डॉनच्या दहशतीमुळे सेनेला आपल्या बालेकिल्ल्यात बॅनरसुद्धा लावता आले नव्हते…..

१९७० पर्यंत मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात मराठी गुंडांचा बोलबाला झाला नव्हता. हा आपला एरिया, आपली सत्ता अशा गोष्टीत मराठी मुलं तेव्हा पडत नव्हती. हुसेन झैदींनी मराठी मुलं कशी या फ़ंदात पडली याबद्दलसुद्धा लिहून ठेवलंय. सुरवातीला भुरट्या चोऱ्या करणारी गोल्डन गॅंग अस्तित्वात आली. यात भायखळा, परळ, दादर आणि चिंचपोकळी भागातली मुलं या टोळ्यांमध्ये होती. मराठी घरांमधली, फारसं न शिकलेली अशी ती मुलं होती. अमर नाईकसुद्धा अशाच मुलांमधला एक होता.

अमर नाईकने पुढे छोट्यामोठ्या गुन्ह्यांमधून नाईक टोळी तयार केली. प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या मटक्याच्या अड्ड्यांवर गनिमी काव्याने हल्ले करून त्यांना कमजोर करणे हा नाईक टोळीचा हातखंडा होता. हल्ला झाल्यावर ते टॅक्सीतून पळून जात असत आणि टॅक्सीच्या नंबरवर काळं कापड टाकून दक्षता सुद्धा घेत असे. नाईट टोळीने मटक्याच्या अड्ड्यांवर आपली जबरी दहशत बसवली होती. 

मटका अड्ड्यांवर हल्ला करताना ते हातात तलवारी घेऊन जात असत. नुसत्या तलवारी बघूनच अड्डा चालवणारे घाबरून जात असे आणि सगळा गल्ला हा गुंडांच्या ताब्यात देत असे. पिस्तूल, तलवारी, हॉकी स्टिक्स यांच्या जोरावर हि गॅंग मुंबईच्या काही भागांमध्ये धुमाकूळ घालत होती. अमर नाईक हा मुंबईचा पाब्लो म्हणून ओळखला जायचा.

हळूहळू मुंबईच्या अनेक भागांमध्ये अमर नाईकचा दरारा वाढत गेला. त्याच्या ओळखी वाढत गेल्या. १९८५ मध्ये त्याने त्याच्या भागातील टोळ्यांशी वाटाघाटी करून त्याने त्यांना आमिष दाखवून काम करून घ्यायला सुरवात केली. पहिल्यांदा त्याने प्रभादेवी भागातल्या वालजी पालजी या बंधूंशी त्याने संधान बांधले. वालजी पालजी हे दोघे भाऊ अत्यंत डेंजर होते, सहसा ते कुणाचही काही ऐकत नसत पण नाईकसोबत काहीतरी दिल करून ते त्याच्यासोबत काम करायला तयार झाले. 

नाईकच्या ओळखी इतक्या होत्या कि १९८५ च्या महापालिका निवडणुकीत दादर भागातील एका पारशी उमेदवाराने खंडणी दिली नाही तर तुला निवडणूक लढू देणार नाही अशी धमकी त्याने दिली होती.

दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनदेखील त्यांनी शिवसेनेला दादरमध्ये एकही फलक लावू दिला नाही कि सभा घेऊ दिली नाही. जेव्हा त्या अपक्ष पारशी उमेदवाराने पैसे देण्याचे कबुल केले तेव्हा त्याला निवडणुकीला उभे राहून देण्यात आले. फक्त त्यालाच दादरमध्ये सभा घेऊ देण्यात आल्या.

इतर कुणालाही या भागात प्रचारासाठी येऊ दिलं गेलं नाही. पोलिसही यावर काही बोलले नाही आणि त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. आता दादरमध्ये एकही सभा नाही म्हणल्यावर नाईकला प्रचंड विश्वास होता कि शिवसेना हि निवडणूक हरणार. पण एवढं सगळं होऊनही शिवसेना ती निवडणूक जिंकली. तेव्हा अमर नाईकला शिवसेना काय ताकदीचा पक्ष आहे याचा अंदाज लागला. 

आपली सत्ता आणि दहशत कायम ठेवायची असेल तर शिवसेनेबरोबर आपण राहायला हवे हे त्याने ओळखले. त्यामुळे फायदा तर होईलच पण त्याला त्याच्या टोळीचे सामर्थ्यदेखील वाढवता येईल असा त्याने विचार केला. अमर नाईकला रावण सुद्धा म्हणून ओळखलं जायचं. सुरवातीला तो एक भुरटा चोर होता पण नंतर त्यानं हळूहळू मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये आपला वचक बसवला.

पण नाईकने बॅनर आणि सभांवर बंदी घालूनही शिवसेनेने नाईकला तोंडावर पाडलं होतं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.