पोस्टर चिटकवणाऱ्या मुलाला रिक्षावाले विचारायचे हा आमिर खान कोण आहे ?

कायम धावणारं मुंबई शहर. एके दिवशी तिकडे सगळीकडे मोठेमोठे पोस्टर लागलेले होते. एक मुलगा मोठा रेबॅन गॉगल ब्लॅक शर्ट ब्लॅक जीन्स घालून उभा होता.

त्याच्यावर लिहिलेलं होतं,

Who is aamir khan?…ask the girl next door !

लोकलच्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या घड्याळाच्या चक्राबरोबर धावणाऱ्या मुंबईकरांनी मान वर करून हे पोस्टर पाहिलं होतं. त्यांना पण प्रश्न पडला होता की ही कशाची जाहिरात आहे?

हा आमिर खान कोण आहे? त्याचे शहरभर पोस्टर का लागले आहेत? स्वतःला समजतो कोण हा मुलगा?

नंतर कळाल ते एका सिनेमाचं प्रमोशन होत. जुने जाणते निर्माते दिगदर्शक नासिर हुसेन एक नवा सिनेमा बनवत होते त्याच हे पोस्टर होतं आणि हिरोच नाव होतं आमिर खान !

आमिर खान हा नासिर हुसेन यांचा पुतण्या. त्याचे वडील सुद्धा सिनेमा बनवायचे. पण गंमत अशी यांच्या घरची परिस्थिती तही बरी नव्हती. ताहीर हुसेन यांनी बरेच सिनेमे बनवून हात पोळून घेतलं होतं. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट क्लियर होती, पोराला या बेभरवशाचा क्षेत्रात जाऊ द्यायचं नाही.

आमिर लहानपणापासून शाळेत हुशार होता. पण त्याला अभ्यास सोडून बाकी सगळ्यात इंटरेस्ट होता. तो भन्नाट टेनिस खेळायचा. ज्युनियर ग्रुप मध्ये तो महाराष्ट्राचा कप्तान होता. 16 वर्षांखालील गटात त्याने स्टेट चॅम्पियनशिप जिंकली होती. वडिलांची इच्छा होती त्याने व्यवस्थित अभ्यास करावा, आयआयटी सारख्या भारी कॉलेज मधून इंजिनिअरिंग करावं.

पण पोराला त्यात काहीही रस नव्हता. भारताचा इतिहास आहे बाप जे सांगतो पोरगं बरोबर त्याच्या उलटं करतं.आमिर खान ने सुद्धा तसच केलं.

काका च्या स्टारडमचा त्याच्यावर खूप प्रभाव होता. त्याला सुद्धा नासिर हुसेन यांच्या सारखा मोठा दिग्दर्शक बनायचं होतं. 12 वीत असताना त्याने नरसी मुंजी कॉलेजमधल्या मित्रांसोबत एक शॉर्ट फिल्म बनवली. त्याच नाव पॅरानॉइया.

या पॅरानोईयाचा दिग्दर्शक होता आदित्य भट्टाचार्य आणि श्रीराम लागूंनी या मुलांना सिनेमा बनवण्यासाठी पैसे दिले होते. या शॉर्टफिल्ममध्ये नीना गुप्ता आणि व्हिक्टर बॅनर्जी यांच्या सोबत आमिर खान सुद्धा लीड रोल मध्ये होता. याशिवाय आदित्य भट्टाचार्य ला त्याने दिग्दर्शनात ही मदत केली होती.

याच सिनेमाने आमिर खान ला लक्षात आलं की आपला जन्मच फिल्म इंडस्ट्रीसाठी झाला आहे. तिथून त्याने पृथ्वी थिएटरमधल्या नाटकात काम करणे वगैरे सुरू केलं. याच नाटकामधून पुण्याच्या एफटीआयआयमधल्या विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट् फिल्ममध्ये छोटे मोठे रोल मिळाले. यातून त्याला दिग्दर्शक केतन मेहताने आपल्या होली या सिनेमात रोल दिला.

अशी अभिनयाची संधी आमिर खानला मिळत होती. पण त्याच पूर्ण लक्ष दिग्दर्शनाकडे होतं. तो नासिर हुसेन यांच्या सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होता.

तो काळ नासिर हुसेन यांच्या साठी सुद्धा वाईटच होता. त्यांचे सलग तीन सिनेमे फ्लॉप झाले होते. आता काही तरी वेगळं करायची त्यांची इच्छा होती.

एका सिनेमाची स्क्रिप्ट सुद्धा लिहून तयार होती मात्र तो सिनेमा टिपिकल होता. लैला मजनूची लव्ह स्टोरी. सिनेमाचं नाव होतं, नफरत के वारीस.

नासिर साहेबांना या सिनेमाला एक फ्रेश टच द्यायचा होता. एक नवा हिरो शोधायची मोहीम त्यांनी हाती घेतली. या सिनेमाचा सुद्धा आमिरच असिस्टंट दिग्दर्शक होता. अनेक नव्या मुलांच्या ऑडिशन त्याने स्वतः घेतल्या होत्या.

एक दिवस नासिर हुसेनना कोणी तरी होली हा सिनेमा दाखवला. त्यांच्या लक्षात आलं आपण गाव भर शोधतोय पण हिरो आपल्या घरातच आहे.

आमिर खान !!

