वर्णभेद-विरोधातील सहा आंदोलन, ज्यांचा इतिहास आपणांस माहितच हवा.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मिनिओपोलीस येथे काही पोलीस अधिकाऱ्यांनी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीवर अमानुष अत्याचार केले व त्याचा त्यात मृत्यू झाला.

गेली काही वर्षे अमेरिकेत वर्णभेदाची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. विशेषतः पोलीस व इतर सरकारी पातळीवर अशा घटना घडत आहेत.

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर मात्र अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या असंतोषाचा उद्रेक झाला.

तीव्र निदर्शने व आंदोलनास सुरवात झाली. आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अमेरिकेतील जवळपास ४० शहरात संचारबंदीलागू करण्यात आली आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

अमेरिकेतील वर्णभेदाविरुद्धच्या संघर्षाला मोठा इतिहास आहे. मात्र ही आंदोलने अहिंसक पद्धतीने लढली गेली, अगदी छोट्या छोट्या कृतीतून मोठे बदल घडवले.

१. रोजा पार्क्स यांचे बस आंदोलन

rosa parks

गोष्ट डिसेंबर १९५५ची आहे. मोंटेग्यूमेरी येथे रोजा पार्क्स नावाची एक कृष्णवर्णीय महिला आपली डिपार्टमेंटल स्टोअर्स मधली नोकरी करून घरी परतत होती. त्याकाळी अमेरिकेत बस प्रवास करताना गोरे लोक व काळे लोक यांना वेगवेगळे सीट आरक्षित केलेल्या असायच्या.

रोजा पार्क्स कृष्णवर्णीयांसाठीच्या सीट वर बसली होती. काही वेळातच गोऱ्या लोकांच्या सीटवरील जागा भरल्या व चारजणांना उभं राहावं लागलं. हे लक्षात आल्यावर बसच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली. त्याने 4 कृष्णवर्णीय प्रवाशांना उठून गोऱ्याना बसायला जागा करून द्यायला सांगितली.

यात रोजा पार्क्स देखील होती. बाकीचे तिघे उठले मात्र रोजा पार्क्सने जागा सोडायला ठाम नकार दिला. यावरून वाद झाले.

त्या गौरवर्णीय ड्रायव्हरने पोलिसांना बोलवले आणि रोजाला अटक करण्यात आली. पुढे कोर्टात तिला दंडाची शिक्षा झाली.

रोजा पार्क्स कोणीही राजकारणी नव्हती. या गरीब महिलेने आपल्या हक्कासाठी केलेली एक छोटीशी कृती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. कृष्णवर्णीयांनी मोंटेग्यूमेरी येथे असहकार आंदोलन सुरू केले. एकही कृष्णवर्णीय व्यक्ती बसमध्ये बसत नव्हती. अनेक दिवस चाललेल्या या आंदोलनात अखेर सत्याचा विजय झाला आणि अमेरिकन सुप्रीम कोर्टाने बस मध्ये बसायचे आरक्षण रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

२. द लिटल रॉक नाईन

Little Rock Nine National Guard Arkansas Central 1957

सप्टेंबर १९५७ रोजी अमेरिकेच्या अर्कांसस प्रांतातल्या लिटल रॉक या गावी तिथल्या शाळेत एक घटना घडली. आजवर या शाळेत फक्त गोऱ्या मुलांना प्रवेश दिला जायचा. मात्र मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने वर्णावरून शाळेतील प्रवेश घटनात्मक दृष्ट्या चुकीचे ठरवले होते.

या निर्णयामुळे ९ कृष्णवर्णीय मुलांनी लिटल रॉक मधल्या शाळेत अधिकृत ऍडमिशन मिळवले. तरीही शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांना शाळेत घुसू दिलं नाही. शाळेबाहेर गोऱ्या पालकांचा हिंसक जमाव निदर्शने देत होता.

अर्कांसस प्रांताच्या गव्हर्नरनी या मुलांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स ना पाठवले.

ही अभूतपूर्व घटना होती. सुप्रीम कोर्टचे आदेश पायदळी तुडवण्यात आले होते.

यामुळे लोकांच्यात असंतोष पेटला. अखेर महिनाभरानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर यांनी यामुलांना शाळेत पोहचवल

या प्रसंगाला लिटल रॉक्स नाईन हाय म्हणून ओळखले जाते. अमेरिकेतील शाळाप्रवेशातील वर्णभेदाविरुद्ध जनजागृती इथूनच सुरू झाली.

३. ग्रीन्सबोरो फोर

SAVE 20200603 133335

१ फेब्रुवारी १९६० रोजी नॉर्थ कॅरोलिना मधल्या ग्रीन्सबोरो गावात शेती विद्यालयातील 4 कृष्णवर्णीय मुले दुपारच्या जेवणासाठी एका हॉटेल मध्ये गेली. पण त्यांना जेवण देण्यास तिथल्या मालकाने नकार दिला. फक्त गोऱ्या लोकांसाठी जेवण अशी त्यांची पॉलिसी होती. त्याने त्या चौघांना बाहेर जाण्यास फर्मावले.

पण या तरुणांनी जेवण मिळेपर्यंत आपली जागा सोडण्यास नकार दिला. वुलवर्थ लंच काउंटरच्या मालकाने पोलिसांना बोलवले. तो पर्यंत तिथे मीडियाने गर्दी केली होती. ते चार तरुण शांततामय मार्गाने आंदोलन करत असल्यामुळे पोलिसांना देखील जबरदस्ती करता आली नाही.

