अंबानीवर कितीही टीका करत असला तरी त्यांनी टाकलेलं पाऊल कौतुकास्पद आहे

भारतात अंबानी-अदानी या आडनावांसोबत जेवढा पैसा आहे तेवढेच वाद पण आहेत. म्हणजे या दोघांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी असलेली जवळीक हा सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो. याच जवळीकतेमधून त्यांना फायदा होतो असा ही दावा अनेक जण करतात. आता हे किती खरं किती खोटं हे या दोघांनाच माहित.

पण या वादापलीकडे जावून सध्या याचं वादग्रस्त नावांपैकी एक असलेल्या अंबानींनी आणि त्यांच्या रिलायन्स उद्योग समूहाने टाकलेलं एक पाऊल अत्यंत महत्वाचं आणि कौतुकास्पद म्हणावं असचं आहे. ते पाऊल म्हणजे सोलार एनर्जीमध्ये ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं.

मुकेश अंबानी हे आता टेक्नॉलिजी, कम्युनिकेशन आणि रिटेल या क्षेत्रानंतर ग्रीन एनर्जीमध्ये देखील उतरत आहेत. २४ जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा (अन्युएल जनरल मिटिंग) पार पडली. यात बोलताना त्यांनी ग्रीन एनर्जीमध्ये एकूण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

या मिटिंगमध्ये अंबानींनी सांगितलं कि, या गुंतवणुकीमध्ये चार गीगा कारखान्यांची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी कंपनीने जामनगरमध्ये ५ हजार एकरांवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सला विकसित करण्यासाठी सुरुवात केली आहे. हि जगभरातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा निर्माण करणाऱ्या सुविधांमधील एक सुविधा असणार आहे. 

अंबानी यांनी सांगितलं कि, रिलायन्स २०३० पर्यंत १०० गीगावॅट सोलर एनर्जीची सुरुवात करेल, आणि त्या क्षमतेला वाढवण्यासाठी योगदान देईल. यामध्ये छतांवर लावण्यात येणारी सौर पॅनेल यंत्रणा आणि गावांमध्ये विकेंद्रित सौर यंत्रणांचा समावेश असणार आहे.

सोबतचं अंबानी यांनी सांगितलं आहे की, अक्षय ऊर्जा स्रोतांच्या माध्यमांतून बनलेल्या एनर्जीच्या स्टोरेजसाठी कंपनी अत्याधुनिक एनर्जी स्टोरेज बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट देखील लावणार आहे. या या सगळ्या सोबतचं रिलायन्सची ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनाची देखील योजना आहे. ज्याचा वापर वाहनांच्या इंधनाच्या रूपात केला जाऊ शकणार आहे.

कंपनीचा आणखी एक उपक्रम तो म्हणजे उच्च कार्यक्षमता आणि सर्वात कमी भांडवल लावून मॉड्यूलर इलेक्ट्रोलायझर्स तयार करण्यासाठी इलेक्ट्रोलायझर गीगा फॅक्टरी स्थापन करणं. याचा वापर घरगुती वापरासाठी मोठया प्रमाणावर करता येणार आहे. 

अंबानी म्हणाले, फ्यूल सेल गीगा फॅक्टरीसोबत आणखी एका गोष्टीची तरतूद करण्यात आली आहे, ती म्हणजे २०१६ मध्ये आम्ही भारतात डिजिटल क्षेत्रातील दरी मिटवण्यासाठी जियोला लॉन्च केलं होतं. आता २०२१ मध्ये भारत आणि जागतिक पातळीवर ग्रीन एनर्जीमधील कमतरता दूर करण्यासाठी नवीन एनर्जी उद्योगात पाऊल ठेवत आहे.

अंबानींच्या या सगळ्या घोषणा महत्वाच्या आणि कौतुकास्पद का आहेत?

तर सध्याच्या घडीला फक्त भारतचं नाही तर जगभरातून क्लीन एनर्जीच्या वापरावर भर दिला जातं आहे. कार्बनच उत्सर्जन कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सातत्यानं प्रयत्नशील आहे. 

