अंबानी Vs ब्लॅक कोब्रा : मनु माणिकला मार्केटमध्ये नडलेला एकमेव माणूस होता धिरूभाई

मनु माणिक, मनु मुंद्रा अथवा ब्लॅक कोब्रा..

या माणसाचे फोटो शोधायला इंटरनेटवर जा, तुम्हाला या माणसाचा फोटो मिळणार नाही. असेल कोणतर साधा तर तसा पण विषय नाही. भारतातल्या बड्या बड्या उद्योगपतींना बाजारातून उठवायचं काम ब्लॅक कोब्रा करायचा. सोनीवर आलेली हर्षद मेहताची स्कॅम १९९२ सिरीज बघितली असेल तर यात हा ब्लॅक कोब्राचं कॅरेक्टर दाखवलं आहे.

बिअर कार्टेल चा हा बादशहा होता. अस म्हणतात की एखाद्या कंपनीच्या डॉयरेक्टर बॉडीत कोण असावं आणि कोण नाही ते देखील हा ब्लॅक कोब्रा ठरवायचा. त्याच्या मनासारखं घडलं नाही तर शेअर मार्केटच्या माध्यमातून तो संबंधित कंपनीचा बाजार उठवायचा. 

सिरीजमध्ये या ब्लॅक कोब्राच्या मागे पुढे करणारे दोन साधे व्यक्ती दाखवलेत. बॉडी लॅग्वेजवरून हे दोघे म्हणजे आजचे राकेश झुनझुनवाला आणि राधाकृष्ण दमानी असल्याचं सांगण्यात येत. हे दोघे पण आज मार्केटचे दिग्गज आहे. दमानी म्हणजे डी मार्टचे मालक. आत्ता विचार करा आज आपण ज्यांना मार्केटचे बच्चन म्हणतो त्यांच्या टिरीवर लाथ घालण्याचं काम हा ब्लॅक कोब्रा करायचा.

तर असा हा ब्लॅक कोब्रा. याच्या नादाला कोणीच लागायचं नाही. हा साप आडवा गेला की माणूस संपून जायचा, पण या माणसाला एक व्यक्ती मात्र पुरून उरला होता आणि त्याचं नाव धिरूभाई अंबानी…

ती तारिख होती १८ मार्च १९८२ ची.

रोजच्या प्रमाणे शेअर मार्केट सुरू होणार असा अंदाज होता, पण एकामागून एक सर्किट लागत गेले आणि मार्केट चक्क तीन दिवस बंद राहिलं.

या तीन दिवसांच महत्व ज्याला समजत नाही त्यांना सांगू वाटतं, इतक्या मोठ्या कोरोनाच्या संकटात मार्केट फक्त एक तास बंद पडलेलं. आत्ता विचार करा किती मोठ्ठा लफडा झाला असेल ज्यामुळे मार्केट तीन दिवस बंद राहिलं असेल.

नेमकं या दिवशी काय झालं हे समजून घ्यायला आपल्याला काही दिवस पाठीमागे जायला लागतं.

बिअर कार्टेल म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत पाडून त्यातून फायदा घेणारे लोकं. यांचा बाप होता ब्लॅक कोब्रा. याच्या रडारवर रिलाईन्स टेक्स्टाईल इंडिस्ट्री आली. रिलायन्सचे शेअर्स विकायचे. त्यातून भाव पडतील. तसं झालं की पून्हा विकत घ्यायचे आणि नफा मिळवायचा. याला मार्केटमध्ये शॉर्ट सेलींग स्ट्रेटेजी म्हणून ओळखलं जातं.

शेअर्समार्केटमध्ये ही खरेदीविक्री तोंडी होत असते. विक्री करणाऱ्याकडे किंवा खरेदी करणाऱ्याकडे वास्तविक शेअर्स नसतात. मात्र प्रत्येक दूसऱ्या शुक्रवारी सर्व ब्रोकर तोंडी शेअर्सचं वास्तविक भूगतान करत असतात. तेव्हा जर तोंडी विकलेला शेअर्स नसेल तर प्रती शेअर्स ५० रुपये बदला द्यावा लागतो.

या शेअर्स मार्केटचे पण काही नियम असतात म्हणजे समजा रिलायन्सचे शेअर्स विकले जात आहेत आणि त्यामुळे शेअर्सची किंमत कमी होत आहे अशी वेळी तिच कंपनी हे शेअर्स विकत घेवू शकत नाही. त्यामुळे शेअर्स मार्केटमध्ये लांबून पहाताना त्या कंपनीचा संबंध दिसत नाही. पण अशा कंपन्या आपल्या ब्रोकरमार्फत थर्ड पार्टीच्या नावावर बऱ्याच गोष्टी मॅनेज करत राहतात.

ब्लॅक कोब्राने हाच डाव अंबानीवर टाकला…

झालेलं अस की रिलायंस टेक्सटाईल इंडस्ट्रिजचे सुमारे साडेतीन लाख शेअर्स एकत्रितपणे विकण्यास सुरवात करण्यात आली. त्यावेळी एका शेअर्सची किंमत होती १३१ रुपये.

