१९ सामन्यात नावावर होते १७४ रन्स, २० व्या सामन्यात द्विशतक ठोकत बनली सर्वात तरुण द्विशतकवीर…!!!

आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने जणू विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा धडाकाच लावलाय. आठवड्याभरापूर्वीच यजमान संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ बाद ४९० धावांचा डोंगर उभा करत जागतिक क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा विश्वविक्रम आपल्या नावे केलेल्या या संघातील एका खेळाडूने काल आयरिश संघाविरुद्धच्या सामन्यात अजून एक विश्वविक्रम आपल्या नावे केलाय.

महिला क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याच्या विश्वविक्रम.

न्यूझीलंडची बॅटसमन आमेलिया केर हिने घणाघाती द्विशतक ठोकत महिला क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याच्या विश्वविक्रमावर आपलं नांव कोरलंय.  याचबरोबर फक्त १७ वर्षाची असणारी आमेलिया जागतिक क्रिकेटमधील सर्वात तरुण द्विशतकवीर ठरली आहे. आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय शृंखलेतील डब्लिन येथील मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद २३२ धावांची खेळी साकारणाऱ्या आमेलियाने यापूर्वीचा महिला क्रिकेटमधील २१ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम इतिहासजमा करताना नवीन विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी महिला क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क हिच्या नावे होता. तिने १९९७ साली डेन्मार्कविरुद्धच्या लढतीत नाबाद २२९ धावा काढत हा विश्वविक्रम आपल्या नावे केला होता. विशेष म्हणजे हा अमेलीयाचा २० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता आणि यापूर्वीच्या १९ सामन्यांमध्ये तिच्या नावावर फक्त १७४ रन्स होते.

ही इनिंग महिला आणि पुरुषांच्या क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

१४५ बॉल्समध्ये ३१ फोर आणि २ सिक्सर्सच्या मदतीने नाबाद २३२ धावांची खेळी साकारणाऱ्या केरची ही इनिंग महिला आणि पुरुषांच्या क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा रोहित शर्मा हा असून दुसऱ्या क्रमांकवर न्युझीलंडचा मार्टिन गुप्टील आहे. रोहितच्या नावे २६४ धावांचा विश्वविक्रम आहे तर दुसऱ्या क्रमांकावरील मार्टिन गुप्टीलने २३७ रन्सची खेळी साकारलेली आहे. रोहित शर्माने २०१४ साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हा विश्वविक्रम आपल्या नांवे केला होता तर मार्टिन गुप्टीलने २०१५ साली वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात नाबाद २३७ रन्सची खेळी उभारली होती.

eight col White Ferns
: PHOTOSPORT

न्युझीलंडच्या संघाने सलग तिसऱ्या वेळी ४०० धावांचा पल्ला गाठला.

आयरिश दौऱ्यावरील एकदिवसीय शृंखलेतील तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडच्या संघाने सलग तिसऱ्या वेळी ४०० धावांचा पल्ला गाठला. ओपनर आमेलियाची धडाकेबाज खेळी आणि तिला लेई कास्परेक हिची १०५ बॉल्समधील ११३ धावांच्या खेळीची मिळालेली तोलामोलाची साथ यांच्या जोरावर न्यूझीलंडने ३ बाद ४४० रन्सचा डोंगर उभा केला. या दोघींनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी २९५ धावांची भागीदारी केली. ही महिला क्रिकेटमधील कुठल्याही विकेटसाठीची दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी ठरली. महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारीचा विश्वविक्रम दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या भारतीय जोडीच्या नावे आहे. या जोडीने मे २०१७ मध्ये आयर्लंडच्या संघाविरुद्धच ३२० रन्सची भागीदारी केली होती.

न्युझीलंडच्या ४४० रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला आयर्लंडचा संघ संघर्ष करण्याच्या परिस्थितीत सुद्धा दिसला नाही. त्यांचा डाव अवघ्या १३५ धावांमध्ये गडगडला. आयरिश फलंदाजीला भगदाड पाडण्यात देखील आमेलिया केर हिनेच महत्वपूर्ण भूमिका बजावली. अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन करताना तिने १७ धावा देऊन आयर्लंडच्या ५ फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. त्यामुळेच न्यूझीलंडच्या संघाने ३०५ धावांनी मोठा विजय मिळवत एकदिवसीय मालिका खिशात घातली.

Leave A Reply

Your email address will not be published.