गांगुलीच्याही आधी ईडन गार्डनचा महाराजा म्हणून अंबर रॉय ओळखला जायचा.
५ ऑक्टोबर १९६९, न्यूझीलँडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तीन टेस्ट सामन्यांपैकी दुसरी मॅच नागपुरात खेळवली जात होती. न्यूझीलँडने पहिल्या डावात ३१९ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात १५० धावांत ६ विकेट भारताने गमावल्या होत्या. आणि आता हि मॅच गेली असा विषय झालेला. त्यावेळी मैदानात येतो २३ वर्षांचा लेफ्टी बॅट्समन. नाव –
अंबर रॉय
११ धावांची पार्टनरशिप झालीच असेल कि अजून एक विकेट पडली. आता क्रीजवर अंबर रॉय आणि फारुख इंजिनिअर खेळत होते. न्यूझीलँडच्या पेस अटॅकने भारताचं कंबरडं मोडलं होतं. हि मॅच न्यूझीलँड खिशात घालणार हे स्पष्ट दिसत होतं, पण अंबर रॉय वेगळ्याच मूडमध्ये होता.
#लोड घ्यायचा नाही
अंबर रॉयचा हा फंडा होता कि कितीही काही झालं तरी लोड घ्यायचा नाही. ज्या ज्या वेळी मॅच असेल त्या त्या वेळी अंबर रॉय पॅड बांधून झोपायला निघून जायचा. ज्यावेळी त्याची बॅटिंग यायची त्यावेळी इतर सहकारी त्याला उठवायला जायचे. अंबर रॉय मैदानात जायचा कधी शंभर तर कधी झिरो करून परतायचा. बॅटिंग करून आल्यावर मस्त सिगरेट पीत तो उरलेली मॅच बघत बसायचा.
पण त्या दिवशी अंबर रॉयने न्यूझीलँडच्या बॉलिंग अटॅकला लोड दिला. सगळी वेगवान गोलंदाजीची फळी अंबर रॉयने फोडून काढली. एकूण ४८ धावा त्याने केल्या पण त्यातही त्याने १० चौकार तडकावले. त्यावेळी बॅटिंगमध्ये प्रसिद्ध असलेले फारुख इंजिनिअर सुद्धा ती बॅटिंग बघून अवाक झाले होते.
या मॅचनंतर जस भारतात कायम घडतं तसंच घडलं लोकांनी अंबर रॉयला उद्याचा महान क्रिकेटर ठरवून टाकलं. पण असं काहीही घडलं नाही. पुढच्या मॅचेसमध्ये तो २,० आणि ४ धावा काढून बाद झाला, त्याचबरोबर हि टेस्ट सिरीजही संपली.
पुढची सिरीज हि ऑस्ट्रेलियाबरोबर होती. निवड समितीने पहिल्या दोन टेस्टसाठी अंबर रॉयला संघात जागा दिली नाही, पण कोण जाणे सिलेक्टर विजय मर्चंट यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता, त्यांना अंबर रॉयवर जास्त विश्वास होता कि तो नक्की सेंच्युरी मारेल. तिसऱ्या टेस्टसाठी अंबर रॉयला संघात जागा मिळाली आणि तो शून्यावर बाद झाला. हि त्याची शेवटची टेस्ट ठरली.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंबर रॉयला चमक दाखवता आली नाही मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये तो सगळ्यात खतरनाक खेळाडू होता. त्याने रणजी सामन्यांमध्ये मारलेल्या प्रत्येक चौकार षटकारावर सगळं ईडन गार्डन त्याच्यासाठी टाळ्या वाजवायचं. बंगाल संघाचा कर्णधार म्हणून अंबर रॉय चांगलाच चालला.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अंबर रॉयचा जलवा होता. त्याने १३२ सामन्यांमध्ये ४३.१५ च्या ऍव्हरेजने ७ हजार १६३ धावा केल्या होत्या त्यात १८ शतकांचा समावेश होता. रणजी ट्रॉफीमध्येही ११ शतकांच्या साथीने ३ हजार ८१७ धावा जमवल्या होत्या.
प्रणब रॉय हे त्यांचे चुलत बंधू होते. अंबर रॉयबद्दल बोलताना ते सांगतात कि, अंबर दादा हा सगळ्यात खुश असलेला खेळाडू होता. ईडन गार्डेनचा बाप म्हणून त्याला लोकं ओळखायचे. ज्यावेळी त्याला कळलं कि कॅन्सर आजार त्याला झालाय तेव्हाही लोड न घेता त्याने सिगरेट मागवली आणि हसायला लागला. नेट प्रॅक्टिसला तो जायचा खरा पण आळशीपणामुळे तो प्रॅक्टिस करायचा नाही.
अंबर रॉयबद्दल असही सांगण्यात येत कि त्याचे आजोबा आणि वडील हे गडगंज संपत्तीचे मालक होते. इतकच नाही तर ते बँकांना लोन द्यायचे.
रिटायर्ड झाल्यानंतर अंबर रॉय १५ वर्षे बंगालच्या निवड समितीमध्ये सामील होते. सौरव गांगुलीला भारतीय संघात अंबर रॉय यांनीच आणलं, सगळ्यात आधी गांगुलीचं टॅलेंट त्यांच्या लक्षात आलं होतं. बंगालमधून आलेला अंबर रॉय हा सर्वोत्तम लेफ्टी बॅट्समन म्हणून प्रसिद्ध होता.
हे हि वाच भिडू :
- सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला आजवर अनेक हिरे शोधून दिले, हा एकच दगड निघाला..
- पडीक असलेला बगीचा पुढे जाऊन क्रिकेटची पंढरी बनेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.
- वसीम अक्रमला भारताचा कोच बनवायची गांगुलीची इच्छा पूर्ण झाली नाही पण…
- त्यादिवशी जवागल श्रीनाथनं भारताकडून खेळायचं नाही म्हणून ठरवलं होतं, पण…..