अमिषा पटेलचे आजोबा एकेकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते

फिल्मस्टार अमिषा पटेल आठवतेय? हो आपल्या पदार्पणातच लागोपाठ कहो ना प्यार है आणि गदर सारखे महाब्लॉकबस्टर सिनेमे दिलेली हिरॉईन. acting चांगली करायची, डान्स चांगला करायची, दिसायची देखील छान. पण काय झालं कुणास ठाऊक पण अचानक फ्लॉपचा भडिमार केला आणि इंडस्ट्रीतून बाहेर फेकली गेली.

पण ही स्टोरी तिची नाही तिच्या आजोबांची आहे. बॅरिस्टर रजनी पटेल.

मूळचे गुजरातचे. जन्म झाला सरसा या गावी. गांधीजींच्या स्वदेशी सत्याग्रहाने भारावून गेले आणि स्वातंत्र्यलढ्यात उतरले. शाळकरी वयात असताना दारूच्या दुकानाबाहेर आंदोलने केली आणि जेलला जाऊन आले.

पण किती जरी झालं तरी गुजराती डोकं. आधी पोटोबा तर पाहणारच.

कायद्याची डिग्री घेतली आणि उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथे नावाजलेल्या केंब्रिज विद्यापीठात उच्चश्रेणीत पास होऊन बॅरिस्टर झाले. रजनी पटेल यांच्या नावाची कीर्ती पंडित नेहरूंच्या कानावर आली होती.

इंग्लंड दौऱ्यावर आले असता रजनी पटेल आणि पंडित नेहरू यांची भेट झाली.

दोघेही डाव्या विचारसरणीकडे झुकलेले. एकमेकांशी घट्ट मैत्री झाली. रजनी पटेल यांना स्वातंत्र्यलढ्यात पुन्हा उतरायचं होतं. नेहरूंनी त्यांना सल्ला दिला की

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जर तुम्हाला कार्य करायचे असेल तर तुम्ही अमेरिकेला जा आणि इंग्रज सरकार आपल्या देशावर किती अन्याय करतेय याची तिकडे जनजागृती करा.

नेहरूंच्या सल्ल्यानुसार बॅ.रजनी पटेल अमेरिकेला गेले. त्यांच्या प्रयत्नामुळे जगात इंग्रजांचा साम्राज्यवादी चेहरा समोर आला. अमेरिकी जनतेत गांधीजींच्या आंदोलनाबद्दल सहानुभूती निर्माण झाली.

जेव्हा रजनी पटेल भारतात परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भलामोठा जनसमुदाय मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला येऊन थांबला होता. त्यात प्रमुख होते जवाहरलाल नेहरू.

पण इंग्रज सरकारने त्यांचा भव्य सत्कार होऊ नये म्हणून जहाज समुद्रातच अडवले आणि त्यांना उचलून थेट नाशिकच्या जेलमध्ये आणून टाकलं.

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर रजनी पटेल यांनी मुंबईला वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली.वकील म्हणून देखील रजनी पटेल यांचं नाव तुफान गाजलं. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान बनलेल्या नेहरूंनी काँग्रेसमध्ये समाजवादी विचारसरणीचा प्रभाव वाढवण्यासाठी रजनी पटेल यांच्या सारख्या नेत्यांना राजकारणात आणले.

रजनी पटेल यांची राजकीय कारकीर्द बहरली इंदिरा गांधींच्या काळात. स.का.पाटील यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर मुंबई काँग्रेसची जबाबदारी रजनी पटेल यांच्या कडे सोपवली.

महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार एकेठिकाणी सांगतात की,

आमची विचारसरणी वेगळी होती. मी रजनीभाईंच्या काँग्रेसमधल्या विरोधी गटात होतो मात्र तरीही माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना सल्ला देण्यासाठी त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आमच्या सारख्या काँग्रेसच्या एका पिढीला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

रजनी पटेल यांनी मुंबईच्या काँग्रेस कमिटीवर पकड निर्माण केली. स.का.पाटील यांच्या काळात दुरावलेला पक्षाधार रजनी पटेल यांनी पुन्हा काँग्रेसकडे वळवला. राष्ट्रीय राजकारणातही रजनी पटेल यांचा दबदबा प्रचंड वाढला. इंदिरा गांधींपासून अनेक नेते त्यांचा सल्ला घ्यायचे.

जेव्हा वसंतराव नाईकांकडून इंदिरा गांधींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला तेव्हा रजनीभाई पटेल यांचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सर्वात वर होते.

रजनी पटेल गुजराती होते या कारणाने त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यात आलं.

पुढे आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांचे पक्षातील वर्चस्व वाढले. त्यांनी अनेक नवे तरुण आक्रमक चेहरे पक्षात आणले. यातील अनेक जण फटकळ होते, त्यांची कोणतीही विचारधारा नव्हती, पक्षात चमचेगिरीची नवी संस्कृती या तरुणांनी आणली.

रजनी पटेल व इतर अनेक मोठे नेते हळूहळू राजकारणातून दुरावले.

शरद पवार यांनी जेव्हा वसंतदादा यांच्या पाठीत खंजीर खुपसला व काँग्रेस सरकारपाडून मुख्यमंत्री बनले तेव्हा रजनी पटेल यांनी त्यांच्याशी बोलणं बंद केलं. पवारांचे फोन देखील ते उचलत नव्हते.

एकदा बंगाल वर महापुराचे संकट आले होते तेव्हा तिथले मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी महाराष्ट्राकडे मदत मागितली.

ज्योती बसू हे रजनी पटेलांचे मित्र होते. महाराष्ट्राची आजवरची परंपरा होती की कोणत्याही राज्यात संकट आले की आपण सर्वात पुढे राहून मदत पाठवत होतो. पवारांची इच्छा होती की यावेळची मदत रजनी पटेल यांच्या हस्ते देण्यात यावी.

अखेर शरद पवार रजनी पटेल यांच्या घरी जाऊन पोहचले व बंगालच्या परिस्थितीबद्दल सांगितलं.

शरद पवारांच्यावरचा राग बाजूला ठेवून रजनी पटेल परत आले आणि बंगालला मदत पाठवून देण्यात पुढाकार घेतला. तत्व आणि व्यवहार यात मेळ घालण्याच कौशल्य बॅ. रजनी पटेल यांना साध्य झाले होते.

संजय गांधी यांच्यामुळे राजकारणातून बाहेर पडलेल्या रजनीभाईंनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ मुंबईत नेहरू सेंटर उभारण्यात व्यतीत केली.

नेहरू प्लॅनटोरियम पासून ते नेहरू सायन्स सेंटर पर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांच्या संकल्पनेतून उभी आहे.

एकेकाळी मुंबईवर राज्य करणारा हा माणूस पण त्यांनी आपली घराणेशाही राजकारणात कधीच आणली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्यांची नातवंडं अमिषा पटेल व अस्मित पटेल मात्र सिनेमा क्षेत्रात आली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.