त्या दिवशी त्या अॅम्ब्युलन्समधलं पेट्रोल संपलं आणि पाकिस्तान कायमचा गंडला.

आज आहे पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन. मोहम्मद अली जिना या एका माणसाच्या हट्टापायी भारताचे दोन तुकडे झाले.  म्हणजे यात अनेकांनी हातभार लावला हेही खरच आहे पण पाकिस्तान मागणीच्या ठिणगीचा वणवा करण्यास जिनाचं कारणीभूत होते हे सत्य कोणाला नाकारता येत नाही.

मोहम्मद अली जीना. मुळचे गुजराती. कराची मध्ये जन्मले. इंग्लंडमधून शिकून आलेले बॅरिस्टर. खरं बघायला गेलं तर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते त्याप्रमाणे जिना हे धर्मनिरपेक्ष होते. त्यांची बायको पारसी होती, त्यांचं राहणीमान एखाद्या इंग्रज वकीलाप्रमाणे होती. नमाज, मस्जिद वगैरे गोष्टीपासून ते चार फुट लांब असायचे.

सुरवातीला कॉंग्रेसमध्ये राहून  हिंदू मुस्लीम एकता वगैरेचा पुरस्कार केला, मुसलमानांना वेगळा मतदारसंघाचाही विरोध करायचे. वकील म्हणून देखील फेमस होते. लोकमान्य टिळकांची केस जवळचा मित्र म्हणून त्यांनीच लढली होती. 

पुढे कॉंग्रेसमधून फुटून मुस्लीम लीगचा सवता सुभा मांडला. तेव्हा ही टिळकांशी दोस्ती तुटली नव्हती. या दोघानीच मुसलमानांच्या वेगळ्या मदतदारसंघाला मान्यता देणारा लखनौ करार केला होता. पण पुढे काही वर्षांनी टिळक निवर्तले आणि कॉंग्रेसमध्ये गांधी एरा सुरु झाला. आफ्रिका रिटर्न असणाऱ्या संन्यासा सारख्या दिसणाऱ्या गांधीच्या मागे अख्खा भारत लागला. यात मुसलमानपण आले. शिवाय खिलाफत चळवळीला मदत करून मुसलमानांचा एकगठ्ठा पाठींबा गांधीजीनी मिळवला होता.

या सगळ्यात जिना मागे पडत गेले. एका सभेत तर गांधीजींच्या समर्थकांनी त्यांना बोलूही दिल नाही. अखेर काही वर्षांनी अडगळीत पडलेल्या जीनांनी राजकारण सोडून दिल. त्यांच्या लाडक्या बायकोचा रूटीचा मृत्यू झाला होता.  सगळ सोडून इंग्लंडला वकिली करायला जाऊन राहिले. त्यांच्यासाठी खूप नैराश्याचा हा काळ होता. सिगरेटचं व्यसन देखील वाढल होतं.

साधारण १९३४चा काळ असेल. गांधीजींच सविनय कायदेभंग वाल आंदोलन फेल गेलं, त्यांची गोलमेज परिषद देखील काही यशस्वी झाली नाही. भारतीय मुसलमान काहीसा कॉंग्रेसपासून दूर जाऊ लागला होता. १९३५साली देशभर निवडणुका देखील होणार होत्या. मुस्लीम लीगने जीनानां परत बोलवून घ्यायचं ठरवलं.

जिना परत आले. नव्या दमाने सुरवात करण्यासाठी. पण यावेळी त्यांच्या सोबतीला एक रोग देखील आला होता, टीबी.

दिवसभरात ओढल्या जाणाऱ्या पन्नास सिगरेटनी आपला इफेक्ट दाखवून दिला होता. पण जिनांनी ही माहिती लपवून ठेवली. त्यांची बहीण फातिमा आणखी एकदोनजण सोडले तर कोणालाही या रोगाचा पत्ता लागू दिला नव्हता. ते डॉक्टरांना दाखवायला देखील तयार नसायचे. त्यांना वाटायचं आपल्या रोगाबद्दल कळाल तर कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होईल.

टीबीला लपवून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. फक्त यावेळी हा लढा भारताच्या स्वातंत्र्याचा नाही तर पाकिस्तान निर्मितीचा होता. आधी जिना देखील पाकिस्तानबद्दल सिरीयस नव्हते. त्यांनी या मागणीचा वापर फक्त गांधीजींच्या पाठीशी असलेल्या मुसलमान तरुणाईला फोडणे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर जसजस स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात येऊ लागले तसे तसे त्यांनी वेगळ्या पाकिस्तानचा रेटा वाढवला.  

१९४६ पासून मुसलमानांचं प्रतिनिधित्व फक्त आपण करतो आणि त्यांना हिंदूंपासून वेगळा देश हवा आहे हा एकमेव अजेंडा त्यांनी ठेवला. १६ ऑगस्ट १९४६ ला तर त्यांनी आपली मागणी मान्य होत नसेल तर थेट कृतीदिनाची घोषणा केली. याचा अर्थ सरळ होता, देशभर हिंदू मुसलमान दंगल. याकाळात प्रचंड हिंसाचार झाला. जिनांना दिलेली अखंड भारताच्या पंतप्रधानपदाची ऑफर सुद्धा त्यांनी धुडकावली.

अखेर ब्रिटीश सरकारचा दबाव प्रचंड रक्तपात यामुळे नेहरू पटेल या कॉंग्रेस नेत्यांनी देखील शेवटचा पर्याय म्हणून फाळणी मान्य केली. गांधीजीना देखील तयार करण्यात आले.

