अंबानींनी वाडियांचा खुन करायची सुपारी दिली होती?

सध्या संपूर्ण भारतात एकच गोष्ट चर्चेत आहे. अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओमध्ये सापडलेली स्फोटकं सापडली. त्या सोबत एक चिठ्ठी लिहिली होती की

 प्रिय नीता भाभी और मुकेश भैया और परिवार यह सिर्फ एक ट्रेलर है। अगली बार, आपके परिवार के पास उड़ान भरने के लिए पर्याप्त सामान होगा। सावधान रहे।

हि स्फोटके सापडली आणि सर्वत्र खळबळ उडाली. अशातच काळ त्या स्कॉर्पिओच्या मालकाचा गूढ मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षांनी यावरून सभागृह डोक्यावर घेतले. एकंदरीत या प्रकरणाबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल देखील काही जण प्रश्न व्यक्त करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून व्हाटसअपवर हत्येचा कट आणि अंबानीज.. यावर पोस्ट फिरत आहे.आणखी मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योगपती नसली वाडिया यांच्या हत्येचा कट करण्यात आला होता व त्याची शंकेची सुई धीरूभाई अंबानी यांच्यावर आली होती असं त्यात म्हटलं गेलंय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

या गोष्टीची सुरवात होते सत्तरच्या दशकात. आणीबाणी नंतर इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या आणि त्यांच्या जागी मोरारजी देसाई यांची सत्ता स्थापन झाली होती. भारतात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार निवडून आलं होतं. आणीबाणीच्या काळात घडलेला भ्रष्टाचार खणून काढायचा म्हणून मोरारजींच्या मंत्रिमंडळ कामाला लागलेलं होतं.

अशातच भारतातील सर्वात मोठ्या कापड उद्योगाचे बॉम्बे डाईंगचे मालक नसली वाडिया यांना 60000 tpa di-methyl terephtalate (DMT) प्लॅंट सुरु करायची परवानगी जनता सरकारने दिली.

वाडिया हे सुरवातीपासून काँग्रेस विरोधी गटातले उद्योगपती मानले जायचे. त्यांचे आजोबा मोहम्मद अली जिना यांच्या काळापासून हा वाद चालत आलेला. जनता सरकारने वाडियांच्या वर आजपर्यंत झालेल्या अन्यायाची परतफेड म्हणून त्यांच्या उद्योगाला मदत करायचं धोरण राबवलं होतं.

पण वाडियांचं दुर्दैव असं की त्यांना जो प्लॅंट स्थापन करण्यासाठी परवानगी मिळाली होती त्याच लायसन्स हातात येण्याआधीच जनता सरकार कोसळले आणि इंदिरा गांधी निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेत आल्या.

१९८१ साली वाडियांना जे लायसन्स मिळणार होते ते लायसन्स आता एका वेगळ्याच व्यक्तीला मिळाले. त्याच नाव होतं

धीरूभाई अंबानी

गेल्या पाच दहा वर्षांच्या काळात चर्चेत आलेली कंपनी म्हणजे रिलायन्स पब्लिक लिमिटेड. एक काळ असा होता की लाखभर रुपयेचा असणारा या कंपनीचा शेअर घेण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं. अरब लोकांना माती विकण्यापासून सगळे धंदे करून बसलेल्या अंबानींना चिवट बनिया म्हणून ओळखलं जायचं.

कापडाचा धंदा होताच आता नॉयलॉन इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट मध्ये उतरले. अंबानी नावाचा ब्रॅण्ड वाढू लागला. याच काळात अंबानी काळाबाजार करतो अशा बातम्या येवू लागल्या. त्यावर धिरूभाई अंबानीच उत्तर असायचं

ज्यांनी माझ्यासोबत व्यवहार केला नाही अशाच लोकांनी माझ्यावर टिका करा…

जेव्हा वाडियांना मजूर झालेला प्रोजेक्ट इंदिरा गांधींच्या काळात अंबानींना मिळाला तेव्हा खळबळ उडाली. वाडियांची तळपायाची आग मस्तकाला गेली. अशातच  Paraxylene facility बांधायची देखील परवानगी अंबानींनाच मिळाली. वाडियांनी अंबानींविरुद्ध कंबर कसली. त्यांच्या मदतीला आले इंडियन एक्स्प्रेसचे मालक  रामनाथजी गोएंका.

