‘लिरील गर्ल’, ‘हमारा बजाज’ आणि ‘फेअर अँड हँडसम’ देणारा जाहिरात क्षेत्रातला ‘बाप माणूस’ !

जाहिरातीला पासष्टावी कला म्हटलं जातं, तसं ते का म्हटलं जातं, हे सिद्ध करणारं चाललं-बोलतं उदाहरण म्हणजे ॲलेक पदमसी होते.

जाहिरात विश्वाच्या पलीकडे इंग्रजीतील एक अतिशय महत्वाचे नाटककार, निर्माते म्हणून देखील त्यांच्या नावाचा बोलबाला होता. इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी अनेक प्रयोग केले आणि त्यातून रंगभूमीला अनेक कलाकार देखील दिले. त्यांनी गिरीश कर्नाड यांचं ‘तुघलक’ हे नाटक इंग्रजीत आणल्यानंतरच त्यातून कबीर बेदी सारखा कलाकार मिळाला.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या रिचर्ड ॲटेनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटात त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहोम्मद अली जिन्ना यांची भूमिका केली होती. या भूमिकेची देखील जोरदार चर्चा झाली होती. ही भूमिका साकारण्यासाठी त्यांनी अक्षरशः जीव ओतला होता आणि जीनांची भूमिका तितक्याच ताकदीने पडद्यावर जिवंत केली होती.

पदमसी हे मूळ नाव नाही, तो सन्मान ! 

१९२८ साली गुजरातमधील कच्छ भागात  त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबाचं मूळ नाव ‘चरण्य’ असं होतं. त्यांचे आजोबा भावनगर जिल्ह्यातील ‘वाघनगर’ या गावचे सरपंच होते. त्यांनी दुष्काळाच्या काळात आपलं संपूर्ण धान्याचं कोठार गावकऱ्यांसाठी खुलं केल्याने गावकऱ्यांनीच त्यांना ‘पदमसी’ हा सन्मान बहाल केला होता. जो ‘पद्मश्री’ या शब्दाचा अपभ्रंश होता. विशेष म्हणजे पुढे चालून २००० साली पदमसी यांना खरोखरच ‘पद्मश्री’ या सन्मानाने गौरविण्यात आलं.

पदमसी यांच्या घरची परिस्थिती तर उत्तम होती पण घरात शिक्षणाचा अभाव होता. त्यामुळे त्यांच्या आईने आपल्या सातही मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिलं आणि शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला पाठवलं. शिक्षण पूर्ण करून भारतात परतलेले पदमसी जेव्हा भारतात परतले तेव्हा मात्र आपल्या एका मैत्रिणीशी लग्न करण्यावरून त्यांचं त्यांच्या आईशीच बिनसलं.

झालं असं की ॲलेक यांना आपली कॉलेज जीवनातील मैत्रीण पर्ल हिच्याशी लग्न करायचं होतं. परंतु पर्ल यांचं आधीचं लग्न झालेलं होतं आणि आधीच्या नवऱ्यापासून मुलं देखील होती. साहजिकच त्यांच्या आईला त्यांचा हा निर्णय रुचणारा नव्हता. त्यामुळे आईने त्यांच्यासमोर एक तर ‘पर्ल’ किंवा आपण असा टोकाचा पर्याय ठेवला आणि ॲलेक यांना आपलं घर सोडावं लागलं.

 ‘फेअर अँड हँड्सम’च्या जन्मामागचा किस्सा 

घर सोडल्यानंतर ॲलेक ‘लिंटास’ या जाहिरात संस्थेत काम करायला लागले. पदमसी यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतरच ‘लिंटास’ने  जाहिरात क्षेत्रात आपलं वर्चस्व स्थापन केलं आणि पुढे कित्येक वर्षे भारतातली पहिल्या क्रमांकाची जाहिरात संस्था म्हणून गणली गेली.

वाहत्या झऱ्यात आंघोळ करणारी ‘लिरील गर्ल’ असेल किंवा सर्फ एक्सलच्या जाहिरातीतील ‘ललिता जी’चं कॅरेक्टर असेल या पात्रांनी कित्येक वर्षे भारतीय लोकांच्या मनावर मोहिनी घातली. हे कॅरेक्टर पदमसी यांच्याच डोक्याची उपज होती. जाहिरात क्षेत्रात जवळपास शंभराहून अधिक ब्रँडना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं श्रेय निर्विवादपणे त्यांचंच.

adds

‘फेअर अँड हँड्सम’ हे प्रोडक्ट बाजारात आणण्यापूर्वी त्यांनी काय रणनीती आखली होती, याचा एक किस्सा पदमसी यांनी हयात असताना माध्यमांशी बोलताना सांगितला होता. ‘फेअर अँड लव्हली’ त्यावेळी महिलांच्या सौंदर्य प्रसाधानांमध्ये आघाडीचं स्थान मिळवून होती. अशा वेळी पुरुषांसाठी अशीच क्रीम घेऊन येणं कंपनीला धोक्याचं वाटत होतं.

पदमसी यांनी त्यावेळी ‘इमामी’ ब्रँडला एक प्रयोग करायला सांगितला. या प्रयोगानुसार ऑफिसमध्ये लोक ये जा करतात अशा ठिकाणी एक आरसा ठेवण्यात आला आणि पुढचे ७ दिवस त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं. शेवटी असं लक्षात आलं की या ७ दिवसांच्या काळात आरशासमोर उभं राहून स्वतःला न्याहाळणाऱ्या पुरुषांची टक्केवारी महिलांपेक्षा कितीतरी अधिक होती.

या निष्कर्षातून ‘इमामी’ला पदमसी यांची कल्पना आवडली आणि ‘फेअर अँड हँड्सम’चा जन्म झाला.

भारतीय जाहिरात क्षेत्राला असणाऱ्या त्यांच्या योगदानाची कल्पना आपल्याला यावरून करता येईल की जाहिरात क्षेत्रातील ऑस्कर समजल्या जाणाऱ्या ‘क्लिओ हॉल ऑफ द फेम’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे ते पहिले भारतीय मानकरी ठरले होते. ‘पद्मश्रीसह भारत सरकारच्याच संगीत नाटक अकादमीकडून दिला जाणारा टागोर रत्न पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.