अमेरिकेतले लष्करी जवान भारतीय अभिनेत्री बेगम पाराचे फोटो बराकीत लावायचे

सोज्वळ नायिकांची जेंव्हा रूपेरी पडद्यावर चलती होती त्या पन्नासच्या दशकात एक घोंगावतं वादळ या दुनियेत येवून थडकलं आणि आपल्या ऐटबाज नखरेल अदांनी सार्‍यांना घायाळ करून गेलं. या वादळाचं नाव होतं ‘बेगम पारा’. आज हि अभिनेत्री कुणाला आठवण्य़ाची सुतराम शक्यता नाही कारण तिच्यासाठी अशा खास भूमिका कधी लिहिल्या गेल्याच नाहीत. 

रूपेरी पडद्यावरून बेगम पाराने १९५८ सालीच चित्रसंन्यास घेतला. पण ती लोंकाना आजही आठवते

(अगदी अलीकडे तब्बल पन्नास वर्षांनी २००७ साली तिने संजय लिला भन्साळी यांच्या ’सांवरीया’ या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूरच्या आजीची भूमिका केली.) ती कायम मारधाड स्टंट पटात शेख मुख्तार, भगवान दादा यांच्या सोबत सिनेमात चमकायची.असल्या सिनेमात नायिकांना वाव कितीसा असणार? असं असतानाही आज इतक्या वर्षानंतर तिची आठवण रसिकांना का होते? याचं कारण म्हणजे रूपेरी पडद्यावरील ती पहिली बोल्ड अभिनेत्री होती.

१९५१ साली तिने जगप्रसिध्द ’लाईफ’ मॅगझिन करीता ‘बोल्ड’ फोटो शूट केलं होतं. तिच्या धाडसाचं कौतुक करायला हवे. पाश्चात्य पोषाखात ती उठून दिसायची. तिच्या फॅशनेबल अदेने नवा ट्रेंड निर्माण केला. तिच्या वेषभूषेची आणि केशभूषेची भुरळ तरूणींना पडली. तिच्या वागण्यात एक प्रकारचा चार्मनेस होता, बिनधास्त पणा होता; जो त्या काळाच्या मानाने खूपच अ‍ॅडव्हांस होता. 

तिच्या स्विमिंग कॉस्चुम्स मधील प्रतिमेने तरूणांची झोप उडाली होती. तिच्या या मादक बोल्ड अदेने ती भारतातील पहिली पिन अप गर्ल बनली. बेगम पारा त्या काळची अमेरीकेतील सेक्स सिम्बॉल जेन रसेल या अभिनेत्रीला हटवून पिन अप गर्लची जागा पटकावली. त्या काळच्या सिने मासिकांवरची ती हॉटस्टार होती. तिच्या फॅशनेबल अदांनी आणि नखर्‍यांनी मायानगरीला भूल पडली होती. 

बेगम पारा या अभिनेत्रीची लोकप्रियता भारतात तर होतीच पण सातासमुद्रापार थेट अमेरिकेत देखील होती. 

कारण अमेरिकेतील सैनिक त्यावेळी बेगम पाराचा फोटो आपल्या पाकिटात ठेवत असत. तसेच त्यांच्या बराकीमध्ये देखील बेगम पराचे फोटो लावलेले असेल. इतकी प्रचंड मोठी लोकप्रियता बेगम पाराला जगभर लाभली होती. तिच्या मादक अदेने  अमेरिकन सैनिक खुश होवून जात असत! ‘उस्ताद पेड्रो’ मध्ये ती शेख मुख्तार सोबत चमकली. सहा साडे सहा फूट उंच दणकट शेख मुख्तार आणि टंच बेगमपाराची जोडी हिट ठरली. 

बेगम पाराचा जन्म २५ डिसेंबर १९२६ सालचा! तिचे वडील बिकानेरचे न्यायाधीश होते. तिच्या भावाची बायको प्रतिमा दास गुप्ता सिनेमात आधीपासून होती. एकदा शूटींग बघायला ती मुंबईत आली आणि प्रभातच्या ’चांद’ या सिनेमासाठी तिला प्रेम अदीब सोबत नायिकेची भूमिका मिळाली. 

राज,मधुबालाच्या ’नीलकमल’मध्ये देखील ती होतीच. सोहनी महिवाल,मेहंदी,नया घर, लैला मजनूत ती चमकली. के असिफच्या मुगल-ए-आजम मध्ये निगार सुलतानाच्या वाट्याला आलेली भूमिका आधी बेगमला ऑफर झाली होती. पण अभिनयाच करीयर तिने कधीच गांभीर्याने  घेतलं नाही. 

१९५६ साली नासिर खान (अभिनेता दिलीपकुमारचा भाऊ) सोबत तिची ओळख झाली. १९५८ साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर तिने चित्र संन्यास घेतला. १९७४ साली नासिरखानचे निधन झाले. काही काळ पाकीस्तानात जावून ती पुन्हा भारतात आली. तिचा मुलगा अयुब खान ’मृत्युदंड’ सिनेमात माधुरीचा नायक होता.

ज्या काळात भारतीय रुपेरी पडद्यावर नायिका या संपूर्ण वस्त्रांमध्ये भारतीय संस्कृतीला अनुकूल अशा भूमिका निभावत होत्या त्यावेळी बोल्ड बेगम पारा ने एक प्रकारचे वादळ निर्माण केले होते. ‘लाईफ’ या अमेरिकन मासिकांच्या कव्हरवर तिचे फोटो झळकल्याने एक हॉट सेंसेशन निर्माण झाले होते.

खरंतर तिच्या प्रतिमेला साजेसा तो काळ नव्हता. तिची फॅशन तिची अदा, तिचा बोल्ड नेस काळाच्या पुढचा  होता. त्यामुळे ती बॉलीवूड मध्ये त्याकाळात मिसफिट ठरली. पण भारताची पहिली ‘पिन अप गर्ल ‘म्हणून लोकप्रिय ठरली. ’सांवरीया’ (२००७)  नंतर तिला एका मालिकेची ऑफर आली होती. पण ९ डिसेंबर २००८ रोजी तिचे निधन झाले.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.