बॉम्बे डायिंग हा भारतातील सर्वात जुन्या उद्योगसमूहापैकी एक तर रिलायन्सचे साम्राज्य नव्याने स्थापन झालेलं. भल्याबुऱ्या मार्गाने संपत्ती मिळवणाऱ्या नवश्रीमंतांबद्दल गर्भश्रीमंत व्यक्तींचा राग असतो तसाच राग वाडियांना अंबानींबद्दल होता. त्यातच अंबानी आपले राजकीय कनेक्शन वापरून बॉम्बे डायिंग ला लागणारे केमिकल्स महाग करायची खटपट करत होते.

गोएंकांनी आपल्या वर्तमानपत्रामार्फत अंबानींच्या उद्योगातील गैरकारभार खणून त्याची सनसनाटी मालिका सुरु केली. अशातच देशाचे अर्थमंत्री व्ही.पी.सिंग यांचा देखील त्यांना पाठिंबा होता. वाडिया आणि अंबानी युद्ध शिगेला पोहचलं. रोज एकेमकांवर आरोप प्रत्यारोप झडत होती. 

१९८६ साली धीरूभाई अंबानी यांना हार्ट अटॅक आला. एव्हाना त्यांची मुलं मुकेश आणि अनिल रिलायन्स मध्ये सक्रिय झाले होते. असं सांगितलं जात की या दोन्ही भावांनी आपल्या वडिलांच्या हार्ट अटॅक मागं  वाडियांना कारणीभूत धरलं.

भारतातले सर्वात मोठे दोन उद्योग रुपी डोंगर एकमेकांवर आदळले होते. याचे भयंकर परिणाम होणार याची कुणकुण शेअर मार्केटला लागली होती.

अशातच एक दिवस बातमी आली की मुंबई पोलिसांनी एका गुंडाला पकडलं आहे. तो नसली वाडिया यांना मारायचा कट करत होता. सगळ्यात खळबळ जनक गोष्ट म्हणजे त्याला हि सुपारी अंबानींनी दिली आहे असे आरोप करण्यात आले.

तेव्हाचे सीआयडीचे पोलीस आयुक्त वसंत सराफ आणि सह पोलीस आयुक्त अरविंद इनामदार यांनी ही होती. त्यांनी ही कारवाई केली होती.

अटक केलेली तो गुंड होता अर्जुन वाघजी बाबरीया उर्फ प्रिन्स बाबरीया

त्याला भेंडी बाजार मधल्या एकाछोट्याशा झोपडीत राहणाऱ्या बाबरियाला उचलण्यात आलं. तो एका ऑर्केस्ट्रामध्ये ड्रम वाजवायचा. पण याचा मुख्य धंदा कॉट्रॅक्ट किलिंगचा होता. खुनाची सुपारी घेणे आणि प्रोफेशनल किलर सप्लाय करणे यातला तो छोटा एजंट मानला जायचा. मुंबईच्या अंडरवर्ल्डशी त्याच कनेक्शन होतं.

प्रिन्स बाबरियाला अटक झाली त्याच वेळी आणखी एका व्यक्तीला अटक झाली ज्याच्या नावामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. तो होता कीर्ती अंबानी.

कीर्ती अंबानी हा एकेकाळचा पत्रकार पण आपले फर्डे इंग्लिश, नम्र स्वभाव आणि गोड वाणी मुळे काही वर्षांपासून रिलायन्समध्ये प्रवक्ता पदावर काम करत होता. त्याची आणि बाबरीयाची जुनी ओळख होती. बाबरीयाला अटक झाली तेव्हा त्याच्या जवळ दोघांचे एकत्र फोटो देखील सापडले होते. बाबरीयाच्या जवळ एका वर्तमानपत्रात वाडिया यांचा आणि त्यांच्या काळ्या ब्यूक गाडीचा देखील फोटो सापडला होता.

