जवळपास प्रत्येक गाडीवर अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिराचं स्टिकर असतं, असा आहे इतिहास

नवग्रह हनुमान मंदिर, नवग्रह मंदिर, शनि मारुती मंदिर किंवा निव्वळ शनि मंदिर ही सगळी मंदिरं आपल्याला माहित आहेत. श्रद्धा असलेले भाविक शनिवारी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेल वाहतात.

हे नवग्रह ऐरवी फारसे कुणाला आठवत नाहीत. पण मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून, मुलामुलीच्या पत्रिका गुरुजीला दाखवल्या जातात. तेव्हा चुकून मुलीच्या पत्रिकेत मंगळ असला की वरपक्षाकडून अनेकदा लग्नाला नकार दिला जातो. 

पण काही मंडळी मात्र वेगवेगळ्या पूजा करून मंगळाला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. 

यासाठी लोकं पहिली धाव घेतात ते अमळनेरच्या मंगलदेव मंदिरात, जरा बारकाईने पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक गाडीवर अमळनेरच्या मंगळदेव मंदिराचं स्टिकर लावलेले दिसतात. निव्वळ जळगावच नाही तर खानदेश आणि महाराष्ट्रातल्या वेगवगेळ्या भागातून सुद्धा अनेक लोक या मंदिरात पूजेसाठी येतात. 

वधू असो की वर कोणाच्याही पत्रिकेत मंगळ असेल, मुला मुलींचे लग्न जुळत नसेल तर अमळनेरच्या मंगळ मंदिरात पूजा ठरलेलीच. 

दर मंगळवारी तर या मंदिरात जणू जत्राच भरते. मंगळाच्या पूजेबरोबरच वेगवगेळ्या विधी केल्या जातात. मंदिर देवस्थानाकडून फक्त १५ रुपयांमध्ये मसुरची मसालेदार डाळ, भात, पुरी आणि गुळाच्या शिऱ्याचा महाप्रसाद वाटला जातो. एकंदरीत सगळं वातावरण मंगलमयच होतं असे भाविक सांगतात.

पण आज जरी हे मंदिर इतकं भव्य आणि गर्दीने भरलेलं असलं तरी पूर्वी या मंदिरात एवढी गर्दी नसायची.

पूर्वी फार फार तर अंमळनेर आणि आसपासच्या भागातले लोक या मंदिरात दर्शनाला येत होते. कारण या मंदिराबाबत फारशी माहितीच कोणाला नव्हती. हे मंदिर सुद्धा कोणी आणि केव्हा स्थापन केलं याबद्दलची माहिती सुद्धा मंदिर प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

अमळनेरचे दगडूशेठ सराफ यांनी १९३३ सालात या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. १९४० पर्यंत ते हयात होते आणि तेच या मंदिराची व्यवस्था बघायचे. मात्र जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा हे मंदिर पुन्हा ओसाड झालं असं जाणकार सांगतात. 

पण काही वर्षानंतर १२ वर्ष एका पायावर तपस्या करणारे जगदीश नाथजी महाराज या मंदिरात आले. त्यांच्यामुळे पुन्हा एकदा या मंदिराला चांगले दिवस आले. मंदिरात पूजा अर्चना व्हायला लागली, व्यवस्था सुद्धा लागली मात्र परत काही वर्ष या मंदिरात राहिल्यानंतर जगदीशजी महाराज हे मंदिर सोडून निघून गेले. महाराजांच्या पाठीमागे या मंदिराची सुद्धा दुरावस्था झाली. 

मंदिरात पूजा अर्चना बंद झाली आणि गुन्हेगार, असामाजिक कामं करणाऱ्या लोकांनी या मंदिरात आपलं बस्तान बसवलं.  

या मंदिरात सगळीकडे कचरा साचला होता. या घाणेरड्या जागेकडे अनेकांचं लक्ष जात नसल्यामुळे गुन्हेगार या मंदिरामध्ये लपत होते. त्यामुळे एकेकाळी प्रसिद्ध असलेलं हे मंदिर कुप्रसिद्ध झालं. पण १९९९ मध्ये काही लोकांनी मिळून या मंदिराला पुन्हा सुरु करण्याला सुरुवात केली. मंदिराचं विश्वस्थ मंडळ स्थापन झालं. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराची व्यवस्था लावण्यात आली आणि परत एकदा पूजा रचनेला सुरुवात झाली.

हळूहळू अमळनेरमध्ये प्रसिद्ध होत असतांना २००७ सालात एक अफवा उसळली आणि या मंदिराचं नाव सगळीकडे पसरलं.

