फोर्ड पाठोपाठ आत्ता “अंबुजा सिमेंट” भारत सोडून जाणार..? नेमकं चाललय तरी काय..?

ॲक्टर बोमन इरानीची एक ॲड आहे. जवळपास १०-११ वर्षांपूर्वीची. त्यात त्यांचा डबल रोल दाखवण्यात आलाय. ‘भाई-भाई’ अशी त्या ॲडची ओळख. दोन भावांच्या घरामध्ये मधोमध एक भिंत उभी केलेली असते. अचानक दोन्ही भावांना एकमेकांबद्दल प्रेम येतं. गहिवरून दोन्ही भाऊ भिंत पडून परत एकत्र होण्यासाठी भीती तोडायला निघतात. घरातील सगळी मंडळी अगदी जमेल त्या गोष्टींनी भिंत तोडायला बघता. अगदी बॉम्बसुद्धा वापरला जातो पण सगळं निष्फळ होतं.

मग एक भाऊ विचारतो ‘भैया ये दिवार टूटती क्यों नहीं है?’ आणि उत्तर येतं ‘टूटेगी कैसे? अंबुजा सीमेंट से जो बनी है’

ही ॲड नसेल आठवत तर जरा अलीकडे येत खलीची ॲड आठवा… खली त्याच्या भरभक्कम शरीरामुळे खूप त्रस्त असतो. त्याला घरात नीट वावरता येत नसतं कारण साधा हात, डोकं जरी त्यांनी भिंतीला टेकवलं की लगेच भिंती तुटत असतात. मग त्यांना एकदा कुणीतरी ‘अंबुजा सीमेंट’बद्दल सांगतात. त्याने ते घर बांधतात तेव्हा त्यांना पहिल्यांदा कळतं की, घरपण काय असतं!

अशा ढीगभर ॲड तुम्हाला या सिमेंट ब्रँडच्या मिळतील. अलीकडेच काही वर्षांपूर्वी हॅशटॅगचा ट्रेंड आल्यावर त्यांनी ‘रिश्ते मजबूत बनाये अंबुजा सीमेंट के संग’ या आशयाचं हॅशटॅग पण चालवलं होतं. आणि तशी व्हरायटी अंबुजा देत आलंय. मात्र या सगळ्यात एक कॉमन गोष्ट राहिली ती म्हणजे त्यांचा संदेश आणि त्यांचं स्लोगन जे त्यांची स्पेशॅलिटी दाखवतं…

‘मजबुती’ 

याच त्यांच्या स्पेशॅलिटीच्या जोरावर ही कंपनी भारताच्या सिमेंट बाजारावर राज्य करत होती. मात्र आता हा प्रवास संपणार आहे. कारण ही कंपनी ज्या कंपनीच्या अधिकारात येते ती कंपनी विदेशी आहे. होल्सिम ग्रुप (Holcim Group) असं त्या  मुख्य कंपनीचं नाव. ही कंपनी जगातील टॉपची सिमेंट कंपनी आहे जिने भारतातील उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

आता इतकी जब्राट आणि गेल्या काही वर्षांपासून भारताच्या उद्योगाचा मोठा भाग झालेली कंपनी जेव्हा अशी अचानक भयानक देशातून जाणार तेव्हा कल्ला तर होणारच ना. म्हणून नक्की काय झालंय? आणि होल्सिम ग्रुपचं भारतातून जाणं अंबुजावर काय परिणाम करणार? हे जाणून घेऊया…

अंबुजाचं भारतात आगमन

अंबुजा सिमेंटची स्थापना १९८३ मध्ये नरोतम सेखसरिया आणि सुरेश नेओतिया या दोन व्यापाऱ्यांनी केली होती. त्यांनी दूरदृष्टी ठेवत भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी सिमेंट हे एक महत्त्वाचं साधन असेल, असा अंदाज बांधून गुजरातमधील एका अत्याधुनिक सिमेंट प्रकल्पात गुंतवणूक केली आणि पुढे एक विश्वासार्ह सिमेंट ब्रँड तयार केला. जो गुणवत्तेत आणि सामर्थ्यात आपली ओळख बनवली.

काहीच वर्षांत ही कंपनी भारतातील अग्रगण्य सिमेंट कंपन्यांपैकी एक बनली. २००५ मध्ये अंबुजा सिमेंट्स आणि आणखी एक प्रमुख भारतीय सिमेंट कंपनी एसीसी लिमिटेड, स्वित्झर्लंडच्या नामांकित होल्सिम ग्रुपचा एक भाग बनली.

सन २०१५ मध्ये होल्सिमचं विलीनीकरण  लाफार्ज (Lafarge) या फ्रेंच कंपनीसोबत झालं. त्यानंतर ही कंपनी LafargeHolcim अशा नावाने मार्केटमध्ये आली. मात्र, भारतासह काही आशियाई-युरोपीयन देशांमधील कायद्यांमुळे होल्सिम ग्रुप या नावाने बाजारपेठेत प्रवेश केला होता. सिमेंट आणि इमारत बांधकाम साहित्यातील मोठी युरोपीयन कंपनी म्हणून तिने नाव मिळवलं. 