या बाबरीयाने किर्ती अंबानीची एका शनु नावाच्या किलरशी ओळख करून दिली होती. त्याला सांगितलेलं कि त्याच नाव शकील आहे. होरायझन आणि पाम ग्रीव्ह्ज नावाच्या हॉटेलमध्ये त्यांच्या अनेकवेळा भेटी झाल्या. वर्मा नावाच्या गॅरेजवाल्याने त्यांना पन्नास हजार रुपये घेऊन दोन रिव्हॉल्व्हर आणून दिल्या. त्या दोन रिव्हॉल्वर आणि दहा हजार रुपये देऊन बाबरियाने शनुच्या हातून वाडियांची हत्या करायचं ठरवलं. पन्नास हजार रुपये देऊन आणखी एका शार्प शूटरला या मोहिमेवर निवडलं होतं.

तारीख ठरवलेली २४ जुलै १९८९. प्रभादेवी इथल्या वाडियांच्या बंगल्याबाहेर सकाळी किंवा रात्री ८ वाजता त्यांच्या ऑफिस बाहेर त्यां चा गोळ्या झाडून गेम करायचा असा प्लॅन आखण्यात आला होता.  

नेमकं तेव्हा नसली वाडिया एका महत्वाच्या फॉरेन ट्रिपवर गेले. तिथे त्यांना वेळ लागला आणि इकडे पोलिसांना खबर लागली होती कि किर्ती अंबानीने बाबरीयाला एका मोठ्या बिझनेसमनला मारण्यासाठी पन्नास लाखांची सुपारी दिलेली आहे. कीर्ती अंबानी आणि बाबरीयाचे  देखील टॅप करण्यात आले.

सराफ व इनामदार या कर्तबगार जोडीने या मागचा तपास करून या दोघांनाही जेरबंद करण्यात यश मिळवलं.

ही अटक झाली आणि राज्यात व केंद्रात भराभर सूत्रे हलू लागली.

वाडिया हे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे मित्र समजले जात होते. पवार आता काँग्रेसमध्ये आले असले तरी वाडियांशी त्यांची मैत्री अनेक दशकांपासून होती. तर अंबानी यांनी हा विषय केंद्रात नेला. राजीव गांधींच्या खास वर्तुळातील अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधानांनी पवारांना केस सीबीआय कडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

तत्कालीन सीबीआयचे प्रमुख मोहन कात्रे हे अंबानींच्या जवळचे समजले जात होते. इंडियन एक्स्प्रेसमधून टीका करण्यात आली कि

अंबानी ही देशात एकमेव व्यक्ती आहे ज्यांना आपल्या वर इन्व्हेस्टीगेशन कोणी करायचे हे ठरवायचा अधिकार प्राप्त झाला आहे.

अंबानींच्या कडून सांगितलं जात होतं की या हत्येच्या कटात आमचा कोणताही संबंध नाही. खुनाची सुपारी द्यायचीच असती तर आम्ही बाबरीया सारख्या फुटकळ गुंडाला हे काम सोपवलंच नसतं. आम्ही सध्या भारतातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योगसमूह आहोत. अशा गोष्टींमध्ये पडण्यास आम्हाला वेळ आणि इच्छा दोन्ही नाही.

पंतप्रधाकरत होते. फक्त अधिकारीच नाही तर मंत्र्यांच्यात देखील दोन गट पडले. देशाचे गृह मंत्री बूटा सिंग, रेल्वे मंत्री माधवराव सिंधिया हे तगडे नेते अंबानींच्या विरोधात मानले जात होते. पण येत्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवणे हिताचे आहे असा काँग्रेसमधील एकंदरीत सूर होता.

राम जेठमलानी सारखे मोठे वकील वाडियांची बाजू मांडण्यासाठी उतरले. कोर्टात जेव्हा केस उभी राहिली तेव्हा न्यायाधीशांनी संबंधित कंपनीचे शेअर्स माझ्याकडे असल्यामुळे मी हि केस घेऊ शकत नाही असं कारण सांगितलं.

अशा अनेक घटना घडल्या. सरकारे आली गेली. पंचवीस वर्षे ही केस चालली. त्याच्या निकालाच काय झालं हे इंटरनेटवर शोधूनही सापडत नाही. मुकेश अंबानी अनिल अंबानी धीरूभाई अंबानी यांचा या मर्डर प्लॅन मध्ये रोल होता कि नव्हता याचं रहस्य कधी समोर आलंच नाही. विशेष म्हणजे त्या केसच्या आता सत्ताधारी व विरोधक यांच्यात चर्चा देखील होत नाही हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.