२००७ साली ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह होणार होता. सगळं काही ठीक होतं पण ऐश्वर्याच्या पत्रिकेत मंगळ आढळला अन् बच्चन कुटुंब वेगवगेळ्या देवतांच्या मंदिरात दर्शनाला जायला लागले. सिद्धिविनायक असो की साईबाबा असोत सगळ्या देवतांना बच्चन कुटुंबाने साकडे घातले.

सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेताना ऐश्वर्या राय मंगलदेवाच्या दर्शनासाठी अमळनेरच्या मंगळ मंदिरात येणार असल्याची अफवा उसळली. एवढी मोठी सेलेब्रिटी मंगळ ग्रहाच्या दोषातून मुक्त होण्यासाठी मंगळाच्या मंदिरात पूजा करणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अखेर ऐश्वर्या काही आली नाही पण मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी मात्र वाढायला लागली. 

पत्रिकेत मंगळ असणारे, लग्न न जुळणारे मुलं मुली या मंदिरात येऊन दर्शन घ्यायला लागले.

हळूहळू या मंदिरात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन अमळनेरच्या तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांनी २०१३ साली या मंदिराला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करायला सुरुवात केली. पैलाड ते मंदिरापर्यंत रस्त्याचं रुंदीकरण, कुंपण, वृक्ष लागवड करण्यात आली. हळूहळू हे मंदिर जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध व्हायला लागले. 

मंदिर समिती आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून तुळस बागेची निर्मिती करण्यात आली. संस्थेच्या वतीने पाणी आडवा पाणी जिरवा, सामाजिक कामं, स्वच्छता मोहीम, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप यासारखे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

मंगळाच्या मंदिरासोबतच भूमाता आणि हनुमानाच्या मुर्त्या सुद्धा या मंदिरात स्थापन केलेल्या आहे. पण मंगळाचे स्वतंत्र मंदिर उज्जैन आणि अमळनेर वगळता भारतात कुठेच आढळून येत नाही असं सांगितलं जातं. 

आख्यायिकेनुसार अमळनेरपासून २५० किमी अंतरावर असलेल्या उज्जैनमध्ये मंगळ ग्रहाचा जन्म झाला होता.

स्कंदपुराणातील अवंतिका खंडामध्ये मंगल ग्रहाची निर्मिती कशी झाली याचं वर्णन करण्यात आलंय. आख्यायिकेनुसार, अवंतिका नगरीत अंधक नावाचा राक्षस राज्य करत होता. त्याला कनक नावाचा मुलगा होता. एकदा कनकाने इंद्राला युद्धासाठी ललकारलं होतं. तेव्हा इंद्राने सुद्धा कनकाचा प्रस्ताव मान्य केला आणि त्याच्याबरोबर युद्ध केला आणि या युद्धात इंद्राने कनकाचा वध केला. 

मुलाच्या वधामुळे रागावलेल्या अंधकासुराने इंद्रावर हल्ला केला तेव्हा इंद्राने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी महादेवाकडे याचना केली. महादेवाने इंद्राची प्रार्थना मान्य केली आणि अंधकासुराबरोबर युद्ध करण्याला सुरुवात केली. हे युद्ध सुरु असतांना महादेवाला घाम फुटला, महादेवाच्या घामाचा एक थेंब उज्जैनच्या जमिनीवर पडला. महादेवाच्या घामाच्या उष्णतेमुळे उजैनची जमीन दोन भागात विभागली गेली. 

या थेंबामधूनच मंगल ग्रहाचा जन्म झाला. जन्म झालेल्या मंगळावर महादेव आणि अंधकासुराचं रक्त सांडलं आणि मंगल ग्रह लाल झाला. 

तेव्हापासून मंगल ग्रहाची अतिशय कोपिष्ट देवता म्हणून पूजा केली जाते. मंगल ग्रह पत्रिकेत असला की मंगळाला शांत करण्यासाठी धार्मिक विधी केल्या जातात. त्यानंतरच लग्नासारखे समारंभ पार पडले जातात.

आता आख्यायिका आणि मंगळाचं मंदिराचा इतिहास काहीही असला तरी ऐश्वर्या राय येणार असल्याच्या एका अफवेनं या मंदिराचं नाव प्रसिद्ध झालं आणि आज जळगावच्या निम्म्याहून अधिक गाड्यांवर या मंगल मंदिराचे स्टिकर लावलेले असतात.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.