या वेड्या माणसामुळे अमेझॉन मंदीमध्ये देखील हजारो कोटी कमवत आहे.

असं म्हणतात की सध्या भारतात मंदी सुरु आहे. मारुती, टाटा अशा भल्या भल्या कंपन्यांनी मान टाकली आहे. शेअर मार्केट आकसला आहे. गल्लीबोळातले इकॉनॉमिस्ट उपाययोजना काय असतील यावर चर्चा करत आहेत. दिवाळी तोंडावर आहे. पण गेल्या आठवड्यात एक विक्रम झालाय

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन इ कॉमर्स कंपन्यांनी २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान लावलेल्या सेल मध्ये तब्बल १९००० कोटींचा धंदा केलाय.

चकित झालात ना? त्यांनी फक्त ६ दिवसात अख्खं भारतीय मार्केट हलवून टाकलंय. इंडिया टुडे या मासिकाने छापलेला हा आकडा आहे. फक्त अॅमेझॉनचा विचार करायचा झाला तर त्यांच्या ग्रेट इंडियन शॉपिंग सेल मध्ये त्यांनी पहिल्या ३६ तासात ७५० कोटी रुपये कमवले होते.

गावोगावचे दुकानदार रडकुंडीला आले असताना. बिग बझार सारखे तगडे रिटेलर्स ठीकठिकाणचा आपला धंदा गुंडाळत असताना. बाकी सगळी इंडस्ट्री रडत असताना या ई कॉमर्स वाल्या कंपन्या एवढा बिझनेस कशा मुळे करत आहेत?

यासाठी आपल्याला आधी ई कॉमर्स इंडस्ट्रीची सुरवात कशी झाली ते पहाव लागेल.

साधारण सत्तरच्या दशकात अमेरिकेत इंटरनेटचा शोध लागला पण घराघरात पोहचायला एकोणीसशे नव्वद उजाडाव लागलं. तो पर्यंत या इंटरनेटची ताकद काय आहे याचा नीटसा अंदाज येत नव्हता. अनेक जन आपआपल्या पद्धतीने या नव्या क्षेत्रात काही करता येत का हे पहात होते.

यातच एक जण होता त्याच नाव जेफ बेझॉस.

जेफ बेझॉसच शिक्षण प्रिन्स्टन विद्यापीठात इलेक्ट्रीकल व कंप्युटर इंजिनियरिंगमध्ये झालं होतं. पासआउट झाल्या झाल्या इंटेलसारख्या कंपन्याची त्याला ऑफर येत होती. फिन्टेलच्या एका नव्या स्टार्टअपमध्ये नोकरी मिळवली. थोड्याच दिवसात तिथल्या डिपार्टमेंटचा हेड झाला. मग नोकरी चेंज करत करत अखेर डीई शॉ एंड कंपनी नावाच्या इन्वेस्टमेंट बँकमध्ये जॉईन झाला. तिथे गुंतवणुकीसाठीची संगणकिय आकडेमोड करायचं

काम जेफ कडे होतं. ही कंपनीसुद्धा नवीनच होती. जेफची घोडंदौड तिथेही जोरात सुरु होती. अवघ्या दोन वर्षात त्याला तिथला  व्हाईस प्रेसिडेंट पद बनवण्यात आलं. 

वय होत ३० वर्षे. कॉलेज संपून फक्त ९ वर्ष झालेली. जेफ ज्या पोजिशनला पोहचला होतं तिथे जायला लोकांना आयुष्य पूरं पडत नाही. ही त्याच्यासाठी एक मोठी अचिव्हमेंटच होती.  या नोकरीनंतर स्थैर्य आलं. तिथेच काम करणाऱ्या मेकेंझीबरोबर त्याने लग्न देखील केलं. सगळी स्वप्न पूर्ण झाली होती. पण तरीही त्याला काही तरी फिकं फिकं असल्या सारखं वाटत होतं.

त्याच्या डोक्यात एक आयडिया घोळत होती. जर आपण इंटरनेटवर ऑनलाईन पुस्तके विकायला सुरवात केली तर?

सगळ्यात आधी बायकोच्या गळी ही आयडिया उतरवली. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याच्या वेडेपणाबद्दल तिच्याकडून होकार मिळवला. मग गेला थेट आपल्या बॉसकडे. राजीनामा दिला. बॉसने कारण विचारलं. जेफने स्वतःचा स्टार्टअप सुरु करतोय म्हणून सांगितलं. बॉसच्या लक्षात आलं. तो म्हणाला छळ जरा ऑफिस बाहेर कुठे तरी शांत जागी जाऊ.

