चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का…?

 

जगभरातील ७ आश्चर्यांपैकी सर्वात पहिल्या स्थानी असणारं आश्चर्य म्हणजे चीनची जगप्रसिद्ध भिंत. ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या भिंतीबद्दल आपण सर्वांनीच ऐकलेलं असेल पण या भिंतीबद्दलच्या काही रंजक गोष्टीविषयीची माहिती खूप कमी जणांना असते. जाणून घेऊयात या भिंतीबद्दलच्या अशाच काही गोष्टींबद्दल-

इतिहास

बऱ्याच जणांचा असा समज असतो की ही एकसलग भिंत आहे. पण असं नसून अनेक छोट्या मोठ्या भिंती एकमेकांशी जोडून ही भिंत तयार झालेली आहे. भिंतीची लांबी सुमारे ६४५० मीटर इतकी असून इसवी सन पूर्व सातव्या शतकात भिंतीच्या निर्मितीचं काम सुरु झालं होतं जे पुढे साधारणतः सोळाव्या शतकापर्यंत चाललं.

kin shu huang
‘किन शु हुआंग’

चीनचा पहिला सम्राट ‘किन शु हुआंग’ याने सर्वप्रथम भिंतीच्या बांधकामास सुरुवात केली असल्याचं मानलं जात असलं तरी अनेक ज्ञात-अज्ञात लोकांचा या भिंतीच्या निर्मितीत हातभार लागलेला आहे. चीनवर होणाऱ्या परकीय आक्रमंकांच्या हल्ल्यापासून चीनचं संरक्षण व्हावं, यासाठी ही भिंत बांधण्यात आली होती. जवळपास २० ते ३० लाख लोकांनी या भिंतीच्या निर्मितीसाठी अपरिमित कष्ट घेतलेले आहेत.

भिंत चीनमध्ये कुठल्या नावाने ओळखली जाते..?

जगभरात जरी ही भिंत ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ या नावाने ओळखली जात असली तरी चीनमध्ये मात्र या भिंतीला एक विशेष नांव आहे. चीनमध्ये ही भिंत ‘वान ली छंग छंग’ या नावाने ओळखली जाते. हे कुठल्या व्यक्तीचं नांव नसून चीनी भाषेतील या शब्दाचा अर्थ ‘चीनची विशाल भिंत’ असा होतो.

अनेक परकीय आक्रमकांकडून हल्ले

चीनच्या सम्राटांनी परकीय आक्रमकांपासून चीनचं संरक्षण व्हावं, म्हणून ही भिंत बांधली खरी पण तरी सुद्धा अनेक आक्रमकांनी ही भिंत पाडण्याचा, उध्वस्त करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला. पण त्यानंतर या भिंतीची पुन्हा-पुन्हा डागडुजी करण्यात आली. भिंत जर मोठ्या प्रमाणात पडली असेल तर तिथे ती नव्याने बांधण्यात आली.

सर्वप्रथम इसवी सन १२११ साली चंगेज खान याने ही भिंत तोडली. ही भिंत तोडूनच चंगेज खानने चीनमध्ये प्रवेश मिळविला. चीनची भिंत पाडणं, हा त्यावेळी मोठाच कारनामा होता. चीनची भिंत तोडली जाऊ शकते असा विचारही करणं अवघड होतं, त्यामुळे ही भिंत पडल्यानंतर संपूर्ण चीनमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

जगभरातील सर्वात लांब स्मशानभूमी

ही भिंत जगभरातील सर्वात लांब आणि मोठी स्मशानभूमी म्हणून देखील ओळखली जाते. याचं कारण असं सांगितलं जातं की भिंतीच्या निर्मितीच्या वेळी जे कामगार आपल्या कामात दिरंगाई किंवा कामचुकारपणा करत असत, त्यांना कामाच्या ठिकाणीच जिवंतपणीच जमिनीत गाडण्यात येत असे. त्यामुळे साधारणतः साडेसहा हजार किलोमीटरच्या या भिंतीदरम्यान अनेक जागोजागी अनेक लोकांचे मृतदेह पुरण्यात आले असल्याचे सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.