१९८६ मध्ये वार्षिक ७ लाख टन क्षमता असलेल्या एकाच प्रकल्पापासून ते २०१६ पर्यंत पाच एकात्मिक सिमेंट उत्पादन प्रकल्प आणि एकूण २९.६५ दशलक्ष टन क्षमतेचे आठ सिमेंट ग्राइंडिंग युनिट्स असलेल्या सिमेंट जायंटपर्यंत, असा मोठा पल्ला मग कंपनीने अवघ्या ३० वर्षांत गाठला. 

आजच्या घडीला अंबुजा सिमेंटची मार्केट व्हॅल्यू ९.६ बिलियन डॉलर इतकी आहे.

अशी ही कंपनी आता भारतातून जाते की काय असं झालंय. का? तर…

Holcim Group भारतातून आपलं बस्तान गुंडाळत आहे. १७ वर्षांपासून या कंपनीने भारताचं सिमेंट मार्केट कॅप्चर केलेलं आहे. तरी ती जातेय कारण कंपनीने आपल्या कोअर मार्केटवर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे होल्सिमवर सध्या खूप कर्ज झालं आहे. हेच कर्ज कमी करण्यासाठी आणि अधिग्रहणांद्वारे विविधता आणण्यासाठी आपली नॉन-कोअर मालमत्ता कंपनी विकत  आहे.

सप्टेंबरमध्ये तिने ब्राझिलियन युनिटला १ अब्ज डॉलर्समध्ये विकलं होतं आणि सध्या झिम्बाब्वेमधील आपला व्यवसाय विकण्याचीही योजना आखत आहे.

असंच भारतातही ही कंपनी करतेय. अंबुजा सिमेंट या कंपनीची होल्सिम ही मालक कंपनी आहे. या कंपनीत होल्सिमची ६३.१ टक्के भागिदारी आहे. होल्सिमकडे ही भागिदारी Holderind Investments Limited च्या माध्यमातून आहे. म्हणून तिच्या जाण्याने या दोन्ही कंपन्या जाण्याच्या शक्यता आहेत. 

तर याचा फटका एसीसी लिमिटेड या सिमेंट कंपनीला देखील बसणार आहे. कारण एसीसी लिमिटेड कंपनीत अंबुजा सिमेंट कंपनीची ५०.०५ टक्के भागिदारी आहे. आणि एसीसीमध्ये Holderind Investments Limited ची प्रत्यक्ष भागिदारी ४.४८ टक्के आहे. म्हण्जेच ही कंपनी देखील होल्सिमचीच झाली. २०१८ पासून होल्सिम या दोन्ही ब्रॅण्डचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तसं होऊ शकलं नाही.

मग आता या कंपन्या भारतातून जाणार का? 

अशी शक्यता कमी आहे. कारण माहितीनुसार, होल्सिम ग्रुप आपला भारतातील व्यवसाय विकण्यासाठी तयार आहे. 

सध्या भारतीय सिमेंट बाजारात आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ही सर्वात मोठी आहे. ही कंपनी दरवर्षी ११७ दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन करू शकते. तर होल्सिमच्या दोन्ही लिस्टेड कंपन्यांची संयुक्त क्षमता ६६ दशलक्ष टन प्रति वर्ष इतकी आहे. त्यामुळे कोणताही समूह जो या कंपन्या खरेदी करेल, तो लगेच भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट कंपनी होईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यादेखील या व्यवहारात लक्ष देत आहेत. 

देशाबद्दल सांगायचं झालं तर…

जेएसडब्लू  (JSW) आणि अदानी समूहाने नुकतंच सिमेंट व्यवसायात एन्ट्री घेतली  आहे. शिवाय माहितीनुसार, होल्सिम आपला भारतातील व्यवसाय विकण्यासाठी या दोन्ही ग्रुपसह इतर कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. मात्र या दोन्ही कंपन्यांनी सिमेंट बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठी तयारी केली आहे. श्री सिमेंट सारख्या स्थानिक कंपनीसोबतही संपर्क साधण्यात आल्याची चर्चा आहे. 

तेव्हा आता नक्की काय होणार? कोणत्या कंपनीला अंबुजा आणि एसीसी सिमेंट खरंच भारतातून जाईल का? की या दोन्ही कंपन्यांपैकी कुणी त्यांना भारतात रोखण्यात यशस्वी होणार? की कुणी तिसराच बाजी मारणार? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे…

हे ही वाच भिडू :

1 Comment
  1. YUGWINI V DESHMUKH says

    I would like to be ur team member. Can you give me one chance to explore the things on social media

Leave A Reply

Your email address will not be published.