्जुन खर्गे यांचाच विजय झाला. निवडणुकीत विजय झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना खर्गे यांनी आपल्याला गांधी घराण्याचं मार्गदर्शन घेण्यास कुठलाच संकोच नसल्याचं म्हटलं आहे.

मात्र या निवडणुका घेऊन गांधी घराणं फायद्यातच राहिलं. याच पाहिलं कारण म्हणजे

घराणेशाही, गांधी घराण्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी या काँग्रेसवरील आरोपांची हवा निघाली 

काँग्रेसने भाजप सत्तेत आल्यानंतर आरोप झाले की भाजपकडून काँग्रेसच्या घराणेशाहीवर बोट ठेवलं जात होतं. काँग्रेसचं अध्यक्षपदचं घराणेशाहीनं आलं असल्याने काँग्रेसमध्ये पार खालपर्यंत घराणेशाही असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जायचा.

1992 ते 1998 जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव आणि सीताराम केसरी काँग्रेसाध्यक्ष होते हा  कालावधी वगळता 1978 पासून पक्षाचे अध्यक्षपद गांधी कुटुंबातील  सदस्याकडे आहे. खरं तर काँग्रेसच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी 1939, 1950, 1977, 1977, 2000 आणि 2022 अशा फक्त 6 निवडणुका झाल्या आहेत .

पण आता २४ वर्षांनंतर मल्लिकार्जुन खरगे कुटुंबाबाहेर अध्यक्ष बनले आहेत. काँग्रेसचा नॉन-गांधी अध्यक्ष झाला आहे आणि तो ही निवडणूक होऊन त्यामुळे विरोधकांच्या आता काँग्रेसच्या घराणेशाहीच्या, काँग्रेस गांधी घराण्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याच्या आरोपाला तितकंसं वजन राहणार नाही.

मोदी सरकार लोकशाहीच्या विरोधात जाऊन हुकूमशहा असल्यासारखं वागत आहे असा जो आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता त्याला अजूनच धार मिळेल. 

नरेंद्र मोदी सरकार लोकशाही विरोधी आहे, मोदींच्या काळात लोकशाहीची हत्या होत आहे अशा टीका सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अनेकदा केली आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेसला त्यांच्या पक्षातल्या लोकशाहीविरोधात प्रश्न विचारले जात होते. जेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंच सत्तेत असलेली भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने देश चालवत आहेत असा आरोप होत होता तेव्हा काँग्रेसही पूर्णपणे गांधी घराण्याच्या असल्याचा प्रतिआरोप काँग्रेसला झेलावा लागत होता.

आता मात्र पक्षांतर्गत निवडणूक घेतल्यानंतर गांधी घराण्याला मात्र भाजपवर लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करणं दुटप्पीपणाचं होणार नाही. त्याचबरोबर मोदी सरकारच्या माध्यमातून लोकशाहीवर संकट आल्याचा मुद्दा निवडणुकीत देखील वापरता येइल.

अजुन एक म्हणजे डावे पक्ष त्यांचा नेता निवडण्यासाठी दर तीन वर्षांनी नियमितपणे पक्षाच्या बैठका घेतात हा अपवाद सोडला तर  इतर पक्ष अशा लोकशाही पद्धतीने निवडणुका घेत नाहीत. आता काँग्रेस पक्षाने अध्यक्ष निवडीसाठी अवलंबलेल्या प्रक्रियेमुळे इतर पक्षांवरही अशाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका घेण्यासाठी दबाव येईल. त्यामुळे स्थापनेपासून ९ वेळा आपला अध्यक्ष बिनविरोधपणे बसवणाऱ्या भाजपवर देखील निवडणुकीसाठी दबाव आणला जाऊ शकतोय.

अजून एक म्हणजे काँग्रेसला अजूनही गांधी घरण्याशिवाय पर्याय नसल्याचं सिद्ध झालं.

निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधूनच गांधी घराण्याच्या नेतृत्वाला आव्हान दिलं जात होतं. G-२३च्या माध्यमातून  उघड-उघडपणे गांधी घराण्याच्या बाहेरून पक्षाचा अध्यक्ष करावा अशी मागणी होत होती. मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी याविरोधात शांतपणे आपला गेम खेळला.

त्यांनी आपला उमेदवार निवडणुकीत उभा केला आणि त्याला निवडूनही आणला. मल्लिकार्जुन खर्गे यांना ७००० मत मिळाली तर शशी थरूर याना केवळ १००० मतांवर समाधान मानावं लागलं. मुख्य म्हणजे कार्ती चिदंबरम यांच्यासारखे काही अपवाद सोडले तर एकही मोठा नेता थरूर यांच्या बाजूने पुढं आला नाही. त्याचवेळी गांधी घराण्याने अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी शेवटपर्यंत होत राहिली. काहींनी तर मतपत्रिकेवर राहुल गांधी असं लिहलं. त्यामुळे थोडक्यात काँग्रेसवर अजूनही आपलाच वरचष्मा असल्याचं गांधी घराण्याने सिद्ध केलं.

सर्वात महत्वाचं म्हणजे २०२४ मध्ये मोदींच्या विरोधात काँग्रेसकडून राहुल गांधीच असतील हे जवळपास फिक्स झालंय.

या निवडणुकीत जर गांधी घरण्याचा उमेदवार पडला असता तर त्याचा अर्थ काँग्रेसवर गांधींची पकड नाही हे सिद्ध झालं असतं. समजा शशी थरूर जिंकले असते तर त्यांनी २०२४ साठी स्वतःचीच पंतप्रधानपदासाठी दावेदारी दिली असती. आता मात्र तसं नसणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गे हे पंतप्रधान पदाचे दावेदार असतील का याबाबत साशंकता आहे. याचवेळी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी पुन्हा एकधब आपलं नेतृत्व सिद्ध करत आहेत आणि त्याना प्रतिसादही चांगला आहे. जवळपास १५० दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी २०२४ ची तयारी करत आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे खर्गेंच्या विजयाने त्यांची देवदार अजूनच मजबूत झाली आहे.

त्यातच पक्षांतर्गत निवडणूक होऊन देखील पक्षात कोणतीही फूट पडली नाही की टोकाचे आरोप झाले. त्यामुळे एकंदरतीच निवडणुकीचा डाव गांधी घराण्याच्या बाजूनेच गेल्याचं सिद्ध होत आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.