रात्री रेस्टॉरंट बंद होई पर्यंत ते चार तरुन तिथे बसून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या कॉलेजमधल्या इतर मित्रांना देखील बोलवलं. बघता बघता हे आंदोलन अख्ख्या अमेरिकेत वणव्याप्रमाणे पसरलं. अखेर अमेरिकेतल्या रेस्टॉरंटस ना त्यांचे वर्णभेदाचे धोरण मागे घ्यावे लागले.

४. रुबी ब्रिजेस 

US Marshals with Young Ruby Bridges on School Steps

वर सांगितल्याप्रमाणे १९५४ साली अमेरिकन सुप्रीम कोर्टाने शाळांमधील कृष्णवर्णीय व श्वेत वर्णीय असे वर्णभेदावरून विभाजन चुकीचे ठरवले होते. मात्र तरीही अनेक ठिकाणी याचे पालन केले जात नव्हते.

प्रखर वंशभेदासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या ओरलीयन्स प्रांतात विलीयम्स फ्रांट्स प्राथमिक शाळा आहे. इथे कृष्णवर्णीयांना प्रवेश मिळू नये म्हणून इंट्रन्स परीक्षा घेतली जायची.

ही परीक्षा पास होऊन रुबी ब्रिजेस नावाच्या 6 वर्षाच्या मुलीने त्या शाळेत प्रवेश मिळवला. असा प्रवेश मिळवणारी ती पहिली कृष्णवर्णीय मुलगी ठरली.

तिथल्या गोऱ्या पालकांनी आपल्या मुलांना त्या शाळेतून काढुन टाकले. छोट्या रुबीला व तिच्या आईला अनेक धमक्या येऊ लागल्या. अखेर अमेरिकन मार्शल कमांडोची टीम रोज रुबीला शाळेत नेण्या आणण्याच्या वेळी संरक्षण देऊ लागली.

छोट्या रुबीवर व तिच्या आईवर रोज प्रचंड शिवीगाळ झाली, हल्ल्याचे प्रयत्न झाले पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या धैर्याचा परिणाम आज लाखो कृष्णवर्णीय मुली यांना शिक्षणाची कवाडे उघडली गेली.

५. फ्रीडम रायडर्स-

SAVE 20200603 133624

अमेरिकेतल्या दक्षिण प्रांतामध्ये वर्णभेदाची दाहकता जास्त होती. आजही काही प्रमाणात आहे. या विरोधात काही तरुण एकत्र आले आणि तिथल्या भागात बसने फिरून सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांना फ्रीडम रायडर्स म्हणून ओळखलं जातं.

यात अनेक श्वेत वर्णीय तरुण देखील सामील झाले.

त्यांची पहिली बस ४ मे १९६१ रोजी वॉशिंग्टन येथून निघाली. अशा अनेक बस रूट वर हे फ्रीडम रायडर्स फिरत होते. फक्त गोऱ्यांसाठी राखीव जागा, त्यांचे रेस्टरम, त्यांच्या साठीचे हॉटेल्स येथे जाऊन ते वापरत होते.

या फ्रीडम रायडर्सची चळवळ दडपण्याचा प्रयत्न झाला. अनेकदा त्यांच्यावर हिंसक हल्ले झाले. पेट्रोल बॉम्ब टाकून बस जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी देवल गोऱ्या हल्लेखोरांना साथ दिली. फ्रीडम रायडर्स यानाच अटक केली.

अखेर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हस्तक्षेपानंतर सामाजिक विभाजनाविरुद्धचे कायदे कडक करण्यात आले आणि प्रवासादरम्यानचा वंशभेद कमी झाला. फ्रीडम रायडर्सचळवळीचा हा मोठा विजय मानला गेला.

६. मिस्टर रॉजर्स नेबरहुड शो

SAVE 20200603 134317

साधारण १९६० च्या उत्तरार्धात अमेरिकेतील वांशिक भेद कमी झाला होता. कायद्याने वर्णभेदावर कडक कारवाई होऊ लागली होती. तरीही एका नियमाला अपवाद होता. अनेक ठिकाणी गोऱ्या लोकांच्या स्विमिंगपूल मध्ये कृष्णवर्णीयांना उतरण्याची परवानगी दिली जात नव्हती.

१९६९ साली फ्रेड रोजर्स नावाच्या श्वेतवर्णीय टीव्हीशो होस्टने आपल्या मिस्टर रॉजर्स नेबरहुड या शोच्या एका एपिसोडमध्ये एका कृष्णवर्णीय पोलीस अधिकाऱ्याचा रोल करणाऱ्या फ्रान्सिस क्लेमन्स या अभिनेत्याला लहान मुलांच्या स्विमिंग टब मध्ये पाय बुडवायला लावले व स्वतः ही त्या टब मध्ये पाय बुडवून बसला. संपूर्ण मुलाखत तशीच घडतली व झाल्यावर दोघांनी एक टॉवेल वापरला.

रॉजर्सने कोणताही आरडाओरडा न करता कोणतंही मोठं आंदोलन न करता राष्ट्रीय वाहिनीवर केलेल्या छोट्या कृतीमुळे अनेकांचे डोळे उघडले.

अमेरिकेच्या कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्क आंदोलनाच नेतृत्व करणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग यांच्यावर महात्मा गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा प्रभाव होता. त्यांच्यामुळेच कृष्णवर्णीयांनी अशा छोट्या छोट्या मात्र ऐतिहासिक आंदोलनांनी अमेरीकन इतिहास बदलून टाकला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.