गोरा गोमटा निरागस दिसणारा आमिर एक चॉकलेट हिरो म्हणून तरुणाईत फेमस होईल असं नासिर हुसेनच्या अनुभवी नजरेला जाणवत होतं. त्यांनी त्याला साइन केलं. हिरॉईन पण नवीनच हवी होती. त्यातूनच त्यांना जुही चावला मिळाली. तिला नंतर कळाल ऑडिशन घेणारा असिस्टंटच आपला हिरो असणार आहे.

सिनेमाचं शूटिंग सुरू होणार तेव्हा बातमी आली की नासिर हुसेन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांनी आपल्या ऐवजी आपल्या मुलाला दिग्दर्शनाची जबाबदारी घ्यायला लावली. नासिर हुसेन यांचा मुलगा म्हणजे आमिरचा चुलत भाऊ मन्सूर खान आयआयटीत पासआउट होता. अमेरिकेत शिकून आला होता.

खरंतर मन्सूर खानला ही स्टोरी आवडली नव्हती. त्याला ठाकूर वगैरे गोष्टीत जराही रस नव्हता. त्याने नासिर हुसेन ना सांगितलं तुम्ही ढवळाढवळ करणार नसाल तर मी दिग्दर्शन करणार. नासिर हुसेननी मन्सूर आणि आमिर या नव्या पिढीच्या हातात सगळी सूत्रं दिली.

सगळ्यात पहिल्यांदा सिनेमाचं नाव बदलण्यात आलं. नवं नाव होतं,

कयामत से कयामत तक

या सिनेमासाठी मन्सूरने नवी टीम घेतली. पहिल्यांदाच नासिर हुसेनच्या सिनेमात आर डी बर्मन संगीत देणार नव्हते. त्यांच्या ऐवजी आनंद मिलिंद याना संगीतकार म्हणून घेण्यात आल. सिनेमाचा गोड शेवट सुद्धा बदलून sad ending करण्यात आली. पण दोन्ही क्लायमॅक्सच शूटिंग करण्यात आलं होतं.

पोस्ट प्रोडक्शन वगैरे सोपस्कार आटोपून सगळं पिक्चर तयार झाला. पण दुर्दैव म्हणजे सिनेमा रिलीज होण्यासाठी कोणी डिस्ट्रीब्युटरच मिळत नव्हता. आधीच नासिर हुसेन यांचे सिनेमे फ्लॉप होत होते त्यात नव्या हिरोला कोण पाहणार हे सुद्धा गणित होतं.

ऐंशीच्या दशकाचा काळ. अमिताभ बच्चन आणि त्याची पडद्यावरची अँग्री यंग फायटींग अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालायची. त्यामुळे नवे हिरो सुद्धा सनी देओल, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे एका पेक्षा एक तगडे येत होते.

आमिर खान सारख्या नाजूक निरागस दिसणाऱ्या हिरोचा सिनेमा चालणार नाही याची मुंबईमधल्या डिस्ट्रीब्युटर ना खात्री होती. अखेर नासिर हुसेन यांनी स्वतःच्या पैशांनी सिनेमा रिलीज करायचं ठरवलं.

सिनेमाच्या प्रमोशन साठी त्यांनी वर सांगितलेली पोस्टरची आयडिया वापरली. मुंबईत त्यामुळे आमिर खान या नावाची चर्चा सुरू झाली.

सिनेमा रिलीज होई पर्यंत देखील आमिर खान ला अंदाज नव्हता की आपलं आयुष्य इथून पुढे बदलून जाणार आहे. तो निवांत लोकल ने फिरायचा. स्वतः जाऊन रिक्षाला आपल्या सिनेमाचं पोस्टर लावायचा. अनेक जण त्याला पळवून लावायचे.

काही जण विचारायचे,

“हिरो कोण है?”

उत्तर मिळायचं आमिर खान. रिक्षावाले विचारायचे,

“हा मगर आमिर खान कौन है?”

आमिर सांगायचा मीच आहे तो. रिक्षावाले हसायचे. काहीजणांनी पोस्टर लावून देखील घेतलं. पण सगळ्यांना खात्री होती सिनेमा पडणार.

पण घडलं उलटंच. गिटार वाजवत पापा केहते है बडा नाम करेगा म्हणणारा चॉकलेट बॉय आमिर खान सगळ्यांना आवडला. सिनेमातली गाणी तर तुफान लोकप्रिय ठरली. उदित नारायण चा आवाज आमिर ला सूट झाला होता.

गजब का है दिन, अकेले है तो क्या गम है, ऐ मेरे हमसफर सगळी गाणी सुपर हिट होती. पापा केहते है तर प्रत्येक कॉलेजमध्ये अंथम म्हणून वाजत होत.

आणि आमिर खान एका रात्रीत सुपरस्टार झाला होता.

कयामत से कयामत तक हा नासिर हुसेन यांच्या आत्ता पर्यंतच्या कारकीर्दतला सर्वात गाजलेला सिनेमा ठरला. नॅशनल अवॉर्ड पासून ते फिल्मफेअर पर्यंत सगळे अवॉर्ड या सिनेमाने खिशात टाकले होते.

बॉबी नंतर पहिल्यांदा एक टीनेज लव्ह स्टोरी आली होती. या सिनेमामुळे लव्ह स्टोरीचा ट्रेंड सिनेमात परत आला.

सलमान खान, शाहरुख खान यांनी आपल्या रोमँटिक रोलनी पुढचा काळ गाजवला मात्र याची सुरवात आमिर च्या कयामत से कयामत पासून झाली.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.