१४ ऑगस्टला पाकिस्तान आणि १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. जिना तिथले पहिले गव्हर्नर जनरल बनले. त्यानी जाहीर केलं की स्वतंत्र पाकिस्तान सेक्युलर असेल.  पण फाळणीमुळे लाखो लोकाना आपलं घरदार सोडून परागंदा व्हावं लागलं. हिंदू मुसलमान एकमेकांच्या रक्ताचे भुकेलेले बनले. या हिंसाचार जिनांना रोखता आला नाही. काश्मीरचा प्रश्न सुद्धा चिघळला होता.

३० जानेवारी १९४८, स्वातंत्र्य मिळून एक वर्ष देखील झालं नव्हत तोवर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या झाली. जिना ज्याला आपल्या आयुष्यात सर्वात मोठा प्रतिस्पर्धी समजत होते त्याचा मृत्यु झाला. पण जाण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानला त्यांचे हक्काचे ५५ कोटी मिळवून दिले होते.

इकडे पाकिस्तान अजून सावरला नव्हता. त्यांचे संविधान तयार नव्हते. देशाची घडी बसली नव्हती. हे सगळ घडत होत पण जीनाची तब्येत अतिशय बिघडलेली होती. टीबीने त्यांना पूर्णपणे ग्रासले होते. वजन फक्त ३५ किलो एवढे उरले होते.

अखेर जिना आपल्या बहिणीसह जुलै १९४८ला राजधानी कराची पासून हवापालट म्हणून बलुचिस्तानच्या क्वेटाला जाऊन राहिले. पण त्यांची तब्येत सावरलीचं नाही. पाकिस्तानचं पहिलं स्वातंत्र्यदिनाच भाषण देखील त्यांच्या वतीने कोणीतरी रेडियोवरून वाचून दाखवण्यात आलं. तेव्हा कुठे हळूहळू बातमी बाहेर येऊ लागली की जीनांची तब्येत बिघडली आहे.

डॉक्टरांनी त्यांना विनंती केली की कराचीला परत या म्हणजे आपल्यावर उपचार सुरु करता येतील. पण हट्टी जिना तयार झाले नाहीत. पण त्यांची तब्येत खालावतच गेली. ९ सप्टेंबरला त्यांना न्युमोनिया देखील झाला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना खास विमानाने कराचीला परत आणण्यात आलं.

विमानतळावरून त्यांना रिसीव्ह करायला एक अॅम्ब्युलन्स आली होती. जीनांना उठून बसावे एवढी सुद्धा प्रकृती साथ देत नव्हती. त्यांना स्ट्रेचरवरून अॅम्ब्युलन्स मध्ये घालण्यात आलं. घनघन घंटा वाजवत ही अॅम्ब्युलन्स कराची रस्त्यावरून हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली.

पण दुर्दैव. त्या गाडीतल पेट्रोल संपल्यामुळे अॅम्ब्युलन्स रस्त्यातच बंद पडली. दुपारची वेळ, कराची मधलं प्रचंड ऊन याचा तोळामासा प्रकृती उरलेल्या जिनांना त्रास होऊ लागला. जवळून ट्रक वगैरे जात होते पण त्यांच्याकडे उठून दुसऱ्या गाडीत बसण्याएवढी ताकद नसल्या मुळे पुढची अॅम्ब्युलन्स येईपर्यंत वाट पहात थांबण्यापेक्षा पर्याय नव्हता.

हा सगळा प्रकार गोपनीय ठेवला असल्यामुळे गाडीत कोण पेशंट आहे याची कोणालाच याची कल्पना नव्हती. दैवदुर्विलास बघा भारतातून आलेल्या मुसलमानांच्या निर्वासित छावणीजवळचं ही अॅम्ब्युलन्स बंद पडली होती.  पाकिस्तानचा सर्वोच्च नेता असहायपणे तिथे पडून होता. तब्बल एका तासाने दुसरी अॅम्ब्युलन्सआली. त्यांना दवाखान्यात पोहचवण्यात आलं. पण तो विमान प्रवास, त्यानंतरचा तो अॅम्ब्युलन्समधल्या उन्हातला एक तास ही सगळी दगदग मोहम्मद अली जिना यांना झेपलीचं नाही. त्या दिवशीच त्यांच निधन झालं.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाचे निर्माते देशाला स्वातंत्र्य मिळून एक वर्ष होईपर्यंत देवाघरी निघून गेले होते. यामुळे या दोन्ही देशाचं कधीही न भरून येणार नुकसान झालं होतं. विशेषतः पाकिस्तानच!! पाकिस्तानच्या गाडीच पेट्रोल गाडी सुरु होण्या आधीच संपलं होतं. पुढे हा देश कट्टरतावाद्यांच्या ताब्यात गेला.

जिना जर जिवंत राहिले असते तर पाकिस्तानला त्यांनी कधीच मुस्लीम राष्ट्र होऊ दिल नसत, जिना जर आणखी काही काळ जगले असते तर पाकिस्तानची एवढी वाताहत झालीच नसती. असं त्यांच्या बहिणीने एका ठिकाणी म्हटलंय.

एवढच काय भारताचा शेवटचा ब्रिटीश गव्हर्नर माउंटबॅटन म्हणतो की

“जर मला जीनांच्या तब्येतीबद्दल आधीच माहित असत तर मी सुद्धा एका वर्षासाठी भारताला स्वातंत्र्य देण टाळल असत. काय माहित जीनांच्या मरणानंतर कोणी पाकिस्तान मागितला ही नसता.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.