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यूनायटेड नेशन्सच्या क्लायमेट एम्बिशन समिटमध्ये बोलताना म्हणाले होते की, 

भारत आपलं रिन्यूएबल एनर्जीच टार्गेट मिळवण्यासाठी आणि ते आणखी चांगलं बनवण्याच्या मार्गावर आहे. भारताने २०२२ पर्यंत १७५ गीगावॅटचं टार्गेट ठेवलं आहे. सध्याच्या घडीला हे टार्गेट बरंच लांब असलं तरी २०३० पर्यंत ४५० गीगावॅटचं टार्गेट ठेवलं आहे. 

ऊर्जा क्षेत्रातील काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार,

सध्या हे टार्गेट मिळवण्यासाठी काही प्रमुख अडचणी येत आहेत ते म्हणजे, आर्थिक कमतरता आणि भारतात मोठ्या प्रमाणावर होतं असलेली आयात. भारताच्या सध्याच्या ८० टक्के सोलर सेल आणि मॉड्यूलच्या गरजेला चीन पूर्ण करत आहे.

पण आता याच ठिकाणी रिलायन्स भारताच्या उपयोगी येऊ शकते. कसं, तर भारत रिलायन्सच्या मदतीने अपारंपरिक स्रोतांच्या माध्यमातून ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकणार आहे, त्यासोबतचं चीन कडून होणारी आयात देखील कमी होऊ शकणार आहे 

रिलायन्स एक इंटिग्रेटेड सोलर फोटोवोल्टाइक फॅक्टरी सुरु करणार आहे जिथून इंगोट आणि वेफर बनवण्यात येणार आहेत. याच्या वापरानंतर अत्यंत कमी किंमतीमध्ये सोलर सेल आणि मॉड्यूल बनू शकणार आहेत.

सोबतच कंपनी ग्रीन हायड्रोजन आणि कार्बनडायॉकसाईडच्या वापरातून ग्रीन केमिकल, ग्रीन फर्टिलायजर आणि ई-फ्यूल बनवण्याच्या तयारीत आहे.

या रिन्यूएबल एनर्जी बिझनेसमधील एंट्रीसोबतच रिलायन्सची स्पर्धा आता अदानी ग्रीन एनर्जी आणि गोल्डमॅन सॅक्सचा पाठिंबा असलेली ReNew Power सोबत होणार आहे. पण यापलीकडे जावून २०३० पर्यंत रिलायन्सचं १०० गीगावॅटची सोलर एनर्जी तयार करण्याचं लक्ष अत्यंत महत्वकांक्षी आहे आणि भारताला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूपच मदत मिळणार आहे.

आता या सगळ्यातून अंबानींना फायदा होणार का? तर नक्कीच होणार. कारण कोणताही व्यापारी आपला काही फायदा असल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात पैसे गुंतवत नाही. त्यातल्या त्यात अंबानींनासारखा माणूस तर फायदा असल्याशिवाय पैसा गुंतवणार नाही हे नक्की.

पण दुसऱ्या बाजूला भारतात सध्याच्या घडीला जे पारंपरिक ऊर्जेचे स्रोत आटत चालेले आहेत, त्यावर उपाय म्हणून अंबानी घेऊन येत असलेला हा अपारंपारिक ऊर्जेचा स्रोत खूपचं महत्वाचा ठरणार आहे. आणि म्हणूनच अंबानीच हे पाऊल कौतुकास्पद असं म्हणायला हवं आहे.

याबाबत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांचं ट्विट देखील महत्वपूर्ण वाटत.

ते म्हणतात,

रिलायन्सनी काल ज्या घोषणा केल्या आहेत, त्यातील सर्वात चमकदार घोषणा म्हणजे सौरउर्जा प्रकल्पाची. जागतिक पातळीवर जे चालू आहे त्याची त्यांना जाण आहे. हरित उर्जेसारख्या गोष्टी भविष्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. असे मुद्दे उद्योगक्षेत्रानं घेतले, राजकीय क्षेत्रं कधी घेणार? असा हि सवाल ते विचारतात.

 

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.