अंबानींच्या घरावर छापा टाकल्यानंतर CBI डायरेक्टरची उचलबांगडी झाली होती… 

आपल्या देशात उद्योगपतींची एक समांतर व्यवस्था आहे, आत्ता मोदी आले म्हणूनच अंबानी मोठे झाले असं म्हणणाऱ्यांच देखील पोटभरून कौतुक वाटतं. कारण एका दिवसात अंबानी काही अर्थव्यवस्थेच्या टोकावर जावून बसलेले नाहीत. खोबरं तिकडं चांगभल केल्याशिवाय बिझनेस करता येणं शक्य नसतं. त्यामुळे सत्ता कोणाचीही असो उद्योगपती प्रत्येक ठिकाणी मार्ग काढतच असतात. 

या पूर्वी आम्ही एका पेट्रोलियम मंत्र्यांचा किस्सा लिहला होता. ते कॉंग्रेसी नेते अंबानींना नडले होते त्यामुळे त्यांना पद सोडावं लागलं होतं.  तो किस्सा तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन वाचू शकता. 

आत्ता तशाच पद्धतीचा हा दूसरा किस्सा… 

का किस्सा घडला होता तेव्हा भारताच्या पंतप्रधानपदी होते अटलबिहारी वाजपेयी तर गृहमंत्री होते लालकृष्ण अडवाणी.. 

या काळात CBI च्या डायरेक्टरपदी एक व्यक्ती होते त्यांच नाव त्रिनाथ मिश्रा. माणूस मुळचा प्रामाणिक.  राजकीय दबाव झुगारून देवून काम करणारा माणूस म्हणून प्रशासनात त्यांची ख्याती होती. त्यांच्या वाटेला जाण्याचं काम सहसा कोणी करत नसत. कारण हा माणूस थेट अशा राजकीय व्यक्तींची जाहीर अपमान करण्यासाठी मागे-पुढे पहात नसे. 

मग मुद्दा हा राहतो की अशा माणसाला CBI च्या डायरेक्टरपदी कस काय बसवण्यात आलं असेल. तर १९९७ साली सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट पास केलं होतं. त्यात सुप्रीम कोर्टाने कोणत्याही राजकीय प्रभावातून CBI मुक्त असायला हवी अस सांगितलं होतं. या निर्णयाला मान्य करत असतानाच त्रिनाथ मिश्रा यांची नेमणूक CBI डायरेक्टर म्हणून झाली होती. 

आत्ता आपण थेट १९ नोव्हेंबर १९९८ या दिवसाला जावुया… 

या दिवशी एक बातमी कानोकानी पसरली होती. मात्र अधिकृत दुजोरा असा कोणीच दिला नव्हता. बातमी होती की मुंबईच्या कफ परेड येथील धीरूभाई अंबानी यांच्या घरावर CBI ची रेड पडली आहे.  बातमीला अधिकृत दुजोरा मात्र नव्हता. अंबानी यांनी देखील अशी कोणतीही रेड पडली नसल्याचं सांगितलं. 

मात्र दूसऱ्या दिवशी आऊटलूक मासिकात ही बातमी छापून आली.

सुत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या या बातमी धीरूभाईंचे ऑफिस, घर अशा दोन्ही ठिकाणी CBI ने रेड टाकली असून ते गोपनीय फाईल शोधत  असल्याची माहिती देण्यात आली होती. या बातमीनंतर रिलायन्सने देखील मान्य केलं की रेड पडली होती. 

बातमीच्या सुत्रांनुसार ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट नुसार ही कारवाई करण्यात आली होती. देशाची काही गोपनीय माहिती अंबानींकडे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.. 

इंडियन ऑईल आणि रिलाइन्स यांच्यात एक करार झालेला. या करारामधील एक फाईल अंबानी यांच्याकडे होती. ही फाईल थेट पेट्रोलियम मंत्रालयाच्या क्लासिफाईड डॉक्युमेंट मध्ये येत होती.  थोडक्यात ही गोपनीय फाईल होती. या फाईलमधील माहिती अंबानींकडे असणं म्हणजे ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं उल्लंघन होतं. या रेडमध्ये ही फाईल मिळाल्याचं आऊटलुकच्या बातमीत सांगण्यात आलं होतं. 

पण या छाप्यापूर्वी २१ दिवसांपूर्वी असाच एक छापा टाकण्यात आला होता.

रिलायन्सचे एक वरिष्ठ अधिकारी सुब्रम्हण्यम यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला होता.  यानंतर लगेचच CBI अंबानी यांच्या मुंबईतील घरी छापा टाकेल अस नियोजित होतं. पण हा नियोजित छापा टाकण्यास २१ दिवस लागले व या २१ दिवसात धिरूभाई अंबानी यांना अलर्ट होण्यास पुरेसा वेळ मिळाला. 

छापा टाकण्यास उशीर झाल्याच कारण पंतप्रधान कार्यालय व गृहमंत्री कार्यालयातून परवानगी मिळवण्यात झालेला उशीर तसेच दिल्ली पोलीस, आयकर विभाग व CBI यांच्यात नसलेला ताळमेळ सांगण्यात येत. 

त्यानंतरच काही महिन्यात CBI डायरेक्टर त्रिनाथ मिश्रा यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. नेमका प्रकार काय झाला होता हे त्रिनाथ मिश्रांनी ओपन मॅक्झिन ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. ही मुलाखत जून 2013 छापून आली होती. 

यातील दाव्यानुसार, 

या केससंबधित माझ्यावर राजकीय दबाव आला होता. मला एका राजकीय नेत्याकडून सांगण्यात आलं की कारवाई टाळण्यात यावी.

तेव्हा मी अस होवू शकत नाही व मी त्या पद्धतीचा व्यक्ती नाही अस खडसावून सांगितलं होतं तेव्हा मला, फिर भी देख लिजीए असा निरोप पाठवण्यात आला… 

त्यानंतरच्या काही महिन्यात मला पदावरून दूर करण्यात आलं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.