पण इथे एक घोळ झाला, ब्लॅक कोब्राच्या पुढे अंबानी नावाचा खराखुरा मुंगूस आलेला…

धीरूभाईंना शेअर्सच्या विक्रीची कुणकुण लागली. जसेजसे शेअर्स विकण्यास सुरवात करण्यात आली तसेतसे धिरूभाईने आपल्या ब्रोकरच्या मार्फत तेच शेअर्स विकत घेण्यास सुरवात केली. त्याकामी त्यांच्या मदतीला जैन आले. स्वत:च्या कंपनीचे शेअर्स धीरुभाई घेवू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी परस्पर एक समांतर रॅकेटच उभा केलं…

एका बाजूला ब्लॅक कोब्राची गॅंग रिलायन्स टेक्सटाईलचे शेअर्स विकत होते तर दूसरीकडे भारतभर बसलेले वेगवेगळे ब्रोकर हे शेअर्स विकत घेवू लागले होते. हे सगळं काम धिरूभाई अंबानी यांनी घडवून आणलं. दिवस संपत आला तेव्हा शेअर्स १२५ रुपयांवर आला. पुढच्या काही दिवसात हाच प्रकार झाला.

एकूण ११ लाख शेअर्स विकण्यात आले आणि अंबानीच्या ब्रोकर लोकांनी त्यापैकी साडेआठ लाख शेअर्स विकत घेतले.

आत्ता मात्र शेअर्सची किंमत वाढू लागली.

आत्ता ब्लॅक कोब्रा गॅंगच धाब दणाणलं. त्यांच्या लक्षात येवून चुकलं की आपण आपल्याचं जाळ्यात सापडलोय. १३१ रुपये तोंडी विकलेला शेअर्स आत्ता वाढला तर होता. दूसरा शुक्रवार आला. आत्ता प्रत्यक्षात शेअर्सचा व्यवहार करायचा होता. पण कोब्रा गॅंगकडे तर शेअर्स नव्हते.

त्यांच्याकडे तेव्हा दोनच पर्याय शिल्लक राहिले. एकतर मार्केटमधून चढ्या किंमतीला शेअर्स घेवून देणे नाहीतर प्रतिशेअर्स पन्नास रुपये दंड देणं.

कोब्रा गॅंगने नांग्या टाकल्या आणि धिरूभाईंकडून वेळ वाढवून मागितला. धिरूभाई त्याचीच वाट बघत होते. त्यांनी तात्काळ वाढीव वेळ मिळणार नाही म्हणून सांगितलं. आत्ता झकमारत उंची किंमतीला कोब्रा गॅंगला रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स विकत घ्यावे लागणारे होते. त्याचा परिणाम म्हणजे शेअर्सची किंमत पुन्हा वाढू लागली. पुढच्या तीन दिवसात शेअर मार्केट सुरू व्हायचं आणि बंद व्हायचं. याचा परिणाम असा झाला की रिलायन्सचा शेअर्स ढगात जावून पोहचला.

त्या वेळी ज्या ज्या लोकांनी शेअर्स विकले ते मालामाल झाले. हा सगळा प्रकार १८ मार्च १९८२ साली सुरू झाला आणि १० मे १९८२ रोजी संपला.

सगळं कांड पुर्ण झालं तेव्हा मार्केटचा नवा बादशहा जन्माला आला होता तो म्हणजे धिरूभाई अंबानी.

गीता पीरामल यांच्या बिझनेस महाराजास या पुस्तकत या किस्साबद्दल लिहण्यात आलय,

त्यामध्ये त्या म्हणतात त्यांच्यामुळे तीन दिवस मार्केट बंद राहिलं. त्यांनी ब्रोकरला झुकायला भाग पाडलं या कौतुक होतच पण त्याहून अधिक म्हणजे त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांच्या विश्वास निर्माण केला. रिलायन्सचे शेअर्स कोणीही हलवू शकत नाही हा सामान्य गुंतवणूकदाराला दिलेला विश्वास अधिक मोठ्ठा होता. याचा एकंदरित परिणाम म्हणजे ९० च्या दशकापर्यन्त रिलायन्सकडे २४ लाख इन्वेंस्टर जोडले गेले होते. त्यामुळे रिलायन्स आपली वार्षिक बैठक मुंबईच्या स्टेडियमवर आयोजिक करावी लागत होती.

धिरूभाईबाबत एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे दुबईच्या एका अरब व्यक्तीने गुलाब लावण्यासाठी धिरूभाईंना भारताची माती मागितली तेव्हा त्यांनी ही माती देखील विकली होती. लोक आजही त्यांच्यावर या गोष्टीवरून टिका करतात पण धिरूभाई पक्का बिझनेसमॅन होता. ते म्हणत समोरच्या ज्या ज्या गोष्टीसाठी पैसे देतो ते मी विकू शकतो.

शून्यातून त्यांनी विश्व उभा केलेलं म्हणूनच ते स्वत:ला झिरो क्लब चा मेंबर म्हणवून घ्यायचे. या माणसाने बरेच झोल केले असतील त्यांच्यावर तसे आरोप पण झाले. पण या माणसाच्या डोक्याचा नाद मात्र कोणीच करु शकलं नाही हे ही तितकच खरं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.