दोघे एका बागेत आले. जेफच्या ऑनलाईन बुक स्टोअरची आयडिया त्याच्या बॉसने व्यवस्थित ऐकून घेतली. आपले प्रश्न विचारले, शंका समाधान करून घेतल मग म्हणाला,

“जेफ, तुझी आयडिया खूप छान आहे. त्यात यश नक्की आहे. पण अरे असली कामे रिकामटेकड्या लोकांची आहेत. तुझ्या सारख्या मोठ्या पदावरच्या माणसाने असली हलकी कामे करू नयेत. तू वेळ घे. आणि मग मला सांग.”

बॉसने टाकलेला शहाणपणाचा डोस जेफच्या डोक्यात बरेच दिवस घोळत राहिला. पण शेवटी त्याच्या वेडेपणाने त्यावर मात केली. ५ जुलै १९९४ रोजी जेफ बेझॉसने आपल्या घरामागच्या गॅरेजमध्ये ऑनलाईन पुस्तकाचं दुकान सुरु केलं. आधी नाव दिल होतं कॅडब्रा पण नंतर ते नाव बदललं,

” अमेझॉन “

हेच नाव का निवडल यामागे सुद्धा एक गंमत आहे. जेफला वाटायचं की जर आपल्या कंपनीच नाव A ने सुरवात असणार असेल तर कोणत्याही अनुक्रमणिकेत पहिल्या नंबरला दिसेल. अमेझॉन जगातल्या सर्वात मोठ्या नद्यापैकी एक आहे. तिच्या खोऱ्यात सगळ्यात निबिड जंगल आहे. जेफने याच नावावर शिक्का मोर्तब केले.

आईवडीलांकडून ३ लाख डॉलर पैसे घेतले. शिवाय बाहेरच्या इन्व्हेस्टर्सकडूनही मोठी रक्कम उचलली होती. सगळ्यांना सांगितलं की माझा हा बिजनेस फसण्याचीच शक्यता जास्त आहे. तरी लोकांनी जेफच्या वेडेपणावर विश्वास ठेवून अॅमेझॉनमध्ये पैसे गुंतवले.

अमेझॉनची आयडिया चालली. काही वर्षातच जेफने तिचे शेअर्स पब्लिकला खुले केले. १९९८मध्ये पुस्तकाबरोबर गाणी, सिनेमाचे कॅसेट सुद्धा विकायला सुरवात केली. दोन हजार सालानंतर वेबसाईटच्या क्षेत्रात बूम आली. अमेझॉनने आपल क्षितीज विस्तारलं. पण जेफने केलेल्या मोठ्या धाडसामुळे कंपनीच दिवाळ निघत का अशी वेळ आली होती. पण तो डगमगला नाहीं,

पुढच्याच वर्षात अमेझॉन दुप्पट वेगात मोठी झाली. जेफचा जुगार यशस्वी ठरला. पुस्तकं, सीडीज सोबत छोट्या मोठ्या वस्तू सुद्धा तो विकू लागला. या क्षेत्रात विशेष स्पर्धा नव्हती, वस्तूंच्या दर्जाची खात्रीची जबाबदारी अमेझॉनने उचलली यामुळे अमेरिकाच नव्हे तर जगभर लोक या ऑनलाईन शॉपिंगचे फॅन झाले.

अमेझॉनने आपल्या लोगोमध्ये A ते Z पर्यंत बाण दाखवलेला आणि सांगितलं होतं की जगातल्या सगळ्या वस्तू इथे उपलब्ध होतील. 

शंभर कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या भारतावर त्याच लक्ष जाणं साहजिक होतं. त्याच्याच कंपणीमध्ये काम करणाऱ्या दोघा बन्सल नावाच्या मुलांनी फ्लिपकार्टची स्थापना केली. भारतात इंटरनेटने देखील स्पीड पकडला होता. इथल्या लोकांची मानसिकता पाहून सेलची सुरवात केली. आज गेली अनेक वर्ष लोक दिवाळी,दसऱ्याच्या तोंडावर या दोन कंपन्याच्या सेलची वाट बघत असतात.

या सेल मागे मोठे अर्थशास्त्र असते. सोशल मिडियाचा या मागे मोठा हात आहे. भल्या बुऱ्या मार्गाचा वापर करून या ई कॉमर्स वाल्या कंपन्या आक्रमकपणे पाऊल टाकत आहेत. थेट मन्युफ़कचरिंग कंपनीशी त्यांचे टायअप आहेत. एकदम प्रचंड माल उचलत असल्यामुळे स्वस्तात वस्तू पुरवणे त्यांना परवडत देखील आहे.

बाकी कोणाच काही का होईना जगाला ई कॉमर्सच वेड लावणारा जेफ बेझॉस जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनलाय.

आजही त्याला पाहिलं तर अमेझॉनच्या भल्या मोठ्या ऑफिसमध्ये विस्कटलेल्या कपड्यामध्ये विचार करत भटकताना तो दिसतो.  अशा या वेड्या माणसाला कुठल्या मंदी महामंदीचा काही फरक पडत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.