ग्रह दोष आहे म्हणून अंबानी बरेच दिवस अँटिलीयाला राहायलाच गेले नव्हते.

मुकेशभाई अंबानी आणि नीता भाभी भारतातला सर्वात श्रीमंत माणूस. बच्चन शाहरुख खान ऐश्वर्या  सारखी माणसं त्याच्या लेकीच्या लग्नात वाढपी म्हणून फिरतात म्हणजे बघा या माणसाची पॉवर काय असेल. असा हा पावरबाज माणूस तशाच पावरबाज घरात राहतोय.

घराचं नाव अँटिलीया.

घर कुठलं हो महालच आहे तो. इंग्लंडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेस च्या खालोखाल जगातील सर्वात महागडं घर असं त्याची ओळख आहे. गेल्या वर्षी कोणी तरी याच व्हॅल्युएशन केलं तर जवळपास २.५ बिलियन डॉलर म्हणजे आपल्या भाषेत वीस हजार कोटी इतकी रक्कम आली. आता खरं खोटं त्या मुकेशभाई आणि नीता भाभीलाच माहित.

एक काळ होता धीरूभाई अंबानी आणि त्यांची लेकरं भुलेश्वरला एका जय हिंद नावाच्या चाळीत राहायचे. दहा बारा वर्षांचे असणारे मुकेश भाई आणि अनिल भाई एकदा पाहुण्यांसमोर खोडकर पणा केलेले म्हणून धीरूभाईंनी त्यांना दोन दिवसांसाठी गॅरेजमध्ये राहायची शिक्षा केलेली.

एवढ्या खडतर स्थितीतुन आलेलं अंबानी. धीरूभाई यांच्या जिद्दीपणा मुळे आणि डोकेबाज स्कीमांमुळे त्यांचं कुटुंब गरिबीतून वर आलं. बघता बघता भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक रिलायन्सची स्थापना झाली.

तस बघायला गेलं तर हे म्हणजे अगदी साधं सिम्पल मिडल क्लास गुजराती कुटुंब. चोख धंदा करायचा आणि काटकसरीने पैसा साठवायचा हे त्यांचं ब्रीद वाक्य. देवाधर्माचं देखील त्यांना आधीपासून वेड. कोकिलाबेन यांच्या शब्दाबाहेर जाण्याची खुद्द धीरूभाईंची टाप नव्हती तर मुकेश आणि अनिल लांबची गोष्ट.

हेच गुण नीता भाभींमध्ये पुरेपूर उतरले. अगदी आयपीएलची मॅच सुरु असताना त्यांचा सुरु असलेला गणपतीच्या मंत्राचा जाप वगैरे वगैरे गोष्टी तर सगळ्यांनी टीव्हीवर पाहिल्याचं आहेत. मग घरात पूजाअर्चा नियम नियमावली यांचं देखील मोठं प्रस्थ आहे. असं म्हणतात की खुद्द मुकेशभाई आपला प्रत्येक निर्णय ज्योतिष्याला घेतात.

२००६ साली त्यांनी अँटिलीया बांधायला सुरवात केली.

या घराच्या जागेपासून वाद सुरु झाले. या  जागेवर १०० वर्षांपूर्वी करीमभाई इब्राहिम नावाच्या एका व्यापाऱ्याने अनाथाश्रम सुरु केलेलं. अंबानींनी जेव्हा हि अनाथाश्रमाची जागा खरेदी केली तेव्हा मुस्लिम वफ्फ बोर्डाने आक्षेप घेतला. तिथल्या बांधकामावर स्टे आणला गेला. सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेला. अखेर मुकेशभाईंनी वफ्फ बोर्डाकडे १६ लाख रुपये भरून ना हरकत प्रमाणपत्र आणलं तेव्हाच हे कन्स्ट्रक्शन सुरु झालं.

अमेरिकेतील आर्किटेक्ट ऑस्ट्रेलियातील कॉट्रॅक्टर वापरून मुकेशभाईंनी पाच वर्षात हा आपल्या स्वप्नातला सत्तावीस मजली ताजमहाल उभा केला.

अगदी प्रायव्हेट स्विमिंगपूल म्हणू नका, प्रायव्हेट थिएटर म्हणू नका, प्रायव्हेट जिम म्हणू नका जगातल्या सगळ्या सोयी सुविधा या बंगल्यात हजर होत्या. स्वतःचे तीन हेलिपॅड त्यांनी उभारले होते. गेल्या शेकडो वर्षात संबंध भारतात असं घर कोणी बांधलं नसेल असं म्हटलं गेलं.

पण तेवढ्यात आणखी एक विघ्न आलं. भारतीय नौदलाने अंबानींच्या घरावर बांधत असलेल्या हेलिपॅडवर आक्षेप घेतला. पर्यावरण मंत्रालयाकडे काही एनजीओने तक्रार केली कि या हेलिपॅडमुळे शेजार पाजाऱ्यांना हेलिकाप्टरच्या आवाजाचा त्रास होईल त्याच काय ?

एक झाल्यावर एक प्रॉब्लेम अंबानींच्या डोक्यावर येऊन बसतच होते.

२०११ साली अँटिलीया बनून तयार झाली. तिचं कौतुक देखील झालं. धडाक्यात वास्तूशांती झाली. अनेक मान्यवर उपस्थित राहिले. पण या घरावरून अंबानींना टीका देखील सहन करावी लागली. खुद्द टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी अंबानींवर ताशेरे ओढले होते. ते म्हणाले होते,

हा बंगला म्हणजे भारतातील श्रीमंत माणसाचे गरीब लोकांच्या बद्दल असलेल्या सहानुभूतीचा अभाव असल्याचं लक्षण आहे.

ते एका मुलाखती मध्ये म्हणाले कि तिथे राहणाऱ्या व्यक्तीनां आपल्या सभोवतालच्या गोष्टीबद्दल काळजी वाटली पाहिजे आणि विचार केला पाहिजे कि आपण इतरांच्या जगण्यात काय फरक पाडू शकतो. जर तो तसे करू शकत नसेल तर हे वाईट आहे.

अशा अनेक टीका टिप्पणी सुरु झाल्या पण काही दिवसांनी बातमी आली की एवढा खर्च केला, थाटमाट केला पण मुकेशभाई, निताभाभी आणि त्यांची पोरं आपल्या सी विंड नावाच्या जुन्या घरातच राहत आहेत.

त्याकाळच्या शोध पत्रकारांनी माहिती हुडकून काढली कि ग्रह दोष आहेत म्हणून अंबानी कुटूंब नवीन घरात राहायलाच गेलेले नाही.

अंबानींच्या मित्रमंडळींना प्रश्न विचारला तर त्यांनी हि गोष्ट खरी आहे म्हणून सांगितलं. कोणत्या तरी बाबाने वास्तुशास्त्रात दोष काढलेले म्हणून मुकेशभाईंनी हे दोष निवारण होई पर्यंत जुनाच घरात राहण्याचा निर्णय घेतलाय.

काही जण म्हणत होते की असं काही नाही. त्यांनी आपल्या अनेक फ्रेंड ना या घरात पार्टी दिली आहे. रोज अनेक जण घर बघायला म्हणून येतात. मुकेश भाई आणि फॅमिली काही रात्री इथे राहिले देखील आहेत पण कोकिलाबेन जुन्या घराच्या खालच्या फ्लोअर वर अनिल अंबानींच्या घरात राहतात म्हणून त्यांची तब्येत आजकाल थोडी नरम आहे म्हणून मुकेशभाई परत जुन्याच घरात राह्यला गेले आहेत.

जेव्हा पत्रकार रिलायन्स च्या प्रवक्त्याला तुषार पाणिया याला हा प्रश्न विचारला तेव्हा त्याने थेट उत्तर देणे टाळले. तो म्हणाला,

“कुठे राहायचे हे प्रत्येक कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे यात कोणीही ढवळाढवळ करणे योग्य नव्हे.”

पण जेव्हा पत्रकारांनी ते आता नेमकं कुठे राहतात हा प्रश्न लावून धरला तेव्हा प्रवक्त्याने एका शब्दात त्यांना उत्तर दिले,

“दोन्ही कडे “

मुंबईतील डीएनए या इंग्रजी वर्तमानपत्राने सूत्रांच्या हवाल्याने हि बातमी लीक केली. देशभरातील न्यूज चॅनेलवर हा एकच प्रश्न चर्चेत होता. वेगवेगळे वास्तुशास्त्रज्ञ, ज्योतिषी, बाबा मंडळी तावातावाने आपले स्लोयुशन टीव्हीवर मांडत होते. काही काही ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन वाले देखील वाद घालत होते. बरेच दिवस हि चर्चा रंगली आणि नवीन विषय मिळाल्यावर ती बंद देखील झाली.

दरम्यानच्या काळात अंबानीनि कुठल्यातरी मोठ्या ज्योतिषाची मदत घेऊन हा वास्तू दोष काढून टाकला आणि राहायला देखील गेले.

सुखाने काही वर्ष राहिले असतील नसतील पण तेवढ्यात त्यांच्या घराबाहेर स्फोटके सापडली आणि नवीन गोंधळ सुरु झालाय. असं म्हटलं जातं कि अजूनही काही बुवा अंबानींना हे घर तुम्हाला लाभदायक नाही तिथे काही शाप आहे, वास्तू मध्ये दोष असं सांगत असतात.परत खरं खोटं त्या मुकेश भाई आणि नीताभाभीला ठाऊक.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.